मुंबई, 26 जुलै : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मुलाखतीचा पहिला भाग प्रसिद्ध झाला असून यात भाजपवर जोरदार टीका केली आहे. तसंच शिवसेना फुटली त्यावरही भाष्य केलंय. मला जर सत्ताच मिळवायची असती तर गद्दारी केलेल्या आमदारांना मीसुद्धा हॉटेलमध्ये किंवा इतरत्र डांबून ठेवू शकलो असतो. सत्ता राबवता आली नाही या आरोपावर उद्धव ठाकरे यांनी उत्तर देताना म्हटलं की, सध्याचं चित्र पाहिलं तर या पद्धतीने सत्ता राबवू इच्छित नाही. माझ्याकडून तशी सत्ता राबवली जाणार नाही. सत्ता टिकवायचीच असती तर मी गद्दारी करणाऱ्या आमदारांना हॉटेलमध्ये, इतरत्र डांबून ठेवू शकलो असतो. शिवसेनेतील फुटीबाबत आणि सत्ता राबवण्याबाबत बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, हे बघा. मला जे करायचं होतं ते मी केलं. सध्याचं चित्र तुम्ही म्हणताय ते पाहिलं तर या पद्धतीने मी सत्ता राबवू इच्छित नाही आणि माझ्याकडून ती तशी राबवली पण जाणार नाही. जर मला सत्ता टिकवायची असती तर जे गद्दार होते ते गद्दारी करण्यापूर्वी माझ्यासोबतच दोन-तीन दिवस होते. त्यांना हॉटेलमध्ये किंवा इतरत्र डांबून ठेवू शकलो असतो, पण असं किती दिवस डांबून ठेवणार. दिल्ली दरबारी मुजरा मारणारे…, इर्शाळवाडी दुर्घटनेवरून ठाकरेंचा मुख्यमंत्री शिंदेंवर प्रहार जी मनानेच विकली गेली आहेत ती माणसं मला नकोच आहेत. जी माझ्या सभोवती अगदी मूठभर का असतील, पण निष्ठावान असतील अशीच माणसं मला हवीत. कारण तीच खरी शक्ती असते. पसाभर गद्दार घेऊन फिरण्यापेक्षा मूठभर निष्ठावंत मला नेहमीच आवडतात. शिवसेनाप्रमुखांचासुद्धा हाच स्वभाव होता. त्यांना असं वाटलं होतं की एवढं फोडल्यानंतर शिवसेना संपेल, पण शिवसेनेला आणखी जोरात धुमारे फुटलेले आहेत. एका दृष्टीने ही इष्टापत्ती आहे असेही उद्धव ठाकरे म्हणाले. पक्ष फुटल्याने आता शिवसेनेत नव्या चेहऱ्यांना संधी मिळतेय असं सांगताना उद्धव ठाकरे यांनी म्हटलं की, अनेक जणांनी अनेक जागा वर्षानुवर्षे अडवून ठेवल्या होत्या. बऱ्याच जणांना संधी मिळायला हवी होती ती मिळत नव्हती. आपण एखाद्या व्यक्तीबद्दल बोलत होतो की ही व्यक्ती काम करते. पण मतदार म्हणत होते की, हरकत नाही. एकदा झालं, दोनदा झालं. यालाच वारंवार संधी मिळतेय. शेवटी हा शिवसेनेचाच आहे असं म्हणून मत देत होते, पण आता तिकडे नवीन चेहऱ्यांना संधी मिळतेय. शिवसेनेच्या विचारांची मशाल या महाराष्ट्राला पन्नास वर्षांपेक्षा जास्त काळ प्रकाश देण्याचं काम करतेय. या मागच्या सर्व घडामोडींमध्ये लोकांसमोर प्रश्न आहे की, धनुष्यबाण की मशाल? – धनुष्यबाण आणि मशाल या माझ्यासाठी नंतर आलेल्या गोष्टी आहेत. पहिली आली ती शिवसेना. ते नाव फार महत्त्वाचं आहे. जे हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुखांनीसुद्धा सांगितलेलं आहे की, शिवसेना हे नाव प्रबोधनकारांनी म्हणजे माझ्या आजोबांनी दिलेलं आहे. मी वारंवार हे सांगत आलोय की, निवडणूक आयोगाचं काम हे निवडणूक निशाणी किंवा चिन्ह देण्याचं आहे. पक्षाचं नाव देण्याचं किंवा पक्षाचं नाव बदलण्याचं नाही. म्हणून आता जो विचित्र निकाल निवडणूक आयोगाने दिलेला आहे त्याविरोधात आपण सर्वोच्च न्यायालयात गेलोय आणि मला खात्री आहे की, ज्या पद्धतीनं सर्वोच्च न्यायालयात आपली बाजू मांडताना ज्या गोष्टींची पूर्तता करण्याची आवश्यकता होती त्या सर्व गोष्टींची पूर्तता आपण केली आहे आणि ती पूर्तता केल्यामुळेच मला खात्री आहे की, ‘शिवसेना’ हे नाव आपल्याला पुन्हा मिळेल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.