छगन भुजबळ
मुंबई, 5 जुलै : राष्ट्रवादीत दोन गट पडल्यानंतर आज राष्ट्रवादीसाठी महत्त्वाचा दिवस आहे. आज राष्ट्रवादीतील दोन्ही गटाच्या बैठका होत आहे. अजित पवार गटाच्या या बैठकीत सर्वात आधी छगन भुजबळ यांचे भाषण झाले. यावेळी छगन भुजबळ यांनी शरद पवार यांच्यासह त्यांच्या गटाच्या नेत्यांवर जोरदार निशाणा साधला. नेमकं काय म्हणाले छगन भुजबळ? तुरुंगातून आल्यावर मला आमिषं दाखवली गेली. पण आम्ही एकनिष्ठ राहिलो, साहेबांसोबत राहिलो, पण आता का? दिलीप वळसे पाटील आम्ही गेल्यानंतर त्यांच्या डोळ्यात पाणी तरळलं असं कळलं. शरद पवार साहेब आमचे विठ्ठल पण त्यांना बडव्यांनी घेरलं आहे. साहेब बडव्यांना बाजूला करा आणि आम्हाला आशीर्वाद द्यायला यावा.
आताची ही परिस्थिती पाहून साहेबांना वाईट वाटणं साहजीकच आहे, त्यांच्याबद्दल आमच्या मनात प्रेम आहे. पण साहेब आपण वसंतदादांना सोडलं, त्यांनाही असंच वाईट वाटलं. बाळासाहेबांनाही मी सोडलं, तुम्ही सांगितलं नाही तिकडे थांबा म्हणून. बाळासाहेब आणि मांसाहेबांनाही असंच वाईट वाटलं. इतकंच नव्हे तर धनंजय मुंडेंनाही इकडे घेतलं. त्यावेळी काका असलेले गोपिनाथ मुंडे आणि बहिण असलेली पंकजा यांच्या डोळ्यातही असेच अश्रू आले. या सगळ्याची पुनरावृत्ती व्हायला आली. आम्ही गेलो ते तुमच्याभोवती बडवे जमले आहेत, त्यांनी वाटोळं केलं. तुम्ही आवाज द्या, ही मंडळी तुमच्याकडे यायला तयार आहे. नागालँडला परमिशन दिली, आम्हालाही द्या. त्यांचा सत्कार केला आम्हालाही पोटाशी घ्या. आम्ही डिसक्वालिफाय होणार नाही, आम्हालाही कायदे कळतात, सगळी व्यवस्था केली आहे. घाबरायचं कारण नाही. आपण कार्यकर्ते आणि जनतेलाही न्याय देऊ, असे ते यावेळी म्हणाले. येत्या काही दिवसांमध्ये नियुक्त्या होतील. अजितदादांनी 21 तारखेच्या मीटिंगमध्ये सांगितलं, मुंबई-महिला अध्यक्ष तुम्ही नेमत नाही, काम कसं करायचं? पवार साहेबांनी सांगून सुद्धा कारभारी नेमणुका करत नव्हते. सहा महिने सांगितल्यानंतरही नेमणुका नाही, पक्ष काम कसं करणार? कार्यकर्ते नसतील तर पक्ष काम करू शकतो? 15 दिवस वाट पाहिली. होतच नव्हतं, शेवटी हे निर्णय घ्यावे लागले. कार्यकर्ते आमदारांचा आग्रह होता. हा आग्रह आजच सुरू झाला नाही. काही महिन्यांपासून याची प्रक्रिया सुरू झाली, असा खळबळजनक खुलासाही त्यांनी केला.