मुंबई, 05 मार्च : आज अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुस-या आठवड्यातील चौथा दिवस आहे. आजचा दिवस खऱ्या अर्थाने वादळी ठरण्याची चिन्हं आहेत. कारण अधिवेशनापूर्वी ज्या नागरिकता सुधारणा कायद्यावरुन सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने आले आहेत, त्याला पाठिंबा देणारा प्रस्ताव आज भाजपकडून सभागृहात मांडला जाणार आहे. आतापर्यंत इतर राज्यांप्रमाणे महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकारनं या कायद्याला विरोध करणारा प्रस्ताव आणणं टाळलं होतं. महाविकास आघाडीत या विषयावरून मतभेद आहेत आणि हीच बाब ओळखून भाजपचा दोन्ही सभागृहांमध्ये यावर सत्ताधाऱ्यांची कोंडी करण्याचा प्रयत्न आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्लीत नुकतीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्यानंतर ‘नागरिकत्व कायद्याबद्दल घाबरण्यासारखं काही नाही, हा कायदा काही कुणाची नागरिकता काढून घेत नाही. फक्त त्यांच्या अंमलबजावणीबद्दल जे प्रश्न आहेत त्याची उत्तरं केंद्र सरकारनं द्यावीत’ असं वक्तव्य केलं होतं. हे वाचा - महाराष्ट्रातील 4 कलाकारांना ‘राष्ट्रीय ललित कला अकादमी पुरस्कार’ प्रदान त्याशिवाय आज विरोधक पुन्हा एकदा कर्जमाफीवरून सरकारला जाब विचारणार आहेत. निवडणुकीपूर्वी विद्यमान सत्ताधाऱ्यांनी शेतकऱ्यांना कर्जमाफीच्या ज्या रकमेचं आश्वासन दिलं होतं त्यावरून विरोधक सरकारला उत्तर मागणार आहेत. आजच्या दिवसभरात आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आज राज्याचा आर्थिक पाहणी अहवाल दोन्ही सभागृहांमधे मांडला जाणार आहे. त्यावरून राज्याच्या सध्याच्या आर्थिक स्थितीचा अंदाज येऊ शकणार आहे. आणि उद्या मांडल्या जाणा-या अर्थसंकल्पाची नेमकी काय दिशा असू शकेल याचा अंदाज बांधता येणार आहे. यात एका प्रकारे देवेंद्र फडणवीस सरकारची गेल्या वर्षाभरातील कामगिरीवर भाष्य देखील असणार आहे. विधानसभेत 11 वाजता तर विधान परिषदेत 12 वाजता हा अहवाल मांडला जाईल. हे वाचा - सावधान! तुमच्या मोबाईल स्क्रीनवर जिवंत असू शकतो कोरोना व्हायरस आजचा दिवस दोन्ही सभागृहांमध्ये महिला सुरक्षा आणि महिला सक्षमीकरण या विषयावर विधानसभेत अध्यक्ष आणि विधानपरिषदेत सभापती प्रस्ताव मांडणार आहेत. गेल्या काही दिवसांत 30 राज्यातील महिला सुरक्षेविषयीची परिस्थिती चिंता वाटायला लावणारी आहे. त्यावर काही ठोस उत्तरं आजच्या चर्चेत मिळेल अशी अपेक्षा आहे. याशिवाय राज्यातील वृक्ष लागवडीचा मुद्दा गाजला होता. त्यावरून माजी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची कोंडी करण्याचा पुरेपूर प्रयत्न सत्ताधाऱ्यांनी केला आहे. पण भाजपच आता यावर आक्रमक भूमिका घेत श्वेतपत्रिका काढण्याची मागणी करणार आहे. एकंदरीतच आज सत्ताधारी विरुद्ध विरोधक असा जोरदार सामना रंगताना पाहायला मिळणार आहे. हे वाचा - कोरोनामुळे प्रत्येकजण आहे हैराण, असा पसरतो शरीरात आणि घेतो रुग्णाचा जीव
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.