पुणे, 10 डिसेंबर : पुण्यात माझ्या कार्यालयाशी संबंधित असल्याचे सांगून एका अज्ञात व्यक्तीने एका व्यक्तीस पैशांची मागणी केल्याचा प्रकार समजला. असा कोणताही व्यक्ती माझ्या कार्यालयाशी संबंधित नाही. मी पुणे/पिंपjr-चिंचवड पोलिसांना आवाहन करतो, की या प्रकरणाचा तपास करून, संबंधितावर योग्य कार्यवाही करावी अशा आशयाचे ट्वीट करत धनंजय मुंडे यांनी केल्याने एकच गोंधळ उडाला आहे. धनंजय मुंडे यांच्या नावाचा वापर करून पैशाची मागणी करण्यात आल्याच प्रकार समोर आला आहे.
काल (दि.09) शुक्रवारी धनंजय मुंडे यांच्या ऑफिसमधून बोलतोय असा मेट्रोच्या सुरक्षाव्यवस्थापकाला फोन गेला. यानंतर त्या व्यक्तीने मुंडे यांचे नाव वापरत शिवीगाळ करत दम दिला. दरम्यान याप्रकरणी खळबळ माजली आहे. या प्रकरणी शिवदास साधू चिलवंत (41, रा. घरकुल, चिखली) यांनी चिखली पोलीस ठाण्यात तक्रार फिर्याद दिली. त्यानुसार फोन करणाऱ्या अज्ञात आरोपीविरोधात चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
हे ही वाचा : अधिवेशनाच्या तोंडावर मंत्रिमंडळाचा विस्तार नाहीच! शिंदेंनी सोपवली इतर मंत्र्यांवर जबाबदारी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे मेट्रोच्या सुरक्षेसाठी नेमलेल्या खासगी एजन्सीमध्ये व्यवस्थापक म्हणून काम करतात. शुक्रवारी सकाळी घरी त्यांच्या मोबाईलवर एका अनोळखी क्रमांकावरून फोन आला. फोनवर बोलत असणाऱ्या व्यक्ती तो धनंजय मुंडे यांच्या ऑफिसमधून बोलतो असल्याचे सांगत फिर्यादी यांच्याकडे पैशाची मागणी केली.
तसेच, शिवाजीनगर येथील डीएमच्या ऑफिसमध्ये पैसे आणून दे, असे म्हणून आरोपीने फिर्यादीला शिवीगाळ केली. याबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिली.
हे ही वाचा : मुख्यमंत्र्यांचं तोंड बंद का? शिंदे गटांचं चिन्ह कुलूप पाहिजे, संजय राऊत कडाडले
मेट्रोच्या सुरक्षेसाठी नेमण्यात आलेल्या खासगी एजन्सीमध्ये शिवदास चिलवंत हे व्यवस्थापक म्हणून काम करत आहेत. यावेळी त्यांना माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या कार्यालयातून बोलत असल्याचे सांगणारा फोन आला. मी धनंजय मुंडे यांच्या ऑफिसमधून बोलत आहे. तू मूळचा उस्मानाबाद येथील राहणारा आहेस. त्यामुळे शिवाजीनगर येथे धनंजय मुंडे यांच्या ऑफिसमध्ये पैसे आणून दे, असे म्हणत फोनवरुन त्या व्यवस्थापकाला शिवीगाळ करण्यात आली.