मुंबई, 12 मार्च : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांनी शिवसेने नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांच्याबाबत खूप मोठं सूचक विधान केलं आहे. राज ठाकरे आज दिव्यात (Diva) एका कार्यक्रमात गेले होते. यावेळी पत्रकारांना प्रतिक्रिया देताना त्यांनी संजय राऊतांबाबत एक विधान केलं. त्यांच्या त्या विधानामुळे राज्याच्या राजकारणात (Maharashtra Politics) एकच खळबळ उडाली आहे. ‘संजय राऊत यांनी एकांतात बडबड करण्याची प्रॅक्टिस करावी’, असं धक्कादायक विधान राज ठाकरे यांनी केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यावरुन राजकीय वर्तुळात वेगवेगळे अर्थ काढण्यात येत आहेत. संजय राऊत यांच्या मागे सध्या ईडीच्या (ED) चौकशीचा ससेमिरा सुरु आहे. तर दुसरीकडे विरोधकांकडून ठाकरे सरकार (Thackeray Government) कोसळण्याबाबतच्या वेगवेगळ्या डेडलाईन दिल्या जात आहेत. त्यामुळे राज ठाकरे यांना नेमकं काय म्हणायचंय? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जातोय. राज्यातील राजकारणात सध्या अनेक घडामोडी घडत आहेत. विशेष म्हणजे ईडीने आतापर्यंत राज्यातील महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांच्या घरी धाडी टाकल्या आहेत. तसेच अनेकांना नोटीस बजावली आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि राज्याचे सध्याचे विद्यमान अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक हे भ्रष्टाचाराच्या आरोपांप्रकरणी जेलमध्ये आहेत. या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी आणि भाजप यांच्यात टोकाचा संघर्ष बघायला मिळतोय. भाजपकडून केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर केला जात असल्याचा आरोप करण्यात येतोय. तर भाजपकडून त्या आरोपांचं खंडन केलं जात आहे. विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाच राज्यांच्या निवडणुकीच्या निकालानंतर भाजपच्या दिल्लीत आयोजित कार्यक्रमात केंद्रीय यंत्रणांचा तपास हा भ्रष्टाचाऱ्यांविरोधातील असून ही कारवाई आगामी काळात आणखी तीव्र होईल, असा इशारा दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या इशाऱ्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणातही खळबळ उडाली आहे. पंतप्रधान मोदींच्या इशाऱ्यानंतर मुंबईत शुक्रवारी (11 मार्च) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यात बैठक झाल्याची माहिती समोर आली होती. या बैठकीत या विषयावरही चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली होती. ( मोठी बातमी! पृथ्वीराज चव्हाण विधानसभा अध्यक्ष होणार नाहीत? काँग्रेसच्या गोटात हालचालींना वेग ) या दरम्यान राज ठाकरे आणि संजय राऊत यांच्यात सध्या शाब्दिक युद्ध रंगलं आहे. राज ठाकरे यांनी दोन दिवसांपूर्वी पुण्यातील एका कार्यक्रमात भाषण करताना संजय राऊत यांची नक्कल करत टीका केली होती. “संजय राऊत कुठचाही मागचा-पुढचा विचार न करता आपल्या तोंडाला येईल ते बडबडतात. अरे किती बोलता? चॅनल लागलं का हे सुरु. कॅमेरा बाजूला झाला की सगळं व्यवस्थित. मग हे अॅक्शन कुठून आलं? प्रश्न बोलण्याचा नाही, आपण काय बोलतोय, कसं बोलतोय, भविष्यातल्या महाराष्ट्राच्या पिढ्या बघत आहेत”, अशी टीका ठाकरेंनी केली होती. राज ठाकरेंच्या या टीकेला संजय राऊतांनी नंतर प्रत्युत्तर दिलं होतं. “नक्कल मोठ्या माणसांचीच करतात. सगळ्यांनी बोलावं अशी परिस्थिती आहे. ईडीने बोलावलं म्हणून आम्ही गप्प बसलो नाही. आम्ही बोलत राहू. आम्हाला कुणाची भीती नाही. ही बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आहे. ती ड्युबलीकेट, नकली नाही. जे सत्य आणि प्रखर आहे ते शिवसैनिक बोलणार. कर नाही त्याला डर कशाला? आमचं राजकारण नकलांवर उभं नाही. आमचं राजकारण कामावर, स्वाभिमान आणि संघर्षावर उभं आहे”, असं संजय राऊत यांनी उत्तर दिलं होतं. त्याच्या या उत्तरावर राज ठाकरे यांना आजच्या कार्यक्रमात प्रश्न विचारला असता त्यांनी आज “संजय राऊतांनी एकांतात बोलण्याचा सराव करावा”, असं विधान केलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.