बेकरीचा व्हॅलेंटाईन डे मेनू सोशल मीडियावर व्हायरल
मुंबई, 9 फेब्रुवारी : व्हॅलेंटाइन्स डे जसा जवळ येतोय, तसतसं अनेकांच्या कल्पनांना धुमारे फुटताहेत. प्रेम व्यक्त करण्याचं हमखास निमित्त असलेल्या या दिवसासाठी प्रत्येकाच्या कल्पना वेगवेगळ्या असतील. केक विकत घेऊन तुमचं प्रेम व्यक्त करण्याचा विचार करत असाल, तर ‘ही’ पोस्ट तुम्हाला नक्कीच आवडेल. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या पोस्टमध्ये खास व्हॅलेंटाइन्स डेसाठी असलेल्या मेन्यूचा फोटो शेअर करण्यात आलाय. त्यातल्या केकची नावं ऐकून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल. वाचकांनीही त्याला खूप प्रतिसाद दिलाय. सोशल मीडियावर भरपूर व्हायरल होणाऱ्या या फोटोमध्ये एका बेकरीचा खास व्हॅलेंटाइन्स डेसाठीचा मेन्यू दिसतोय. आजपर्यंत कोणीच अशा पद्धतीचे केक विकत घेऊन हा दिवस साजरा केला नसेल. या मेन्यूचं वैशिष्ट्य असं, की त्यातला प्रत्येक केक नात्यांच्या विविध टप्प्यांशी संबंधित आहे. नात्याची सुरुवात होते तेव्हापासून ते एकतर्फी प्रेमापर्यंतचे केक तिथे आहेत. वाचा - दक्षिण कोरियामध्ये दर महिन्याच्या 14 तारखेला व्हॅलेंटाईन डे; प्रत्येक महिन्यात वेगळी मजा व्हायरल पोस्टमधल्या फोटोत बेकरीचं नाव राजा बेकरी असं दिसतंय. त्यात बेकरीच्या मालकानं केकच्या भरपूर व्हरायटीज उपलब्ध केल्या आहेत. दिलीय. या विशेष मेन्यूमध्ये गर्लफ्रेंड केक, मेरा बाबू केक, पहला प्यार केक, एकतरफा प्यार केक, प्यार में धोखा केक, हरामी दोस्ती केक, सिंगल के लिए केक, बॉयफ्रेंड केक अशी केकची नावं आहेत. त्यापैकी बॉयफ्रेंड आणि पहला प्यार केक सर्वांत महाग आहेत. प्रत्येक केकसमोर तो कसा असेल, याचा फोटोही लावण्यात आलाय. त्यामुळे ग्राहकांना केकची कल्पना येऊ शकते.
ही पोस्ट आतापर्यंत 13 हजारपेक्षा जास्त जणांनी लाइक केली आहे. अनेकांनी त्यावर कमेंट्सही लिहिल्या आहेत. त्यात काहींनी ब्रेकअप केक नसल्याबद्दल लिहिलंय. गर्लफ्रेंड केकपेक्षा बॉयफ्रेंड केक महाग का आहे, अशीही विचारणा काहींनी केलीय. व्हायरल झालेल्या फोटोमध्ये खाली लिहिलेल्या ‘नोट’चा भाग कापण्यात आलाय. त्याबाबतही अनेकांनी निराशा व्यक्त केलीय. त्यात काय आहे असंही अनेकांनी विचारलंय. ‘शेवटी कोणताही केक घेतला तरी कापलाच जाणार’ असंही काहींनी म्हटलंय. या पोस्टमधल्याप्रमाणे केकच्या व्हरायटीज क्वचितच एखाद्या दुकानात दिसतील. खास व्हॅलेंटाइन्स डेनिमित्त देण्यात येणाऱ्या केक्सची नावं खूपच मजेशीर आणि अनोखी आहेत. अशा पद्धतीचे हजारो मार्केटिंग फंडे व्यावसायिक वापरतात; मात्र राजा बेकरीच्या मालकाच्या या हटके क्लृप्तीला दाद द्यायलाच हवी!