पुणे, 21 जानेवारी: देशाला कोरोना लस देणाऱ्या सीरम इन्स्टिट्यूटचे (Serum Institute Pune) नाव जगभरात झाले आहे. दरम्यान सीरम इन्स्टिट्यूटमधून एक धक्कादायक माहिती समोर येते आहे. कोरोना व्हायरस (Coronavirus) वर लस बनवणाऱ्या सीरम इन्स्टिट्यूटमध्ये भीषण आग लागली आहे. हडपसरजवळ गोपाळपट्टीमध्ये असणाऱ्या सीरम प्लांटला आग लागली आहे. याठिकाणी परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अग्निशमन दलाचा गाड्या घटनास्थळी पोहोचल्या असून आग विझवण्याचे आटोकाट प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान याठिकाणच्या संशोधकांना सुरक्षिततेच्या दृष्टीने दुसरीकडे हलवण्यात आले आहे. सीरम
आग विझवायला साधारण एक ते दीड तास आणखी लागेल, अशी माहिती समोर येते आहे. ज्याठिकाणी लशीची निर्मिती केली जाते त्या बाजूला फारसं नुकसान झालेलं नाही, अशी माहिती अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. राजेंद्र शिंगणे यांनी दिलेल्या माहितीनुसार बीसीजी लस जेथें तयार होते त्याठिकाणी आग लागली आहे. कोव्हिड लस बनवण्याचा विभाग सुरक्षित आहे, दरम्यान याबाबत अजून पूर्ण माहिती येणं बाकी आहे. आग लागलेल्या ठिकाणी 10 फायर टेंडर उपस्थित आहेत. सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या टर्मिनल गेट जवळ ही आग लागली आहे.
आग नेमकी का लागली याची चौकशी करून माहिती द्यावी, अशी सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे. सीरम इन्स्टिट्यूटच्या बीसीजी लशीचा प्लांट असलेल्या इमारतीमध्ये आग लागली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सिरम इन्स्टिट्यूट ला भेट दिली होती त्याच इमारतीत ही आग लागलेली आहे. शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे. वेल्डिंगचं काम सुरू असताना आग लागली, अशीही माहिती मिळते आहे. मात्र करोनाची लस याठिकाणी तयार करण्यात येत असल्याने सर्व यंत्रणांनी या घटनेकडे गांभीर्याने लक्ष दिलं आहे. गुप्तचर यंत्रणेने ही आग शॉर्टसर्किटमुळे आग लागली आहे की अन्य काही कारणांमुळे याचाही शोध घेण्यास सुरुवात केली आहे. लसनिर्मितीवर परिणाम होणार का? ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीने संशोधित केलेली लस कोविशील्ड (Covishield)नावाने सीरम इन्स्टिट्यूट उत्पादित करत आहे. कोविशील्ड लशीचा स्टॉक सुरक्षित आहे. आगीचा कोणता धोका पोहोचलेला नाही. आग नवीन इमारतीच्या ठिकाणी लागली आहे. त्यामुळे या आगीचा लसनिर्मितीवर कुठलाही परिणाम होणार नाही, असं सीरम इन्स्टिट्यूटद्वारे सांगण्यात येत आहे.