मुंबई, 26 जुलै : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामनाला दिलेल्या मुलाखतीत अनेक प्रश्नांची उत्तरे दिली. खासदार संजय राऊत यांनी घेतलेल्या या मुलाखतीत उद्धव ठाकरेंनी अजित पवार यांची नुकतीच विधानभवनात घेतल्या भेटीबद्दलही सांगितले. देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर पाठीत खंजीर खुपसल्याचा आरोप केला होता. त्यावरही उद्धव ठाकरे यांनी उत्तर दिलं. तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर केलेल्या आरोपाचा उल्लेख करत अजित पवार यांच्याबाबत प्रश्नही विचारला. देवेंद्र फडणवीस म्हणताहेत की, उद्धव ठाकरे यांनी आमच्या पाठीत खंजीर खुपसला असं संजय राऊत यांनी विचारताच उद्धव ठाकरे म्हणाले की, ठीक आहे. मग राष्ट्रवादीने काय खुपसलं होतं, की ज्यामुळे तुम्ही राष्ट्रवादी फोडलीत. शिवसेनेने खंजीर खुपसला, मी खंजीर खुपसला म्हणताय, मग राष्ट्रवादीने काय खुपसलं होतं की तुम्ही त्यांना पण फोडलंत? तुमचं सरकार आलं होतं ना, शिवसेना फोडून. शिवाय अपक्षही सोबत घेऊन तुमचं सरकार मजबूत झाल्यानंतरही पुन्हा राष्ट्रवादी का फोडलीत? असे प्रश्नही विचारले. गद्दारी करणाऱ्यांना मीसुद्धा डांबून ठेवू शकलो असतो पण…; उद्धव ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव घेताना उद्धव ठाकरे यांनी म्हटलं की, राष्ट्रवादी फोडण्याच्या आधी त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे भयंकर आरोप चार-पाच दिवस आधी माननीय पंतप्रधानांनी केले होते. त्या आरोपांचे आता काय झाले? त्या घोटाळय़ाच्या पैशांचं काय झालं? कशासाठी ही फोडाफोडी केलीत? म्हणूनच म्हटलं एवढा भ्रष्टाचारी राष्ट्रवादी पक्ष आहे किंवा होता तर त्यांनी नेमकी तुमच्याशी काय गद्दारी केली होती की त्यांना तुम्ही फोडलंत. हो. पण त्यावर भाजपचं असं म्हणणं आहे की, राष्ट्रवादीशी जी त्यांनी युती केली म्हणा किंवा पक्ष फोडला म्हणा, ती आमची कूटनीती आहे, अधर्म नाही… – ही कूटनीती आहे की आधीपासूनची मेतकूट नीती आहे हे माहीत नाही मला, पण या कूटनीतीला आता कुटून टाकण्याची वेळ आली आहे. सत्तालोलुपता, सत्ताभक्षक हाच शब्द मला योग्य वाटतो. जसा नरभक्षक असतो. तसे हे सत्ताभक्षक! हे एकदा का सत्तेला चटावले की त्यांना काही दिसेनासे होऊन जाते. ती सत्तालोलुपता या सत्ताधाऱ्यांमध्ये आलेली आहे. त्यांना माणसं दिसेनाशी झाली आहेत. महिलांवरील अत्याचार दिसेनासे झाले आहेत. वाढती महागाई वगैरे तर बोलूच नका. हे विषय तर त्यांच्या लेखी काहीच नाहीयत आणि एका खोटय़ा भ्रमात सत्ता चालवताहेत.
राष्ट्रवादीशी युती भाजपने केली किंवा शिंद्यांच्या फुटलेल्या गटाने केली, ही कूटनीती आहे; पण जेव्हा तुम्ही राष्ट्रवादीसोबत सरकार बनवलंत तेव्हा फडणवीस आणि फुटून गेलेल्या लोकांची भूमिका वेगळी होती, ती बदलली कशी? – तेच माझं म्हणणं आहे ना की, आधीपासूनची मेतकूट नीती आहे. म्हणजे आधीपासून त्यांचं जे काही चाललं होतं त्याचाच हा परिपाक आहे. आमच्या सोबत आले तर भ्रष्ट आणि त्यांच्यासोबत गेले तर संत, ही कोणती नीती? दिल्ली दरबारी मुजरा मारणारे…, इर्शाळवाडी दुर्घटनेवरून ठाकरेंचा मुख्यमंत्री शिंदेंवर प्रहार तुम्ही अजित पवारांना भेटून आलात. – हो. परवा जाऊन आलो मी. कारण अडीच वर्षे ते माझ्या सोबत होते उपमुख्यमंत्री म्हणून. अर्थ खातं त्यांनी सांभाळलं. मी हेच त्यांना सांगितले की, या सगळय़ा सत्तेच्या साठमारीत राज्याला विसरू नका हेच माझं सांगणं आहे. जनतेला विसरू नका. अर्थ खातं म्हणजे राज्याच्या दृष्टीने महत्त्वाचं खातं आहे. एक गंमत बघा, ज्यांच्यावर पंतप्रधानांनी 70 हजार कोटींच्या भ्रष्टाचाराचे आरोप केले त्यांच्याच हातात राज्याच्या तिजोरीच्या चाव्या दिल्या आहेत. मग आरोप खरे की अजित पवार खरे? तुम्हाला काय वाटते? – ज्यांनी आरोप केले त्यांनाच हे विचारायला हवं. हे तुमचं म्हणणं खरं आहे, पण अजित पवार हे आपले सहकारी होते. त्यांना तुम्ही भेटलात, पण त्याच रांगेमध्ये इतरसुद्धा काही मंत्री होते. ज्यांनी तुमच्यासोबत सहकारी म्हणून काम केलेले आहे. तुम्हाला त्यांना कधी भेटावंसं वाटलं का? – ते रोजच भेटत होते, पण अजित पवारांबद्दल मी तुम्हाला बोललो तसं. एका प्रामाणिक चौकटीत काम करणारा माणूस. प्रशासन आणि त्यांचं खातं त्यांनी व्यवस्थित सांभाळलं होतं. आणि मला असं वाटलं की, सध्याच्या भोंदूगिरीत या माणसाकडून काही चांगलं झालं तर पाहावं. नाही तरी आता निवडणुका कधीही होऊ शकतात असं चित्र आहे.