नवी दिल्ली, 21 सप्टेंबर : गौरव गुलाटी नावाच्या एका व्यक्तीच्या OnePlus Nord 2 फोनचा स्फोट झाला. त्यानंतर कंपनीकडे याबाबत तक्रार करण्यात आली. तक्रार आल्यानंतर कंपनीने या व्यक्तीशी संपर्क साधला आणि नुकसान भरपाई देण्याचं सांगितलं. परंतु गौरव यांनी या प्रस्तावाचा स्वीकार केला नाही आणि न्यायालयात तक्रार दाखल केली. तसंच भारतात OnePlus Nord 2 ची विक्री थांबवण्याचं सांगितलं. आता भारतातील वनप्लस फोन मार्केटिंग आणि विक्री सांभाळणाऱ्या मोबीटेक क्रिएशन्स प्रायव्हेट लिमिटेडने गौरव गुलाटी यांना दिशाभूल करणारे ट्विट्स आणि वनप्लसची प्रतिष्ठा खराब केल्याबद्दल एक लेटर पाठवलं आहे.
वकील असलेल्या गौरव गुलाटी यांनी कंपनीने पाठवलेल्या लेटरचे फोटो शेअर केले आहेत. त्यांनी ट्विटमध्ये म्हटलंय, 'मी माझ्या मोबाईलच्या स्फोटाच्या घटनेनंतर मी जे काही सहन केलं आहे, त्याबद्दल आवाज उठवण्याबाबत मला कायदेशीर सूचना मिळाली आहे.'
कंपनीने दावा केला आहे, की गौरव गुलाटीने नुकसानाचा कोणताही पुरावा देण्यास नकार दिला आहे. ट्विटरवर त्यांनी जे फोटो पोस्ट केले आहेत, त्यानुसार बॅटरी पोलवर एक्सटर्नल फोर्स लावण्यात आल्याचं समजतंय. कंपनीने मदत करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांनी नकार दिला. त्यांनी केलेल्या टिपण्या या कोणत्याही चौकशीशिवाय केल्या आहेत, असं लेटरमध्ये सांगण्यात आलं आहे. तसंच, लेटरमध्ये ट्विटर पोस्ट न करण्याबाबत आणि जुने ट्विट्स हटवण्याबाबतही सांगण्यात आलं आहे. त्याशिवाय पोस्टबाबत माफी मागण्याचंही म्हटलं आहे.
काय आहे प्रकरण?
गौरव गुलाटी नावाच्या ट्विटर युजरने त्यांच्या OnePlus Nord 2 मध्ये आग लागली आणि फोन फुटल्याचं सांगितलं. फोन कोटच्या खिशात ठेवला असताना तो गरम झाल्याचं जाणवलं. त्यांनी फोन बाजूला फेकला आणि त्यानंतर फोनला आग लागली. त्यावेळी फोन चार्ज होत नसल्याचा दावा त्यांनी केला आहे. फोनमध्ये आधीपासूनच 90 टक्के बॅटरी असल्याचं सांगितलं.
या प्रकरणानंतर त्यांनी ट्विट करत संपूर्ण माहिती दिली. त्यानंतर वनप्लसने गौरव गुलाटी यांच्याशी संपर्क केला आणि त्यांचा फोन जमा करण्याचं सांगितलं. परंतु गौरव गुलाटी यांनी कायद्याचा मार्ग अवलंबला. त्यांनी जळलेला OnePlus Nord 2 पोलिसांकडे दिला आणि तक्रार दाखल केली.
सत्य परेशान हो सकता है लेकिन पराजित नहीं.... @barcouncilindia @OnePlus_IN @OnePlus_Support So I have recieved this legal notice for raising my voice for whatever i have gone through after my mobile blast incident. So this is the price i have to pay for being the whistleblower. pic.twitter.com/6hOxTMi6Vw
— GAURAV GULATI (@Adv_Gulati1) September 18, 2021
त्यानंतर वनप्लसने यावर स्पष्टीकरण देत सांगितलं, की व्यक्तीने OnePlus Nord 2 स्फोटाबाबत सांगितलं आणि आमची टीम तिथे पोहोचली. आम्ही युजर्सच्या सुरक्षिततेसाठी असे दावे अतिशय गंभीरपणे घेतो. आमच्या अनेक प्रयत्नांनंतरही आम्हाला त्या फोनच्या तपासणीची, चौकशीची संधी मिळाली नाही. अशा परिस्थितीत या दाव्याची सत्यता पडताळणी करणं किंवा नुकसान भरपाईसाठी व्यक्तीच्या मागण्या पूर्ण करणं अशक्य असल्याचं कंपनीने म्हटलंय.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Oneplus, Smartphone, Tech news