Home /News /mumbai /

अन् संयमाचा बांध सुटला; आतापर्यंत समोर न आलेली एकनाथ शिंदेंच्या बंडामागील धक्कादायक कारणं

अन् संयमाचा बांध सुटला; आतापर्यंत समोर न आलेली एकनाथ शिंदेंच्या बंडामागील धक्कादायक कारणं

एकनाथ शिंदे यांनी खूप गरीब कुटुंबातून कष्ट करून नाव कमावलं आहे. ऑटो रिक्षा आणि टेम्पो ड्रायव्हर म्हणूनही त्यांनी काम केलं आहे. समर्पण भावनेने काम करण्याची वृत्ती, तल्लख बुद्धी आणि धोरणात्मक नियोजन या गुणांमुळे त्यांनी पक्षात मोठी प्रगती केली.

पुढे वाचा ...
    नवी दिल्ली, 21 जून : शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि विद्यमान मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केलेल्या बंडामुळे राज्यातल्या महाविकास आघाडी सरकारला (MVA Government In Maharashtra) मोठा धक्का बसला आहे. एकनाथ शिंदे दुखावलेले असून, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर ते नाराज असल्याचं बोललं जात आहे. तसंच, आदित्य ठाकरेंना दिलं जात असलेलं जास्तीचं महत्त्वही त्यांना रुचत नसल्याचं एक कारण सांगितलं जात आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ही तणावाची स्थिती काही काळापासून होती; मात्र अशा प्रकारे त्याचा स्फोट होईल, असा अंदाज महाविकास आघाडीमधल्या अनेकांना नव्हता. कारण दोनच दिवसांपूर्वी शिवसेनेच्या 56व्या वर्धापनदिनानिमित्तच्या कार्यक्रमात एकनाथ शिंदे उद्धव ठाकरे आणि शिवसेनेतल्या अन्य नेत्यांसमवेत उपस्थित होते. तसंच, त्यांनी त्या कार्यक्रमाचे फोटोजही शेअर केले होते. तसंच, गेल्या आठवड्यात आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांचा बहुचर्चित अयोध्या दौरा झाला, त्यातही एकनाथ शिंदे सहभागी झाले होते; पण सूत्रांच्या म्हणण्यानुसार, मुख्यमंत्र्यांसोबत (CM Uddhav Thackeray) त्यांचा संवाद फारसा होत नव्हता. त्यांना पक्षात फ्रस्ट्रेशन आल्यासारखं वाटत होतं. संवादात असलेल्या या दरीचा फायदा भारतीय जनता पक्षाने बरोबर करून घेतला असल्यासारखं वाटत आहे. सूत्रांनी असाही दावा केला आहे, की ज्या नागरी विकास आणि सार्वजनिक बांधकाम मंत्रालयाचे शिंदे हे मंत्री आहेत, त्याचा कारभारही त्यांना स्वतंत्रपणे चालवू दिला जात नव्हता. त्यांच्या मंत्रालयातल्या सगळ्या घडामोडींवर मुख्यमंत्री कार्यालयाचं सातत्याने आणि बारकाईने लक्ष असे. तसंच, महत्त्वाच्या सर्व निर्णयांना मुख्यमंत्री कार्यालयाची परवानगी पहिल्यांदा घ्यावी लागे. काही जण असाही आरोप करतात, की आदित्य ठाकरे शिंदे यांच्या मंत्रालयांच्या कारभारात हस्तक्षेप करत होते. एकनाथ शिंदे हे ज्येष्ठ नेते असून, याआधी देवेंद्र फडणवीसांच्या (Devendra Fadnavis) नेतृत्वाखालच्या सरकारमध्येही शिंदेंनी मंत्रिपद सांभाळलं होतं. फडणवीस यांच्याशी शिंदे यांचे चांगले संबंध असून, ते आत्ता भाजपला अनुकूल ठरल्याचं बोललं जात आहे. शिवसेनेत असलेलं गैरव्यवस्थापन, तसंच आघाडीमध्ये संजय राऊत यांचा शब्द अंतिम मानला जाणं या गोष्टींना एकनाथ शिंदे वैतागले असावेत, असं सूत्रांकडून समजतं. शिंदेंचे समर्थक, तसंच पक्षातल्या अनेकांनी सांगितलं, की शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सहकार्य करत नाहीत, अशा तक्रारी शिवसेना आमदारांनी केल्या होत्या. तसंच, उद्धव ठाकरेही त्यांना भेटत नव्हते. त्यामुळे अधिकच फूट पडत गेली. भाजपच्या सूत्रांचा असा दावा आहे, की जवळपास 24 आमदार शिंदेंसोबत आहेत आणि ते सारे जण आता शिंदेंसोबत सुरतमध्ये (Surat) आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पक्षातल्या अन्य एका वरिष्ठ नेत्याकडून अन्य आमदारांसमोर अपमान केला गेल्यामुळे शिंदे दुखावले गेले होते. स्थानिक निवडणुका स्वबळावर लढल्या जाव्यात, असं मत शिंदेंनी व्यक्त केलं होतं. शिवसेना स्वतःच्याच पक्षकार्यकर्त्यांचा आदर करत नसल्याची भावनाही त्यांच्या मनात घर करून राहिली होती. त्या सगळ्यावर कडी म्हणून की काय, विधान परिषद आणि राज्यसभा निवडणुकीची जबाबदारी युवा सेनेच्या दोन नेत्यांसह संजय राऊत यांच्याकडे देण्यात आली. 2019मध्ये मुख्यमंत्रिपदाचं स्वप्न दिसलेले एकनाथ शिंदे या सगळ्यामुळे पुन्हा एकदा दुखावले गेले. कारण उद्धव ठाकरेंकडून त्यांच्याकडे दुर्लक्ष करण्यात आलं. याचा परिणाम विधान परिषद निवडणुकीवरही झाल्याचं दिसून आलं. शिवसेनेच्या मतदारांनी क्रॉस व्होटिंग केल्यामुळे भाजपला या निवडणुकीत मोठा विजय मिळाला आणि त्यांचे पाचही उमेदवार निवडून आले. एकनाथ शिंदे हे मोठा जनाधार असलेले नेते मानले जातात. अशा या ज्येष्ठ नेत्याच्या कामात सारखी ढवळाढवळ आणि हस्तक्षेप, तसंच मुख्यमंत्री आणि पक्षप्रमुख, तसंच त्यांच्या कुटुंबीयांकडून केलं जाणारं दुर्लक्ष यांमुळे त्यांनी महाविकास आघाडी सरकारविरोधात टोकाचं पाऊल उचललं असावं, असा अंदाज सूत्रांनी व्यक्त केला आहे. काँग्रेसमधल्या (Congress) एका ज्येष्ठ नेत्याने आपलं नाव गुप्त राखण्याची अटीवर काही माहिती दिली. '2019 साली जेव्हा अशी घोषणा करण्यात आली, तेव्हा एकनाथ शिंदेंचं नाव सर्वांत आघाडीवर होतं. संजय राऊत आणि सुभाष देसाई या नेत्यांनी सुचवलं, की शिंदेंपेक्षा उद्धव ठाकरे हाच मुख्यमंत्रिपदासाठी अधिक चांगला पर्याय आहे. त्यानंतर उद्धव ठाकरेच मुख्यमंत्री झाले. तेव्हा साहजिकच एकनाथ शिंदे दुखावले गेले. विधान परिषद आणि राज्यसभा निवडणुकीची जबाबदारी संजय राऊत यांच्याकडे देणं ही यावरची कडी होती. शिंदे यांचा सरकार पाडण्याचा प्लॅन आहे, की ते शिवसेनेसोबत चर्चा करून त्यांचं पुढचं धोरण ठरवतील, याची आम्हाला कल्पना नाही,' असं या नेत्याने सांगितलं. आज शिंदे यांनी तेच धोरण अवलंबलं आहे, जे 2019मध्ये महाविकास आघाडी सरकारच्या स्थापनेवेळी साऱ्या आमदारांना एकत्र करण्यासाठी त्यांनी वापरलं होतं. सगळ्या आमदारांना तेव्हाही एका रिसॉर्टमध्ये असंच एकत्र करण्यात आलं होतं, जेणेकरून त्यांच्यावर नजर ठेवणं शक्य होऊ शकेल. 2019च्या विधानसभा निवडणुकीवेळी शिंदे यांच्याकडे शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या पक्षांच्या आमदारांवर लक्ष ठेवण्याची, त्यांची काळजी घेण्याची जबाबदारी देण्यात आली होती. तिन्ही पक्षांच्या आमदारांना त्या वेळी मुंबईतल्या वेगवेगळ्या रिसॉर्ट्समध्ये ठेवण्यात आलं होतं. त्यांनी त्या वेळी वाहतूक आणि राहण्याचा खर्चही उचलला होता. आता त्यांनी 20पेक्षा अधिक आमदारांना एकत्र आणून उद्धव ठाकरेंविरोधात बंड करण्यासाठी सुरतच्या रिसॉर्टमध्ये ठेवलं आहे. एकनाथ शिंदे यांनी खूप गरीब कुटुंबातून कष्ट करून नाव कमावलं आहे. ऑटो रिक्षा आणि टेम्पो ड्रायव्हर म्हणूनही त्यांनी काम केलं आहे. समर्पण भावनेने काम करण्याची वृत्ती, तल्लख बुद्धी आणि धोरणात्मक नियोजन या गुणांमुळे त्यांनी पक्षात मोठी प्रगती केली. लवकरच ते उद्धव ठाकरे यांच्या आतल्या वर्तुळातले नेते म्हणून ओळखले जाऊ लागले. त्यांच्याकडे उत्तम संघटन कौशल्य आणि प्रशासकाचे गुण आहेत. मंगळवारी (21 जून) सकाळी लवकर देवेंद्र फडणवीस दिल्लीला रवाना झाले. त्यामुळे अजूनही शिंदेंशी जवळीक असलेले फडणवीस आणि भाजप (BJP) यांचे राज्याच्या राजकारणाचं चित्र बदलवण्यासाठीचे प्रयत्न सुरू असावेत, अशी चर्चा आहे, असं पक्षातल्या एका नेत्याने सांगितलं.
    First published:

    Tags: Eknath Shinde, Mla, Shivsena, Surat

    पुढील बातम्या