नवी दिल्ली, 20 फेब्रुवारी : समुद्रात शेकडो जीव-जंतू राहतात. अनेक छोट्या माशांपासून ते धोकादायक मोठ्या माशांपर्यंत शेकडो जलचरांचं समुद्रात वास्तव्य असतं. खरंतर माणूसच त्यांच्या हद्दीत घुसण्याचा प्रयत्न करतो. अनेकदा मोठ्या धोकादायक माशांकडून माणसांवर पाण्यात हल्ला झाल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. असाच माशाच्या हल्ल्याचा एक भयानक प्रकार सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडीओमध्ये एक तरुणी खोल समुद्रात पोहण्याचा आनंद घेताना दिसते. तिच्यासोबत पुढे असं काही भयानक होईल याची तिला जराही कल्पना नसते. खोल पाण्यात पोहताना, लक्ष नसताना एक शार्क मासा तिच्या आजूबाजूलाच असल्याची तिला जराही भनक नसते. हीच गोष्ट तिला मोठी महागात पडते. तिच्या बाजूलाच असलेला शार्क तिच्यावर हल्ला करतो. ही घटना कॅमेरात कैद झाली आहे. हा व्हिडीओ नादी अल तखीम नावाच्या एका ट्वीटर युजरने आपल्या अकाउंटवरून शेअर केला आहे. हा व्हिडीओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये तरुणी समुद्रात पोहताना दिसते. त्याचवेळी बाहेर उभे असलेले लोक तिला, शार्क तिच्याजवळ येत असल्याची सूचना देतात. हे ऐकून तरुणी घाबरते आणि किनाऱ्याजवळ येण्याचा प्रयत्न करू लागते.
काही वेळातच शार्क तिच्याजवळ येत असल्याचं ती स्वत: पाहते आणि जोरजोरात ओरडू लागते. त्यानंतर शार्क कदातिच तिचे पाय पकडून तिला खेचू लागतो. यावेळी अनेकदा तरुणी पाण्यात डुबत असल्याचंही व्हिडीओत दिसतंय.
हा व्हिडीओ इथेच संपतो. त्या शार्कने नेमकी त्या मुलीची शिकार केली की नाही याबाबत काही समजू शकत नाही. परंतु हा भयानक व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या चर्चेत आहे.