मुंबई, 26 जुलै : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त खासदार संजय राऊत यांनी घेतलेल्या मुलाखतीचा पहिला भाग प्रसिद्ध करण्यात आला आहे. या मुलाखतीमध्ये उद्धव ठाकरे यांनी अनेक प्रश्नांची उत्तरे देताना राज्य आणि केंद्र सरकारवर टीकेचे बाण सोडले आहेत. शिवसेना फुटल्यानंतर वर्षभरातच राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही फूट पडली. यावरून टीका करताना उद्धव ठाकरे यांनी भाजपला थेट प्रश्न विचारला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ‘आवाज कुणाचा’ या ‘पॉडकास्ट’ माध्यमातून ‘सामना’ला मुलाखत दिली. ‘‘2024 साल आपल्या देशाच्या आयुष्याला नवे वळण देईल.’’ असं उद्धव ठाकरे या मुलाखतीत म्हणाले. तसंच ब्रिटिश साम्राज्यावरचा सूर्यही शेवटी मावळलाच. प्रत्येकाचा शेवट हा होतोच. हा निसर्ग नियम आहे. ईडी, सीबीआय आणि इन्कम टॅक्स हे तीन पक्षसुद्धा आता ‘एनडीए’त सामील झाले. हीच त्यांची ताकद आहे अशा शब्दात टीका केली. दरम्यान, रायगड जिल्ह्यात झालेल्या इर्शाळवाडी दुर्घटनेनंतर मुख्यमंत्री शिंदे घटनास्थळी स्वत: गेले होते. मात्र त्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी ते दिल्लीला गेले त्यावरून उद्धव ठाकरे यांनी जोरदार निशाणा साधला आहे. एवढी मोठी दुर्घटना घडलेली असताना मुख्यमंत्री मुजरा मारायला दिल्ली दरबारी गेले आहेत. पहा, फोटो प्रसिद्ध झालेत. कुणाला मुजरा मारताय? कशासाठी मुजरा मारताय? ज्यांना मुजरा मारायला गेला आहात त्यांच्या डबल इंजिन सरकारमध्ये देशात काय चाललंय? असे प्रश्न उद्धव ठाकरे यांनी विचारले. उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीआधीच वातावरण तापलं; लोक उत्सुक आहेत.., भाजपचा टोमणा उद्धव ठाकरे यांनी म्हटलं की, दुर्घटनेनंतर आपले मुख्यमंत्री दिल्लीत रवाना झाले. म्हणजे राज्यात एवढी मोठी दुर्घटना घडली, आपत्ती ओढवली आहे, दरड कोसळली आहे तरीदेखील हे दिल्ली दरबारी मुजरा मारायला जाताहेत. हे असे हुजरे राज्याला काय न्याय देणार? पूर्वी असं म्हटलं जायचं की, राजकारण्यांची कातडी गेंडय़ाची कातडी आहे. आता कदाचित गेंडे त्यांच्या पिल्लाला म्हणत असतील की, तुमची कातडी राजकारण्यांची झाली आहे! गेंडय़ाच्या कातडीपेक्षा जास्त निगरगट्टपणा राजकारण्यांमध्ये आला आहे. इर्शाळवाडीची ही दुर्घटना राज्यकर्त्यांसाठी किंवा राजकारण्यांसाठी लाजिरवाणी आहे. असं तुम्ही का म्हणालात? – खरं आहे. मी माझ्या त्या मताशी ठाम आहे. मी हे मत एवढय़ासाठीच मांडलं की, मीसुद्धा मुख्यमंत्री होतो. माझ्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात नैसर्गिक आपत्ती एकदा-दोनदा नव्हे, तीन-चार वेळा आलेल्या आहेत. दोन तर चक्रीवादळं आली. तुम्हाला आठवत असेल. एक तळिये गावाची दुर्घटना अशीच घडली होती. चिपळूणच्या बाजारपेठेत पाणी घुसलं होतं. कोल्हापूरमध्येही संकट कोसळलं होतं. साताऱ्यातही दरड कोसळली होती. या सर्व ठिकाणी मी स्वतः गेलो होतो. मी लाजिरवाणं एवढय़ासाठी म्हटलं की, मी इर्शाळवाडीला गेलो असताना त्या गर्दीत एक तरुण मला ओरडून प्रश्न विचारत होता की, ‘आपल्या स्वातंत्र्याला पंचाहत्तर वर्षे झाली तरी आम्ही हेच आयुष्य जगायचं का?’ आणि हा चटका लावणारा प्रश्न आहे. आपण पंचाहत्तर वर्षे कसली साजरी करतो आहोत? स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सुरू आहे… अमृतकाल असंही म्हणतात… – अमृत सोडा, पण या गोरगरीबांचे जीव आपण वाचवू शकत नाही. तुम्हीच बघा ना. म्हणून मी ही दुर्घटना लाजिरवाणी आहे असं म्हटलं होतं. हा क्षण असा असतो की, नेमकं कुणाचं चुकलं, काय चुकलं हे बघत बसण्यापेक्षा माझं मत आहे की, प्रत्येक वेळी दुर्घटना घडल्यानंतर आपण खडबडून जागे झाल्यासारखे ‘दाखवतो.’ हा शब्दप्रयोग मी मुद्दाम इर्शाळवाडीत बोलताना वापरला आणि आताही वापरतोय. थोडय़ा दिवसांनंतर आपण या अशा दुर्घटना विसरून पुन्हा आपलं काम सुरू होतं. दोन दिवसांपूर्वी एवढी मोठी दुर्घटना घडल्यानंतर मुख्यमंत्री दिल्ली दरबारी गेल्याचं समजतंय. हे कुठलं राजकारण आहे? अजूनही तिथे शोधकार्य सुरू आहे. अनेक लोक तिकडे ढिगाऱ्याखाली अडकले असण्याची शक्यता आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.