नागरिकत्व दुरुस्ती विधेयकावर शिवसेनेचा यूटर्न, या आहेत आजच्या 10 ठळक बातम्या

नागरिकत्व दुरुस्ती विधेयकावर शिवसेनेचा यूटर्न, या आहेत आजच्या 10 ठळक बातम्या

राज्यासह देशभरातील आजच्या महत्त्वाच्या बातम्यांचा थोडक्यात आढावा.

  • Share this:

मुंबई, 11 डिसेंबर : राज्यात एका बाजूला खातेवाटपावरून रस्सीखेच सुरू आहे. खातेवाटपाबाबात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसमध्ये ताळमेळ न बसल्यानं विलंब होत असल्याच्या चर्चा आहेत. तर दुसरीकडे आज मोदी सरकारची राज्यसभेत अग्निपरीक्षा आहे. आर्टीकल 370, तीन तलाकनंतर आता नागरिकत्व सुधारणा विधेयक मंजूर करून घेण्यासाठी मोठी कसोटी लागणार आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यासह देशातील महत्त्वाच्या आजच्या ठळक घडामोडी.

1. मुंबईत बुधवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. याबैठकीत आता ठाकरे सरकार कोणता निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे. ठाकरे सरकारनं सत्तेवर आल्यानंतर निर्णयांचा धडाका लावला. मोदी सरकारचा महत्त्वाकांक्षी बुलेटट्रेन प्रकल्प, आरे कारशेडचं काम थांबवण्याचा निर्णय ठाकरे सरकारनं घेतला आहे. शेतकऱ्यांसाठी कोणता मोठा निर्णय होणार का याकडे सर्वांचं लक्ष आहे.

2. खातेवाटपाबाबत अद्यापही संभ्रम असल्यानं त्याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. बुधावरी होणाऱ्या बैठकीत तरी याबाबत निर्णय होतो का हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे. खातेवाटपाबाबत 22 डिसेंबरपर्यंत वाट पाहावी लागते का? मंत्रिमंडळ विस्तार अधिवेशनाआधी की नंतर असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.

वाचा-QUIZ नागरिकत्व सुधारणा विधेयक : किती माहिती आहे तुम्हाला CAB बद्दल? क्वीझ सोडवा

3. एकनाथ खडसे शिवसेनेत जाण्याबाबत राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं होतं. त्यावर खडसेंची नाराजी लवकरच दूर करू असं सुधीर मुनगंटीवर यांनी कोअर

कमिटीच्या बैठकीनंतर सांगितलं आहे. तर दुसरीकडे या बैठकीला पंकजा मुंडे या गैरहजर असल्यानं त्याही नाराज आहेत का? हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे. तसंच 12 डिसेंबरला गोपीनाथ गडावरच्या कार्यक्रमात पंकजा मुंडे त्यांचा काय निर्णय जाहीर करणार याकडे सर्वांचं लक्ष आहे. त्यामुळे भाजपच्या गोटातील धाकधूकही वाढली आहे.

4. नागरिकत्व सुधारणा विधेयक बुधवारी दुपारी राज्यसभेत मांडलं जाणार आहे. बहुमतानं या विधेयकाला मंजुरी मिळावी यासाठी मोदी सरकारची परीक्षा असणार आहे. तर काही मुद्द्यांच्या स्पष्टतेशिवाय राज्यसभेत विधेयकाला पाठिंबा नाही, काँग्रेसच्या नाराजीनंतर शिवसेनेनं यूटर्न घेतल्यानं मोदी सरकारच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

5. नागरिकत्व कायद्यावर जोपर्यंत स्पष्ट माहिती समोर येत नाही, तोपर्यंत आम्ही पाठिंबा देणार नसल्यांच उध्दव ठाकरेंनी स्पष्ट केलं आहे. नागरिकत्व सुधारणा विधेयक राज्यसभेत आल्यावर काय करायचं ते ठरवू, असं मंत्रालयात त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी सांगितलं आहे.

6. हैदराबाद एन्काऊंटरप्रकरणी सुप्रीम कोर्टात बुधवारी सकाळी सुनावणी होणार आहे. पोलिसांची भूमिका संशयास्पद, सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. आरोपींच्या मृतदेहांवर अद्यापही अंत्यसंस्कार नाही.

वाचा-मोदी सरकारची आज राज्यसभेत कसोटी; CAB पास होण्यासाठी असं असेल गणित

7. सार्वजनिक ठिकाणी मोबाईल चार्ज करु नका, महत्वाचा मोबाईल डाटा चोरीची शक्यता, एसबीआयकडून व्हीडिओ जारी करत सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.

8.इस्त्रोकडून बुधवारी दुपारी पीएसएलव्हीसीचं आज पन्नासावं उड्डाण होणार आहे. श्रीहरीकोटाच्या सतीश धवन अवकाश केंद्रावरून हे प्रक्षेपण कऱण्यात येईल. PSLVच्या पन्नासाव्या उड्डाणातून 625 किलो वजनाच्या 'रिसॅट 2 बीआर 1' या उपग्रहाचे 576 किलोमीटरच्या कक्षेत प्रक्षेपण करण्यात येणार आहे.

9. मुंबईतील विविध जलाशयांमध्ये एक मोठा विषाणू आढळून आला आहे. याला शास्त्रज्ञांनी 'वांद्रे मेगाव्हायरस', 'कुर्ला व्हायरस' अशी नावे दिली आहेत. हा विषाणू महाकाय असला तरीही यापासून कोणता धोका निर्माण होऊ शकतो का याबाबत माहिती समोर आली नाही.

10. वानखेडे स्टेडीयमवर बुधवारी भारत विरुद्ध वेस्ट इंडिज टी- 20 मालिकेतील तिसरा सामना रंगणार आहे. मालिका खिशात घालण्यासाठी विराटसेना सज्ज झाली आहे.

----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 11, 2019 07:45 AM IST

ताज्या बातम्या