नवी दिल्ली 28 फेब्रुवारी : नरेंद्र मोदी (Narendra Modi) मागील सात वर्षांपासून देशाची पंतप्रधान आहेत. याशिवाय 13 वर्ष ते गुजरातचे मुख्यमंत्री होते. मोदी हे जवळपास मागील 4 दशकांपासून राजकारणात सक्रीय आहेत. मात्र, या सगळ्याशिवाय त्यांना एक भाषा आतापर्यंत न शिकल्याचा पश्चाताप आहे. ती भाषा म्हणजेच तमिळ (Tamil). . पंतप्रधानांनी आपल्या मन की बात (Man ki Baat) या कार्यक्रमात बोलताना याबद्दलची माहिती दिली आहे. मोदी म्हणाले,की जगातील सगळ्यात जुनी भाषा तमिळ न शिकण्याचं त्यांना दुःख आहे. याशिवाय आपल्या अर्ध्या तासाच्या या कार्यक्रमात त्यांनी पाण्याचा जपून वापर करण्याबाबतही जनतेला आवाहन केलं.
मन की बातमध्ये बोलताना मोदी म्हणाले, की काही दिवसांपूर्वी हैदराबादच्या अपर्णा रेड्डी यांच्या एका प्रश्नानं मोदींना बुचकळ्यात पाडलं. रेड्डी यांनी मोदींना विचारलं की, इतक्या वर्षापासून तुम्ही पंतप्रधान आहात, त्याआधी अनेक वर्ष मुख्यमंत्री होता. तुम्हाला असं कधी वाटतं का, की स्वतःमध्ये काही कमी राहिली आहे. पंतप्रधान म्हणाले, की अपर्णा यांच्या प्रश्नाचं उत्तर सोपं आणि अवघड दोन्ही होतं. ते म्हणाले, की कधी कधी खूप सोपे प्रश्नही आपल्याला विचार करण्यास भाग पाडतात. हे प्रश्न सोपे असतात मात्र मनापर्यंत पोहोचतात.
पीएम मोदी म्हणाले, की अपर्णा यांच्या प्रश्नानं त्यांना काही वेळ विचार करण्यास भाग पाडलं. मोदी म्हणाले, मी या प्रश्नाचा विचार केला आणि स्वतःलाच म्हटलं, की माझ्यातील एक कमी ही आहे की मी जगातील सगळ्यात प्राचीन भाषा तमिळ शिकण्यासाठी जास्त प्रयत्न करू शकलो नाही. ही एक अशी सुंदर भाषा आहे, जी जगभरात लोकप्रिय आहे. अनेकांनी मला तमिळ साहित्याचं वेगळंपण आणि यातील कवितांची सखोलता यांच्याबद्दल सांगितलं आहे.
तमिळचा इतिहास -
तमिळ दक्षिण आशियातील अतिशय लोकप्रिय भाषा आहे. ही भाषा भारतात तमिळनाडू आणि पुद्दुचेरीमध्ये बोलली जाते. याशिवाय ही भाषा श्रीलंका आणि सिंगापूरमध्येही लोकप्रिय आहे.