ठाकरे सरकारचा भाजपला आणखी एक दणका, 'हा' निर्णय केला रद्द

ठाकरे सरकारचा भाजपला आणखी एक दणका, 'हा' निर्णय केला रद्द

ठाकरे सरकारकडून फडणवीस सरकारच्या काळात घेण्यात आलेल्या निर्णयांना स्थगिती देण्याची मालिका सुरू आहे

  • Share this:

मुंबई, 26 फेब्रुवारी : महाविकास आघाडी सरकारकडून फडणवीस सरकारच्या काळात घेण्यात आलेल्या निर्णयांना स्थगिती देण्याची मालिका सुरू आहे. भाजपचे मुख्य प्रवक्ते माधव भांडारी यांची पुनर्वसन प्राधिकरणावरची नियुक्ती शासनाने रद्द केली आहे.

महाविकास आघाडी सरकारने आज प्राधिकरण आणि महामंडळांवरच्या अनेक नियुक्त्या रद्द केल्या आहे. यामध्ये महाराष्ट्र राज्य पुनर्वसन प्राधिकरण तथा पुनर्स्थापना संनियंत्रण समितीच्या उपाध्यक्ष पदावरून पदावरून भाजपचे प्रवक्ते माधव भांडारी यांना हटवण्यात आलं आहे. एप्रिल 2018 ला भांडारी यांची या पदावर नियुक्ती करून मंत्रिपदाचा दर्जा देण्यात आला होता. या समितीची पुनर्रचना करून आता आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभागाच्या राज्यमंत्र्यांची उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

राज्य शासनाचे प्रकल्पबधितांचे पुनर्वसन,  पुनर्वसनासंबंधी आर्थिक आणि प्रशासकीय निर्णय, संबंधीत यंत्रणेला निर्देश देणे आणि निर्णयांची अंमलबजावणी करण्याचे काम या प्राधिकरणामार्फत केले जाते.

मराठी भाषा ही शक्ती आणि भक्तीची भाषा - मुख्यमंत्री

दरम्यान, मराठी भाषेला अनेक वर्षांचा इतिहास लाभला आहे. मराठी भाषेचे साहित्य, संस्कृती आणि इतिहास हा खूप मोठा आहे. मराठी भाषा ही खऱ्या अर्थाने शक्ती आणि भक्तीची भाषा असून आपण सर्वांनी मिळून ही भाषा जपली पाहिजे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करेल,  असं मुख्यमंत्री उद्धव  ठाकरे यांनी विधानपरिषदेत सांगितलं.

मराठी शाळांमध्ये मराठी भाषेचे सक्तीचे अध्यापन  आणि अध्ययन विधेयक मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांनी मांडले. हे विधेयक विधान परिषदेत एकमताने संमत करण्यात आले. या विधेयकाच्या वेळी झालेल्या चर्चेत मुख्यमंत्री बोलत होते.

'मराठी हा सर्वांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. मराठी भाषा ही छत्रपती शिवरायांची भाषा असून आज्ञापत्र  देणारी ही मराठी भाषा आहे. समाज म्हणजे काय, जगायचं कसं हे मराठी भाषेने शिकविले. इंग्रजांना वठणीवर आणणारी मराठी भाषा होती. सरकारचे डोके ठिकाणावर आहे का, असे ठणकावून मराठी भाषेतूनच लोकमान्य टिळकांनी सांगितले. देशाची राज्यघटना लिहिलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकर,  शेतकऱ्यांच्या समस्या मांडणारे महात्मा फुले हेही मराठी होते हीच मराठीची शक्ती,' असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले.

कुठल्याही भाषेचा दुःस्वास करावा असं, शिकविलं नाही. त्यामुळे मराठी भाषेच्या अनेक चांगल्या गोष्टी आहेत. त्या आपण जपल्या पाहिजेत, आत्मसात केल्या पाहिजे. मराठीची संस्कृती आपण जपली पाहिजे, असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. विधेयकावरील चर्चेत विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, सदस्य  दिवाकर रावते, शरद रणपिसे, हेमंत टकले यांनी भाग घेतला.

First published: February 26, 2020, 11:39 PM IST

ताज्या बातम्या