नेदरलँडविरुद्ध विनिंंग काँबिनेशन की टीममध्ये बदल?
सिडनी, 26 ऑक्टोबर: टी20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियासमोर पुढचं आव्हान आहे ते नेदरलँडचं. भारतीय संघ 27 ऑक्टोबरला सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर नेदरलँडविरुद्ध सुपर 12 फेरीतला आपला दुसरा सामना खेळणार आहे. पण रोहित शर्मा आणि भारतीय संघव्यवस्थापन या सामन्यासाठी संघात काही बदल करण्याची शक्यता आहे. त्यात सर्वात जास्त शक्यता आहे ती हार्दिक पंड्याला विश्रांती मिळण्याची. कारण हार्दिक टीम इंडियाचा अनुभवी ऑल राऊंडर आहे. त्यानं पाकिस्तानविरुद्ध बॅटिंग आणि बॉलिंगमध्ये मोलाचं योगदान दिलं. त्यामुळे नेदरलँडसारख्या दुबळ्या संघाविरुद्ध हार्दिकला विश्रांती दिली तर फारसा फरक पडणारा नाही. हार्दिकऐवजी दीपक हुडाचा पर्याय? नेदरलँडविरुद्ध हार्दिकला विश्रांती दिल्यास रोहित शर्माच्या हाताशी दीपक हुडाच्या रुपात चांगला पर्याय उपलब्ध आहे. जो मधल्या फळीत बॅटिंगसह ऑफ स्पिन बॉलिंगही करू शकतो. काल झालेल्या प्रॅक्टिस सेशनमध्ये त्यानं नेट्सममध्ये बराच वेळ सरावही केला होता. याशिवाय रिषभ पंतही मधळ्या फळीतला फलंदाज म्हणून खेळू शकतो.
रोहित-राहुलला संधी पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात टीम इंडियाची सलामीची जोडी लवकरच तंबूत परतली होती. रोहित आणि राहुलला प्रत्येकी 4 धावाच करता आल्या. पण नेदरलँडविरुद्ध एक मोठी खेळी करण्याची संधी या दोघांसमोर आहे. यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये त्या दोघांकडून मोठ्या अपेक्षा आहेत. हेही वाचा - T20 World Cup: ‘आता माझ्या घरावर कुणी दगड मारणार नाही’, टीम इंडियाचा ‘हा’ खेळाडू असं का म्हणाला? कशी आहे नेदरलँडची कामगिरी? पात्रता फेरीत यूएई आणि नामिबियाचा पराभव करून नेदरलँड संघानं सुपर 12 फेरी गाठली आहे. त्याच्याकडे बास डी लीड हा चांगला वेगवान गोलंदाज आहे. त्यानं आतापर्यंत 4 सामन्यात एकूण 9 विकेट घेतल्या आहेत. नेदरलँडकडे मॅक्सवेल ओदाऊद आणि भारतीय वंशाचा विक्रमजीत सिंग यासारखे फलंदाजही आहेत.
भारत-नेदरलँड पहिल्यांदाच सामना टी20च्या इतिहासात भारत आणि नेदरलँडमध्ये अद्याप एकही सामना झालेला नाही. त्यामुळे सिडनीच्या मैदानात नेदरलँडविरुद्ध टीम इंडिया पहिल्यांदाच खेळणार आहे. याआधी वन डे वर्ल्ड कपमध्ये भारताचा नेदरलँडशी दोन वेळा सामना झाला होता. पण टीम इंडियानं दोन्ही वेळा नेदरलँडला मात दिली होती.
हेही वाचा - MS Dhoni: धोनीच्या प्रॉडक्शन हाऊसचा पहिला सिनेमा ‘या’ भाषेत, पत्नी साक्षीचाही आहे खास ‘रोल’ भारतीय संघ - रोहित शर्मा (कर्णधार), लोकेश राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, युजवेंद्र चहल, मोहम्मद शमी, रवीचंद्रन अश्विन , हर्षल पटेल, दीपक हुडा, दिनेश कार्तिक, अर्शदीप सिंग नेदरलँड संघ - स्कॉट एडवर्ड्स, कॉलिन अॅकरमॅन, शारीझ अहमद, वॅन बीक, टॉम कूपर, ब्रेंडन ग्लोव्हर, वॅन डर गुटेन, फ्रेड क्लासेन, बास डी लीड, पॉल मिकरेन, वॅन डर मर्वे, स्टीफन मायबर्ग, तेजा, मॅक्स ओदाऊद, टीम प्रिंगल, विक्रमजीत सिंग