टीम इंडिया सुट्टीसाठी रॉटनेस्ट बेटावर
पर्थ, 12 ऑक्टोबर: मिशन टी20 वर्ल्ड कपसाठी सध्या टीम इंडिया ऑस्ट्रेलियात आहे. 6 ऑक्टोबरला भारतीय संघ ऑस्ट्रेलियातल्या पर्थमध्ये पोहोचली. त्यानंतर लगेचच भारतीय खेळाडूंनी सरावालाही सुरुवात केली. पण आज बीसीसीआयनं टीम इंडियाच्या या शिलेदारांना सुट्टी दिली होती आणि याचनिमित्तानं खेळाडू आणि सपोर्ट स्टाफ पोहोचले एका बेटावर. तिथे भारतीय खेळाडूंनी भरपूर धमाल मस्ती केली. तिथलं वन्यजीवन जवळून न्याहाळलं. बीसीसीआयनं या सगळ्या ट्रिपचा व्हिडीओ ट्विटरवरुन शेअर केला आहे. रॉटनेस्ट बेटावर टीम इंडिया ऑस्ट्रेलियातलं रॉटनेस्ट बेट जगातल्या सर्वात सुंदर ठिकाणांपैकी एक आहे. संपूर्ण भारतीय टीम आज याच बेटावर पोहोचली. हे बेट टीम इंडियाचं सध्याचं वास्तव्य असलेल्या पर्थपासून 19 किलोमीटर लांब आहे. रॉटनेस्ट बेटाला समुद्रातील स्वर्ग अशीही उपमा दिली जाते. या बेटाचा इतिहास 50 हजार वर्ष जुना आहे. निसर्गसौंदर्याबरोबरच या बेटावर कोक्का नावाचा एक दुर्मिळ प्राणी आढळतो. इथल्या कोक्का नावाच्या आदिवासी जमातीवरुन या प्राण्याला हे नाव मिळालं आहे.
विराटनं घेतला ‘कोक्का’सोबत फोटो बेटावर येणाऱ्या प्रत्येकाला त्याच्यासोबत फोटो काढण्याचा मोह आवरत नाही. टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहलीनंही या दुर्मिळ आणि अनोख्या प्राण्यासोबत फोटो काढला आहे. रॉटनेस्ट बेटावर जाण्यासाठी पर्थपासून बोटची सुविधा उपलब्ध आहे.
टीम इंडियाचा सराव सुरु दरम्यान भारतीय संघानं पर्थमध्ये सरावाला सुरुवात केली आहे. वेस्टर्न ऑस्ट्रेलिया टीमबरोबर भारतीय संघाचा एक सराव सामनाही पार पडला. त्यात टीम इंडियानं 13 धावांनी विजय मिळवला. फॉर्मात असलेल्या सूर्यकुमार यादवनं या सामन्यातही अर्धशतकी खेळी केली. दरम्यान 17 ऑक्टोबरला ऑस्ट्रेलिया आणि 19 ऑक्टोबरला न्यूझीलंडविरुद्ध टीम इंडिया ब्रिस्बेनमध्ये सराव सामने खेळणार आहे. हेही वाचा - Mumbai Cricket: मुंबई क्रिकेटचा ज्युनियर ‘खान’, गाजवतोय मैदान; पाहा युवराज सिंगशी काय आहे खास कनेक्शन? 23 ऑक्टोबरला ‘महामुकाबला’ टीम इंडियाचा वर्ल्ड कप मोहिमेतला सलामीचा सामना होईल तो पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी. गेल्या वर्षी याच पाकिस्ताननं वर्ल्ड कपच्या इतिहासात पहिल्यांदाच टीम इंडियाला पराभवाचा धक्का दिला होता. पण यंदा त्याची परतफेड करण्याची संधी टीम इंडियासमोर आहे. मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर 23 ऑक्टोबरला हा सामना खेळवला जाणार आहे. महत्वाचं म्हणजे जवळपास 1 लाख प्रेक्षक क्षमता असलेल्या एमसीजीवरच्या या सामन्याची सगळी तिकिटं एक महिना आधीच विकली गेली आहेत. हेही वाचा - Mushtaq Ali T20: धोनीच्या पठ्ठ्यानं टी20त केली कमाल, ‘या’ मराठमोळ्या खेळाडूचं मुश्ताक अली स्पर्धेत शतक बुमराला पर्याय कोण? दरम्यान जसप्रीत बुमराच्या अनुपस्थितीत टीम इंडिया 15 ऐवजी 14 खेळाडूंसह ऑस्ट्रेलियात पोहोचली आहे. ऐनवेळेस जसप्रीत बुमराच्या दुखापतीनं उचल खाल्ली आणि वर्ल्ड कप मोहिमेआधी भारतीय संघाला मोठा धक्का बसला. त्यामुळे त्याच्याशिवाय भारतीय खेळाडू ऑस्ट्रेलियात दाखल झाले आहेत. बीसीसीआयनं लवकरच 15व्या खेळाडूची घोषणार करणार असल्याचं म्हटलं आहे. त्यात मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज आणि दीपक चहर ही नावं चर्चेत होती. पण दीपक चहरला दुखापत झाल्यानं आता शार्दूल ठाकूरची स्टँड बाय खेळाडूंमध्ये वर्णी लागली आहे. त्यामुळे 15 व्या खेळाडूसाठी सिराज किंवा शमीची वर्णी लागण्याची शक्यता आहे.