नवी दिल्ली, 28 फेब्रुवारी : अयोध्येतील (Ayodhya) राम मंदिर (Ram Mandir) निर्माणासाठी दान जमा करण्याचं अभियान (Ram temple donation campaign) शनिवारी पूर्ण झालं. मिळालेल्या माहितीनुसार, जानेवारीमध्ये सुरू झालेल्या या अभियानात आतापर्यंत जवळपास 2 हजार कोटी रुपये दान जमा झालं आहे. राम मंदिरासाठी आलेला पैसा मोजण्याचं काम अद्यापही सुरुच आहे. त्यामुळे या दानात आणखी भर पडू शकते. मंदिरासाठीच हे दान देश-विदेशातून आलं आहे. यादरम्यान विश्व हिंदू परिषदेने (VHP) लोकांना आवाहन केलं आहे की, जर अद्यापही कोणाला राम मंदिरासाठी दान द्यायचं असेल, तर ते स्थानिक टीम किंवा ऑफिसमध्ये संपर्क करू शकतात.
राम मंदिर निधी समर्पण मोहिमेची सुरुवात मकर संक्रांतीच्या दिवशी 15 जानेवारीपासून सुरू करण्यात आली होती. या दरम्यान मंदिरासाठी दान जमा करण्यासाठी यासाठी असलेल्या टीमने मिळून 5 लाख गावांचा दौरा केला होता. स्वयंसेवकांद्वारा मिळालेलं स्वेच्छा दान, श्री राम तीर्थ ट्रस्टच्या SBI/PNB/BOB खात्यातील स्थानिक शाखांमध्ये जमा करण्यात आलं होतं. या ट्रस्टकडेच मंदिर बांधण्याची जबाबदारी आहे.
दान आलेली रक्कम वाढण्याची शक्यता -
अयोध्येतील विश्वस्त कार्यालयाचे प्रभारी प्रकाश गुप्ता यांनी इंग्रजी वृत्तपत्र द इंडियन एक्सप्रेसशी बोलताना, सध्या त्यांच्याकडे अंदाजे 2000 कोटी रुपये रक्कम जमा झाल्याचं सांगितलं. तसंच आलेली रक्कम मोजण्यासाठी आणि ऑडिटच्या संपूर्ण प्रक्रियेसाठी एक महिन्याचा कालवधी लागू शकतो. अनेक चेक बँकेत आहेत आणि शुक्रवारपासून तीन दिवस बँका बंद होत्या. त्यामुळे अनेक चेक क्लियर करणं बाकी आहे. त्यामुळे ही रक्कम अधिक वाढू शकते.
राम मंदिराच्या पाया भरणीचं काम येत्या 15 दिवसांत सुरू होणार आहे. सध्या मंदिराच्या पायाभरणीसाठी खोदण्याचं काम वेगात सुरू आहे. राम मंदिर लोक सहभागातूनच उभारण्यात येत आहे. मंदिरासाठी केंद्र सरकार कसलीही आर्थिक मदत करणार नाही. 15 जानेवारी ते 27 फेब्रुवारीपर्यंत देशभरात राम मंदिरासाठी देणगी अभियान राबवण्यात येत होतं. यासाठी दीड लाख स्वयंसेवक सहभागी झाले असल्याचं, रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंद देवगिरी महाराज यांनी सांगितलं होतं.
तसंच, मुख्य मंदिरासाठी एकूण 300 कोटी खर्च, तर संपूर्ण परिसराचा विकास धरुन 1100 कोटी खर्च अपेक्षित आहे. निधी संकलनाच्या दुसऱ्या दिवशीच पैसे बँकेत भरले जाणार आहेत. निधीचा गैरवापर होऊ नये याची पूर्ण काळजी घेण्यात येईल, असंही स्वामी गोविंद देवगिरी महाराज यांनी यापूर्वी सांगितलं होतं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Ayodhya ram mandir, BJP, Money, PM narendra modi, Ram Mandir, Ram mandir donation, Shivsena