मुंबई, 13 नोव्हेंबर : 'राज्यकर्त्यांना विरोधकांनी भेटूच नये हा विचार चुकीचा आहे. विधिमंडळाच्या अधिवेशनाआधी चहापानावर विरोधकांचा बहिष्कार हे शस्त्रही आता बोथट झाले आहे. लोकशाही व स्वातंत्र्याची तलवार धारदार ठेवण्याची जबाबदारी आता विरोधी पक्षांवरच आहे. त्यासाठी त्यांना तुरुंगात जावे लागले तरी चालेल! सध्या देश त्याच दिशेने निघाला आहे. सरकारला जे नकोसे वाटतात अशा राजकीय विरोधकांनी तुरुंग भरणे हे काही स्वातंत्र्य नाही, असं म्हणत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी दिल्लीच्या राजकारणावर भाष्य केलं.
पत्राचाळ प्रकरणामध्ये शिवसेनेचे खासदार संजय राऊत हे 100 दिवसांनी जेलमधून बाहेर आले. मागील 100 दिवसांमध्ये त्यांच्या जागी कडकनाथ मुंबईकर नावाने शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या दैनिक सामनामध्ये लेख छापले जात होते. अखेर जेलमधून सुटका झाल्यानंतर संजय राऊत यांनी लेखणीतून हल्लाबोल सुरू केला आहे.
(2019 च्या निवडणुकीत महाजन यांनीच 'तो' कट रचला, एकनाथ खडसेंचा मोठा आरोप)
'आर्थर रोड तुरुंगाच्या मुख्य दरवाजाबाहेर स्वातंत्र्यवीरांच्या नावाने स्मृतिस्तंभ आहे, पण या तुरुंगात नक्की कोणते स्वातंत्र्यवीर मुक्कामास होते त्याची खास नोंद दिसत नाही! मुंबईतील ‘पीएमएलए’ म्हणजे मनी लॉण्डरिंगविरुद्धच्या न्यायालयात माझ्या जामीनमंजुरीचा निर्णय देताना कायद्याच्या व यंत्रणांच्या गैरवापराबाबत परखड निरीक्षणे नोंदवली. यंत्रणा आधी ‘आरोपी’ ठरवतात व त्यांना अटक केली जाते, हे त्यांनी सांगितले. ही एक प्रकारची द्वेष व कटुतेची भावना आहे. राजकीय विरोधक जिवंत राहता कामा नये या विचारापर्यंत आजचे राज्यकर्ते पोहोचले हे सर्वस्वी चूक!' असंही राऊत यांनी ठणकावून सांगितलं.
'राजकारणातली कटुता संपायला हवी असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. तुरुंगाबाहेर येताच, ‘फडणवीस हे बरोबर बोलले. कटुता संपायला हवी,’ असे समर्थन मी करताच ‘संजय राऊतांचे सूर नरमले’ असा अपप्रचार माध्यमांनी करावा हे दुर्दैव! महाराष्ट्रात रोज मारामाऱ्या व्हाव्यात, राजकीय सूडचक्रात लोक भरडले जावेत व त्यातून बातम्यांचे पीक निघावे हे जबाबदार माध्यमांचे काम नाही. राज्यकर्त्यांना विरोधकांनी भेटूच नये हा विचार चुकीचा आहे. विधिमंडळाच्या अधिवेशनाआधी चहापानावर विरोधकांचा बहिष्कार हे शस्त्रही आता बोथट झाले आहे. लोकशाही व स्वातंत्र्याची तलवार धारदार ठेवण्याची जबाबदारी आता विरोधी पक्षांवरच आहे. त्यासाठी त्यांना तुरुंगात जावे लागले तरी चालेल! सध्या देश त्याच दिशेने निघाला आहे. आर्थर रोड तुरुंगाच्या बाहेर स्वातंत्र्यवीरांचा स्तंभ आहे. आज ते वीरही गुन्हेगार ठरवले गेले असते! तरीही स्वातंत्र्य व लोकशाही अमर आहे, असंही राऊत यांनी परखडपणे सांगितलं.
(खरंच प्रकल्प राज्याबाहेर जात आहेत का? फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं कनेक्शन!)
'महाराष्ट्राचे राजकीय वातावरण किती गढूळ झाले आहे व अनेक लोक एकमेकांना कायमचे संपवायला निघाले आहेत, हे दि. 9 रोजी तुरुंगातून बाहेर पडताच पुन्हा जाणवले. आर्थर रोड तुरुंगाच्या मुख्य दरवाजाबाहेर एक लहानसा स्मृतिस्तंभ उभा केला आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात अनेक स्वातंत्र्यवीर आणि क्रांतिकारकांचे आर्थर रोड तुरुंगात वास्तव्य होते. त्या स्वातंत्र्यवीरांच्या स्मृती जतन करण्यासाठी हा स्तंभ उभा केला, पण लोकशाही आणि स्वातंत्र्याचा आता लवलेशही उरलेला नाही. राजकारण विषारी बनले आहे, तितके ते ब्रिटिश काळातही नव्हते' असं राऊत म्हणाले.
'लोकशाही व संसदेचे फक्त नाव घेतले जाते. प्रत्यक्षात या दोन्ही संस्थांचे महत्त्वच नष्ट झाले. तुरुंगात असताना नितीन गडकरी यांचे एक भाषण वाचनात आले. त्यांनी परखडपणे सांगितले की, ‘‘राष्ट्रीय राजकारणात पाऊल ठेवल्यानंतर मला आजवर अनेक माणसे भेटली. यात खूप मोठी वाटणारी माणसे खुजी निघाली तर प्रत्यक्षात जी माणसे मला छोटी वाटायची ती प्रत्यक्षात उत्तुंग निघाली. दिल्लीचे पाणी चांगले नाही.’’ गडकरी यांनी जे म्हटले ती आज जनभावना का बनली, याचे उत्तर दिल्लीच्या आजच्या वतनदारांनी शोधायला हवे, पण आजच्या वतनदारांना त्यांच्या मनासारखे उत्तर हवे असते. ते देणार नाहीत ते शत्रू ठरतात! पाकिस्तान, चीन हे दिल्लीचे शत्रू नाहीत. परखड बोलणारे, सत्य बोलणारे ज्यांना आपले शत्रू वाटतात तेव्हा त्या राज्यकर्त्यांनी आपला देशही खुजा केलेला असतो. अशा खुज्या नेतृत्वास लोकशाही आणि स्वातंत्र्याचे मोल काय समजणार? असा सवालही राऊत यांनी केला.
'न्यायालयाचे छत सध्या किती फाटले आहे ते काय सांगायला हवे? न्यायालयास ‘मंदिर’ मानून नतमस्तक होणाऱ्यांत न्या. लळीत आहेत. तेही आता निवृत्त झाले व राजकारणातील सूडचक्रासाठी केंद्रीय तपास यंत्रणांपासून न्यायालयांपर्यंत सर्वच शस्त्रांचा वापर खुलेआम होत आहे. भ्रष्टाचार नष्ट करण्याचे व प्रामाणिकपणा जपण्याचे फक्त सल्ले दिले जातात ते राज्यकर्त्यांच्या भाषणात. प्रत्यक्षात गंगा उलटीच वाहत आहे. एकदा एक तरुण कार्यकर्ता ज्येष्ठ राजकीय नेत्याकडे गेला आणि विचारू लागला, ‘‘जगात यशस्वी कसे व्हायचे याबद्दल मला मार्गदर्शन कराल काय?’’ ज्येष्ठ नेता म्हणाला, ‘‘जगात यशस्वी व्हायचे असेल तर प्रामाणिकपणाशिवाय पर्याय नाही. एकदा तुम्ही प्रामाणिक आहात असा आभास निर्माण केलात की, यशाला मर्यादा नाही!’’ आज देशात अमर्याद पद्धतीने तेच सुरू आहे!' असं परखड मतही राऊत यांनी व्यक्त केलं.
'संसदीय लोकशाही पद्धत ही सर्वात वाईट प्रशासन पद्धत आहे, पण इतर पद्धती तर त्याहून अधिक वाईट आहेत, असे विन्स्टन चर्चिलचे मत होते. आज आपल्या देशात संसदीय लोकशाही आहे. त्यात लोकशाही व स्वातंत्र्याचा अंश शोधावा लागतो असे अनेकांना वाटते. विरोधी पक्षांना संसदीय लोकशाहीत स्थानच उरलेले नाही आणि विरोधकांविरुद्ध सर्व कठोर कायदे एकतर्फी पद्धतीनेच वापरले जात आहेत असं म्हणत संजय राऊत यांनी आताच्या राजकीय परिस्थितीची हिटलरशाहीसोबत तुलना केली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Devendra Fadnavis, Samana, Sanjay raut, Shivsena