मुंबई, 25 फेब्रुवारी: आज विधिमंडळ सल्लागार समितीची बैठक मुंबई विधान भवन याठिकाणी होणार आहे. या बैठकीत अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा कालावधी आणि विधानसभा अध्यक्ष निवडणूक यावर निर्णय होणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडवणीस, विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांसह विधानसभा उपाध्यक्ष नरहरी शिरवळ, विधान परिषद सभापती रामराजे निंबाळकर यांच्या उपस्थितीत ही अत्यंत महत्वपूर्ण बैठक होणार आहे.
विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांची नियुक्ती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षपदी झाल्यानंतर रिक्त झालेल्या विधानसभा अध्यक्षपदावर निवडणूक घ्यायची का यावर दोन मतप्रवाह सध्या दिसत आहेत. सत्ताधारी बाकावरून महाविकास आघाडीचे प्रमुख नेते हे विधानसभा अध्यक्ष निवडणूक घेण्याबबत फारसे अनुकूल नाहीत. राज्यातील पाच मंत्री कोरोना रुग्ण झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील, अन्न व औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे, आरोग्य मंत्री राजेश टोपे, शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू, अन्नधान्य पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना कोरोनाची लागण झाली आहे. संबंधित मंत्री स्वतंत्र विलगीकरणात असून, अधिवेशनापूर्वी सर्व विधानसभा आणि विधान परिषद सदस्यांची देखील कोरोना चाचणी करावी लागणार आहे. या चाचणीदरम्यान देखील काही सदस्यांना लागण झाल्याचे समोर आले तर रुग्णांची संख्या वाढल्याने, अशा परिस्थितीमध्ये विधानसभा अध्यक्ष निवडणूक घेणे योग्य नाही असा सूर सत्ताधारी बाकावरचा आहे.
(हे वाचा-45 वर्षापेक्षा जास्त वय असलेल्यांना लस मिळवण्यासाठी करावं लागेल हे काम)
मात्र दुसरीकडे सूत्रांच्या माहितीनुसार, दोन आठवड्यांपूर्वीच राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी पत्रद्वारे राज्य सरकारला विधानसभा अध्यक्ष निवडणुकीबाबत विचारणा केली असल्याचे समजते. सूत्रांची अशी देखील माहिती आहे की, याबाबत तूर्तास तरी राज्य सरकारकडून कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही.
यावेळी भाजपची भूमिकाही महत्त्वाची असणार आहे. अध्यक्षपदाच्या निवडणुकीचे मतदान गुप्त पद्धतीने होणार असल्याने सत्ताधारी बाकावरील लोकांना त्यांचे आमदार फुटणार नाही याची खबरदारी घ्यावी लागणार आहे. दुसरीकडे त्यांची मतं फोडण्यासाठी विरोधी पक्ष आग्रही असणार आहे.
(हे वाचा-भर विधानसभेत तेजस्वी यादव यांचा शाळेतील वर्गमैत्रिणीशी झाला सामना)
एकूणच विधानसभा अध्यक्ष पदाच्या निवडणुकीवरून राज्य सरकार, राज्यपाल आणि विरोधी पक्ष यात तिरंगी सामना होणार असल्याचे दिसून येत आहे. विधीमंडळ अधिवेशनाचा कालावधी देखील तीन आठवडे किमान असावा अशी मागणी विरोधी पक्षांची आहे मात्र जास्तीत जास्त एक ते दोन आठवडे अधिवेशन चालावे अशी भूमिका महाविकास आघाडीतील नेत्यांची आहे. वाढती कोरोना रुग्णांची संख्या हे यामागचे कारण असल्याचे सत्ताधाऱ्यांकडून सांगितले जात आहे. अशी माहिती मिळते आहे की याबाबत आज निर्णय होईल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Ajit pawar, Devendra Fadnavis, Maharashtra politics, Modi government, Nana Patole, PM narendra modi, Uddhav thackarey