मुंबई, 17 नोव्हेंबर : शरद पवारांना मतदारसंघातल्या लाखभर आणि महाराष्ट्रासह देशातल्या लाखभर लोकांची नावं मुखपाट आहेत? शरद पवारांच्या या स्मरणशक्तीचं रहस्य काय? शरद पवार हे कुणाकडून शिकले? त्यांचा फॉर्म्युला काय? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं पुढच्या साडेतीन मिनिटात आपल्याला देणार आहे. सांगणार आहे शरद पवार नावाच्या सुपर कम्प्युटरची ही भन्नाट गोष्ट आहे. शरद पवारांसारखे मोठे नेते, इतक्या सगळ्या लोकांची नावं कशी काय लक्षात ठेवतात. लोकांना त्यांच्या नावाने हाक मारुन त्यांच्याशी व्यक्तिगत संपर्क ठेवतात याचं अनेकांना नवल वाटतं. शरद पवार मुख्यमंत्री होते तेव्हाचा हा किस्सा आहे. पवारांना भेटायला त्यांच्या मतदार संघातल्या एक कार्यकर्त्या काही कामासाठी भेटायला आल्या. शरद पवारांनी त्यांना बसायला सांगितलं आणि पहिला प्रश्न विचारला. ‘काय कुसुम काय चाललंय’? काय कुसुम विचारल्यावर तिच्या चेहऱ्यावर जो आनंद होता तो विचारूच नका. एका वाक्यानं ती कार्यकर्ती भारावून गेली. इतकी की ती ज्या कामासाठी आली होती ते कामच विसरली. ती गावी गेली. सगळ्यांना सांगायची माझं काम होवो न होवो… पण, साहेबांनी मला कुसुम म्हणून हाक मारली. तिला त्याचं प्रचंड कौतुक वाटलं.
वाचा - ‘शरद पवारांनी मदत केली नसती तर…’, जितेंद्र आव्हाडांनी सांगितला आनंद दिघेंचा तो किस्सा
तुम्हाला आश्चर्य वाटेल पण कुसूम यांच्या सारख्या बारामती मतदार संघातल्या जवळपास 50 टक्के लोकांना पवार हे पहिल्या नावानं ओळखतात. राज्यातल्या आणि देशातल्या लाखभर लोकांची नावं त्यांना मुखपाट आहेत. तुम्हाला प्रश्न पडला असेल या स्मरणशक्तीचं रहस्य काय ? तर शरद पवारांनी त्यांच्या राजकीय उत्कर्षासाठी प्रयत्नपूर्वक हा गुण अंगी बाणवलाय. लोकांशी व्यक्तिगत संबंध, व्यक्तिगत नाव ही स्मरणशक्ती जर आपण सतत ठेवली तर आपल्याला त्याचा राजकारणात खूप फायदा होतो. राजकारणात कमी कष्टात यश मिळवायचं असेल जर तुम्ही प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवायला हवं असा सल्ला पवार कायम देत असतात.
शरद पवारांनी नावं लक्षात ठेवण्याची ही आयडिया कुणाकडून घेतली माहितीय? शरद पवारांचे गुरु यशवंतराव चव्हाण आणि माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्याकडून. शरद पवारांनी स्वत: एका मुलाखतीत या रहस्याचा उलगडा केला. अतिशय लहान वयात शरद पवारांना महाराष्ट्रातल्या दोन दिग्गजांसोबत काम करायची संधी मिळाली. एक होते महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री, शरद पवारांचे गुरु यशवंतराव चव्हाण आणि दुसरे माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील. या दोघांचही एक वैशिष्ट्य होतं, की त्यांचा ५० वर्षांपूर्वीचा कुणीही जोडीदार त्यांना भेटला तर ते त्यांना पहिल्या नावानं हाक मारायचे. शरद पवारांनी हे लहानपणापासून बघितलं होतं. राजकारणात यशस्वी झालेल्या या दिग्गजांच्या अनेक जमेच्या बाजूंपैकी ही एक अशी बाजू होती जी त्यांना राजकारणात एका उंचीवर नेणारी ठरली. हे दोन्ही नेते समोरच्या व्यक्तीचं पहिलं नाव घेऊन संवाद साधायचे. त्यात त्यांना लोकांकडून प्रचंड प्रतिसाद मिळायचा. शरद पवारांनी हे हेरलं आणि गुरुंकडून मिळालेल्या या धड्याचं अतिशय प्रयत्नपूर्वक तंतोतंत पालन केलं.
हे वाचा - महाराष्ट्रातील शक्तीशाली पवार कुटुंब एकमेकांशी कसं जोडलं गेलंय?
शरद पवारांनी वयाची अंशी ओलांडलेली असतानाही त्यांची स्मरणशक्ती अतिशय तल्लख आहे. त्यांनी स्मरणशक्तीच्या जोरावर आयुष्यभर असंख्य माणसं जोडली. त्यांच्या मनात एक आत्मियता निर्माण केली. म्हणूनच लोकांचं मोहोळ अंगाखांद्यावर घेऊन फिरणारे नेते ही शरद पवारांची ओळख आहे. त्यांची सचोटी, अभ्यासू वृत्ती, सतत क्रियाशील राहाणं, त्यांच्यातील तरुणांना लाववेल अशी ऊर्जा आणि स्फुर्ती त्यांना एक मोठा नेता बनवते तशीच त्यांची स्मरणशक्तीही त्यांना राजकारण्यांमधला सुपर कम्प्युटर बनवते असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.