प्रशांत लिला रामदास, प्रतिनिधी नवी दिल्ली, 12 मार्च : विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Speaker Election) पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या गोटात हालचालींना प्रचंड वेग आला आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि विधीमंडळ नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) हे आज दिल्लीत (New Delhi) दाखल झाले आहेत. ते विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी पात्र असलेल्या आमदारांची यादी घेऊन दिल्लीत पोहोचले आहेत. त्यांच्या यादीत काँग्रेसच्या (Congress) जवळपास चार नेत्यांची नावे आहेत. विशेष म्हणजे विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा मुद्दा हिवाळी अधिवेशनाच्यावेळी (Assembly Winter Session) देखील पेटला होता. त्यावेळी विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत कुणाला उमेदवारी द्यावी यावरुन काँग्रेसमध्येच अंतर्गत मतभेद असल्याची माहिती समोर आली होती. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) हे हिवाळी अधिवेशनावेळी दिल्लीला उमेदवारांची यादी घेऊन गेले होते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) हेदेखील पक्षश्रेष्ठींच्या भेटीसाठी दिल्लीला दाखल झाले. या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर पृथ्वीराज चव्हाण यांचं नाव विधानसभा अध्यक्षपदासाठी आघाडीवर आहे, अशी चर्चा होती. पण आज बाळासाहेब थोरात दिल्लीला घेऊन गेलेल्या यादीत राज्य काँग्रेसच्या वतीने सूचविण्यात आलेल्या चार नावांमध्ये पृथ्वीराज यांचं नाव नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. राज्याचं अर्थसंपल्पीय अधिवेशन (Maharashtra Budget Session 2022) सुरु आहे. या अर्थसंकल्पीय अधिवेशनातच विधानसभा अध्यक्षपदासाठी निवडणूक होण्याची शक्यता आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. नाना पटोले हे आक्रमक नेते असल्याने ते पक्षबांधनी चांगल्याप्रकारे करु शकतील, या विचारातून त्यांच्यावर त्यावेळी काँग्रेसच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदाची धुरा सोपविण्यात आली होती. तेव्हापासून विधानसभा अध्यक्षपदाची जागा रिकामी आहे. आता अध्यक्षपदी कोणत्या नेत्याची वर्णी लागणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. या दरम्यान बाळासाहेब थोरात आज दुपारी दिल्लीत दाखल झाले आहेत. विधानसभा अध्यक्षपदाच्या नावांची यादी घेऊन ते दिल्लीला गेले आहेत. या यादीत जवळपास काँग्रेसच्या चार ज्येष्ठ नेत्यांची नावे आहेत. त्यामध्ये संग्राम धोपटे, सुरेश वरपुडकर, सुरेश धोटे आणि अमीन पटेल यांच्या नावाचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. ( कोल्हापुरात पोटनिवडणुकीची रणधुमाळी रंगणार, आजपासून आचारसंहिता लागू ) …तर पृथ्वीराज चव्हाण विधानसभा अध्यक्ष होतील? विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी पृथ्वीराज चव्हाण यांच्या नावाची चर्चा आहे. पण महाराष्ट्र काँग्रेसच्यावतीने जी नावे सूचविण्यात आली आहेत त्यामध्ये चव्हाणांचं नाव नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. विशेष म्हणजे काँग्रेसमध्ये जे मतभेद आहेत त्यातून एक मोठा गट नाराज आहे. त्या गटात चव्हाण असल्याची चर्चा आहे. त्यांची नाराजी दूर करण्यासाठी कदाचित हायकमांड त्यांच्या नावाबद्दलचा निर्णय घेऊ शकते. पण सध्यातरी चार नावे चर्चेत आहेत. विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडीबाबत हायकमांड संयुक्तपणे चर्चा करुन निर्णय घेणार आहे. पण राज्यपाल भगतसिंग कोश्यारी जोपर्यंत विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीला परवानगी देत नाहीत तोपर्यंत काँग्रेसच्या उमेदवार जाहीर केला जाणार नाही, अशी देखील माहिती सूत्रांनी दिली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.