नागपूर, 28 डिसेंबर : विरोधकांकडून हिवाळी अधिवेशनाचा कालावधी वाढवण्याची मागणी करण्यात आली होती. आज विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी देखील हिवाळी अधिवेशनाचा कालावधी वाढला तर महत्त्वाचे प्रश्न सभागृहात उपस्थित करता येतील असं म्हटलं होतं. या सर्व पार्श्वभूमीवर हिवाळी अधिवेशनाचा कालावधी वाढवण्यात यावा का? यासाठी आज विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीची बैठक पार पडली. मात्र या समितीतील सर्वपक्षीय सदस्यांकडून अधिवेशनाचा कालावधी न वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे आता 30 डिसेंबरलाच हिवाळी अधिवेशनाचं सूप वाजणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. विरोधकांची नाराजी अधिवेशन सुरू होण्यापूर्वी विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीची बैठक पार पडली होती. या बैठतीमध्ये अधिवेशनाचा कालावधी 19 डिसेंबर ते 29 डिसेंबर असा दोन आठवडे ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. यावरून विरोधकांनी नाराजी व्यक्त केली होती. अधिवेशनाचा कालावधी कमीत कमी तीन आठवड्यांचा असावा अशी मागणी मविआच्या नेत्यांकडून करण्यात आली होती. आज अधिवेशनाचा आठवा दिवस आहे. अधिवेशनाचा कालावधी वाढवायचा की नाही याबाबत आज पुन्हा एकदा विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये अधिवेशनाचा कालावधी न वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हेही वाचा : फोन टॅपिंग प्रकरणात मोठी अपडेट; न्यायालयाच्या नव्या आदेशाने रश्मी शुक्ला अडचणीत? आजचा दिवसही वादळी ठरणार? आतापर्यंत हिवाळी अधिवेशन वादळी ठरलं आहे. महाराष्ट्र, कर्नाटक सीमावाद, भूखंड वाटपात भ्रष्टाचार असे विविध मुद्दे उपस्थित करून विरोधकांनी सत्ताधारी पक्षातील नेत्यांना धारेवर धरलं. आज पुन्हा एकदा हेच मुद्दे उपस्थित करून विरोधक सरकारची कोंडी करण्याची शक्यता आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.