पुणे, 27 जानेवारी, जितेंद्र जाधव : 2024 च्या लोकसभा निवडणुकीबाबत नुकताच एक सर्व्हे समोर आला आहे. या सर्व्हेमधील आकडेवारी भाजपला धक्का देणारी आहे. या सर्व्हेच्या सर्वेक्षणानुसार भाजपला महाराष्ट्र, कर्नाटक आणि बिहारमध्ये मोठा फटका बसू शकतो. तर आसाम, उत्तर प्रदेश, तेलंगणा आणि पश्चिम बंगालमध्ये भाजपच्या जागा वाढू शकतात. यावर आता राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. महाराष्ट्रामध्ये प्रचंड अस्वस्थता आहे. ज्या पद्धतीने सध्या राज्यकारभार सुरू आहे, त्यामुळे लोकांच्या मनात रोष निर्माण झाल्याचं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.
नेमकं काय म्हटलं सुप्रिया सुळे यांनी?
महाराष्ट्रामध्ये प्रचंड अस्वस्थता आहे. ज्या पद्धतीने हे राज्यसरकार कारभार करत आहे त्यातून महाराष्ट्राचे सामाजिक आणि आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणावर झाले आहे. लोकांच्या मनात अर्थातच रोष आहे, लोकांना ही गद्दारी आवडलेली नाही आणि त्यामुळे आता जे सर्वेक्षण झालेले आहे ते बेरोजगारी, महागाई आणि सर्वसामान्य महाराष्ट्रातील जनतेला असलेल्या अडचणी दाखवून देते असं सुळे यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा : महाराष्ट्रात आज निवडणुका झाल्या तर...भाजपचं टेन्शन वाढवणारा सर्व्हे!
दौंड हत्याकांडावर प्रतिक्रिया
दरम्यान यावेळी सुप्रिया सुळे यांनी दौंड हत्याकांड आणि नाशिकच्या ऑनर किलिंगवर देखील प्रतिक्रिया दिली आहे. दौंड हत्याकांडावर बोलताना त्यांनी म्हटलं की, या प्रकरणाची सविस्तर चौकशी व्हायला हवी. मी पुण्याचे पालकमंत्री आणि पुणे जिल्ह्याच्या पोलीस अधिक्षकांना विनंती करते की, या प्रकरणाची चौकशी पारदर्शक पद्धतीने करून पीडित कुटुंबाला न्याय द्यावा.
हेही वाचा : भगतसिंह कोश्यारी यांच्या राजीनाम्यानंतर नवे राज्यपाल कोण? मोठी अपडेट आली समोर!
नांदेडमध्ये प्रेमसंबंधातून आई, वडिलांनीच आपल्या मुलीची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेनं राज्यात खळबळ उडाली आहे. या घटनेवर प्रतिक्रिया देताना सुप्रिया सुळे यांनी म्हटलं की, पुरोगामी महाराष्ट्रात अशा प्रकारे ऑनर किलिंगच्या घटना घडनं दुर्दैवी आहे. पोलिसांनी या प्रकरणात तातडीनं कारवाई करत आरोपींना अटक केली आहे. पोलिसांच्या या कारवाईचं मी स्वागत करते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: BJP, Devendra Fadnavis, Election, NCP, Supriya sule