मुंबई, 10 जुलै : शिवसेनेत (Shiv Sena) बंडखोरीमुळे मोठं खिंडार पडल्याचं चित्र आहे. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी दोन आठवड्यांपूर्वी बंडखोरी केल्याने पक्षाला मोठा फटका बसला आहे. शिवसेनेचे तब्बल 39 आमदार हे एकनाथ शिंदे यांच्या बाजूने आहेत. एकनाथ शिंदे यांनी भाजपशी (BJP) हातमिळवणी केल्याने ते आता सत्तेत मुख्यमंत्रीदेखील झाले आहेत. या सर्व घटनेनंतर शिवसेनेचे सत्तेतील मित्रपक्ष असलेल्या काँग्रेसमधील ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) नेतृत्वात कमी पडल्याचा ठपका ठेवला होता. त्यांच्या या टीकेमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. चव्हाण यांच्या टीकेनंतर राज्यातील सर्वसामान्यांमध्येही याबाबतच्या विविध चर्चांना उधाण आलं आहे. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांना प्रश्न विचारला असता त्यांनी सुरुवातीला आपल्याला या चर्चांविषयी कल्पना नसल्याचं उदाहरण दिलं. त्यानंतर त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या आजारपणाचं कारण सांगितलं. शरद पवार नेमकं काय म्हणाले? “अशी चर्चा शिवसैनिकांमध्ये आहे हे माझ्या कानावर तरी आतापर्यंत आलं नव्हतं. मी कधी ऐकलंही नव्हतं. पण एक गोष्ट खरीय त्यांच्या शारिरीक प्रश्नांसमोर त्यांना मर्यादा आल्या होत्या ही गोष्ट खरी आहे. ते आजारी असताना सुद्धा राज्याची जबाबदारी आहे, हे लक्षात घेऊन त्यांनी त्या आजारातसुद्धा अनेकदा बैठका घेतल्या आणि अधिकाऱ्यांची चर्चा केली. पण त्याचा गाजावाजा केला नाही. यापेक्षा दुसरं काही नाही”, अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली. ( महाराष्ट्र काँग्रेसमध्ये संशयकल्लोळ, प्रचंड गोंधळाची स्थिती, पक्षाला मजबूत करण्यासाठी सोनियांचं कारवाईचं हत्यार ) खरी शिवसेना कोणती? शरद पवार म्हणतात… शरद पवारांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांना खरी शिवसेना कोणती? असा प्रश्न विचारल्यावर त्यांनी महत्त्वाची प्रतिक्रिया दिली. खरी शिवसेना कोणती “हे उद्या कोर्ट सांगेल ना? हे दोघं आमचीच खरी शिवसेना आहे, असं म्हणत आहेत. असे प्रश्न सध्या न्यायप्रविष्ट आहेत. त्याला काही पद्धती आहेत. या सगळ्या संकटातून मी स्वत: एकदा गेलो आहे. अशा गोष्टी राजकारणात होत असतात. त्याचा अंतिम निर्णय शेवटी निवडणूक आयोग देत असतं. तो निकाल लवकर येईल, अशी अपेक्षा आहे”, असं शरद पवार म्हणाले.
शरद पवारांचे बंडखोरांना राजकीय चिमटे दरम्यान, बंडाच्या कारणामागे सांगितल्या जाणाऱ्या निर्णयाला आधार नाही. या निर्णयाला काहीच आधार दिसत नाही. त्यामुळे भविष्यात बंडखोरांना जनतेसमोर येऊन खरं कारण सांगावं लागेल, असं शरद पवार म्हणाले. “राज्यात मध्यावधी निवडणुका लागतील असं मी म्हणालो नाही. पुढील निवडणुकांसाठी आतापासूनच तयारीला लागा असं सांगितलं आहे. आपल्या हातात दोन वर्ष आहेत. हे लक्षात ठेऊन कामाला लागलं पाहिजे. 2024 साली निवडणूक एकत्र लढवावी अशी मनस्थिती आहे. मविआ म्हणून एकत्र लढावं अशी माझी इच्छा आहे. पण, अद्याप एकत्र लढवण्यावर चर्चा नाही. जेव्हा परिस्थिती येईल तेव्हा ठरवू”, असं पवार म्हणाले. शिंदे यांचं बंड एका दिवसात झालं नाही. बहुमत चाचणीसाठी राज्यपालांनी जी तत्परता दाखवली. अशी तत्परता दाखवणारे पहिले राज्यपाल. पहिल्यांदाच 48 तासांत बहुमत चाचणीचा निर्णय देण्यात आला. औरंगाबादच्या निर्णयाबाबत सुसंवाद नव्हता. मंजुर झाल्यानंतर आम्हाला माहिती मिळाली, अशीही कबुली पवार यांनी दिली. संजय राऊत यांच्यावर टीका करणारे आधी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते, असा टोला पवार यांनी बंडखोर नेते दीपक केसरकर यांना लगावली.