नवी दिल्ली, 25 फेब्रुवारी: सरकारने बुधवारी असा निर्णय घेतला की, 60 वर्षांपेक्षा जास्त वय किंवा अन्य आजाराने ग्रस्त असणाऱ्या 45 वर्षांपेक्षा जास्त वय असणाऱ्यांना 1 मार्चपासून कोरोना लस (Coronavirus Vaccine) मोफत दिली जाईल. तर खाजगी केंद्रांवर लस घेतल्यास त्यांना शुल्क द्यावे लागेल. मात्र गंभीर आजाराने ग्रस्त 45 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना यासाठी स्वाक्षरीकृत वैद्यकीय प्रमाणपत्र आवश्यक असेल, ज्यात त्यांच्या आजाराचे तपशील असतील. बुधवारी सूत्रांनी याबाबत माहिती दिली.
येत्या दोन दिवसांत एक यादी जाहीर करण्यात येणार असून त्यात कोणत्या आजारांना गंभीर प्रकारात समाविष्ट केले जाईल याची माहिती देण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. यात मधुमेह, कर्करोग, गंभीर दमा आणि मानसिक आजार त्याचप्रमाणे शिकण्यास असक्षम असलेल्या लोकांव्यतिरिक्त तीव्र हृदय रोग, फुफ्फुस, मूत्रपिंड आणि यकृत यांचा आजार असणाऱ्यांचा समावेश असू शकतो. यामध्ये इम्युनोसप्रेसन्ट्स, स्थूलपणा असलेले रूग्ण आणि अस्थिमज्जा किंवा स्टेम सेल ट्रान्सप्लांट केलेल्या रुग्णांचा देखील समावेश असू शकतो.
(हे वाचा-फक्त 5 जिल्ह्यांनी वाढवलं टेन्शन; झपाट्याने वाढले राज्यातील कोरोना रुग्ण)
लसीकरण केंद्रावर फॉर्म आणावा लागेल
सूत्रांच्या माहितीनुसार जे लोकं यापैकी कोणत्याही श्रेणीमध्ये येत असतील तर त्यांना त्यांच्या मेडिकल कंडिशनबाबत एक फॉर्म भरावा लागेल आणि त्यावर त्यांच्या डॉक्टरांची सही देखील घ्यावी लागेल. व्हॅक्सिनेशन सेंटरवर लस घेताना त्यांना हा फॉर्म आणावा लागेल. दरम्यान खाजगी लसीकरण केंद्रावर कोव्हिड व्हॅक्सिनच्या एका डोसची किंमत 300 रुपयांपर्यंत असू शकते. तर केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार सरकारी व्हॅक्सिनेशन सेंटर्सवर ही लस मोफत दिली जाईल.
(हे वाचा-'हो आम्हीच कोरोना पसरवला', अखेर तबलिगी जमातीनं दिली गुन्ह्याची कबुली)
केंद्र सरकारने याआधी अशी माहिती दिली होती की, लसीकरणासाठी नोंदणी करण्यासाठी कोव्हिन अॅपचा वापर केला जाईल आणि त्याअंतर्गतच त्यांना जवळच्या लसीकरण केंद्राची माहिती दिली जाईल. मात्र सध्या हे app केवळ आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाइन वर्कर्सच वापरू शकत आहेत.