रायचंद शिंदे, प्रतिनिधी पुणे, 29 जुलै : शिरूर तालुक्यातील शिक्रापूर जवळच्या वाबळेवाडी जिल्हा परिषद शाळेची चुकीची माहिती विधानसभेत देऊन शाळेची बदनामी केल्याचा आरोप शिरुर-हवेली विधानसभा मतदार संघाचे राष्ट्रवादी काँग्रेचे शरद पवार गटाचे आमदार अशोक पवार यांच्यावर वाबळेवाडी ग्रामस्थांनी केला आहे. यासाठी ग्रामस्थांनी विशेष ग्रामसभा व पालक सभा घेऊन आमदार अशोक पवार यांना गाव बंदीचा निर्णय जाहीर केलाय. नेमकं काय आहे प्रकरण? शिरुरच्या आमदारांनी मांडली लक्षवेधी राज्यातल्या जिल्हा परिषदेच्या शाळा मरगळलेल्या अवस्थेत असताना पुणे जिल्ह्यातील शिरुरच्या याच वाबळेवाडी गावची जिल्हा परिषद शाळा भारतासह जगभरात आदर्श ठरत होती. 2018 ला तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या हस्ते या शाळेचा शुभारंभ झाला होता. राज्यातील पहिली टॅबलेट शाळा होण्याचा मानही याच शाळेला मिळाला. भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय शाळेची ही देखणी वास्तू साकारण्यासाठी आर्ट ऑफ लिव्हींग आणि बँक ऑफ न्यूयॉर्कची मोलाची मदत झाली. मात्र, मागच्या 4 वर्षांपासून ही शाळा आणि शाळेचे मुख्याद्यापक चौकशीच्या फेऱ्यांमध्ये अडकले होते. अधिवेशनात स्थानिक आमदार अशोक पवार यांनी लक्षवेधी मांडली. ग्रामस्थांनी तातडीने पालक सभा घेत आमदार अशोक पवार यांनी विधानसभेत शाळेचा प्रश्न चुकीच्या पद्धतीने मांडण्याचा आरोप करत निषेध केला. यापुढे वाबळेवाडी प्रकरणी पुन्हा बोललात तर पुणे नगर महामार्गावर आंदोलन करण्याचा इशाराही महिलांनी यावेळी दिला. मागील महिनाभरापासून आमदार अशोक पवार यांच्या घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचे कामगार विविध मागण्यांसाठी उपोषणाला बसले असताना त्यांचा प्रश्न मार्गी लावण्याचे सोडून शाळेबद्दल असे वादग्रस्त विधान त्यांनी केल्याने ते चांगलेच अडचणीत सापडलेत. अधिवेशनात आमदार अशोक पवार यांनी वाबळेवाडी जिल्हा परिषद शाळेत सर्रास 24,000 प्रवेश फी घेऊन प्रवेश दिले जातात आणि मुख्याध्यापकांसह बाहेरील दोन व्यक्ती हे पैसे स्वीकारतात. याशिवाय सीएसआरमार्फत होणाऱ्या कामाच्या फंडाचा हिशोब जिल्हा परिषदेला देत नाहीत असे सांगितले होते. यामुळे ग्रामस्थ चांगलेच आक्रमक झाले. वाचा - कोल्हापूरचा दुधगंगा कालवा भ्रष्टाचाराने पोखरला! फडणवीसांनी सभागृहातच घेतला निर्णय वाबळेवाडीची स्थानिक फक्त दहा ते वीस मुले शाळेत असून उर्वरित मुले धनदाडग्यांची आहेत, असेही आमदार अशोक पवार म्हणाले होते. ही सर्व माहिती राज्याची दिशाभूल करणारी व शाळेची अब्रू काढणारी आहे, असा आरोप करत पालकांनी व ग्रामस्थांनी पालक सभा घेऊन आमदार पवार यांचा निषेध करत त्यांना गावबंदी करण्याचा निर्णय जाहीर केला. यामुळे आता अशोक पवार यांच्या अडचणी चांगल्याच वाढणार आहेत. अशोक पवारांना आरोप फेटाळले दरम्यान News 18 लोकमतने आमदार अशोक पवार यांचीही बाजू समजून घेतली. वाबळेवाडी शाळेतील जे आंदोलन आपल्या विरोधात नागरिकांनी केलंय त्यांची तपासणी केली पाहिजे. कारण याच लोकांमधल्या दोघांनी जिल्हा परिषद शाळेतील पालकांकडून 25 हजार रुपये गोळा केले आणि गेल्या अनेक वर्षापासून ते गोळा करत आहेत. याची चौकशी लागलेली असताना घाबरण्याचे काय कारण? असा सवाल करत या शाळेची विभागीय स्तरावर चौकशी सुरू असताना ती अनेक महिन्यापासून तशीच आहे. म्हणून चौकशी वेळेत पूर्ण करावी म्हणून मी मागणी केली आहे. प्रत्येक मुलामागे 25000 नेमके कुणाच्या खात्यावर गेले? याची चौकशी करायची नाही का? चौकशी दडपण्याचा प्रयत्न हे लोक करत आहे आहेत हे दुर्दैव आहे, अशी प्रतिक्रिया अशोक पवार यांनी दिली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.