मोहाली, 12 ऑक्टोबर: चेन्नई सुपर किंग्सचा एक मराठमोळा फलंदाज गेले दोन आयपीएल सीझन आपल्या फलंदाजीनं गाजवतोय. यावर्षी आयपीएलच्या मेगा लिलावात चेन्नईनं त्याला 4 कोटी रुपये देऊन रिटेनही केलं. त्यानं आयपीएलमधल्या कामगिरीच्या जोरावर टीम इंडियाच्या टी20 आणि मग वन डे संघातही स्थान मिळवलं. धोनीच्या मार्गदर्शनाखाली खऱ्या अर्थानं तयार झालेल्या या फलंदाजानं पुन्हा एकदा टी20 क्रिकेटमध्ये कमाल केली आहे. सध्या सुरु असलेल्या मुश्ताक अली टी20 क्रिकेट स्पर्धेत त्यानं पहिल्याच मॅचमध्ये चक्क शतक ठोकलंय. हा खेळाडू आहे पुण्याचा ऋतुराज गायकवाड.
सर्व्हिसेसविरुद्ध ऋतुराजचं शतक
महाराष्ट्राचा कॅप्टन ऋतुराज गायकवाडनं आज सय्यद मुश्ताक अली टी20त सर्व्हिसेसविरुद्ध शतकी खेळी केली. मोहालीत झालेल्या या सामन्यात ऋतुराजनं अवघ्या 65 बॉल्समध्ये 112 धावा फटकावल्या. त्यात 12 फोर आणि 5 सिक्सर्सचा समावेश होता. ऋतुराजच्या या खेळीनं महाराष्ट्राला 6 बाद 185 धावांचा डोंगर उभारता आला. पण तरीही सर्व्हिसेसनं हे आव्हान आरामात पार केलं. राहुल सिंग आणि अमित पच्छाराच्या अर्धशतकांमुळे सर्व्हिसेसनं 4 विकेट्स राखून हा सामना जिंकला. त्यामुळे ऋतुराजची शतकी खेळी व्यर्थ ठरली.
काल दिल्लीत आज मोहालीत
काल दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या अखेरच्या वन डेत ऋतुराज गायकवाड भारतीय ड्रेसिंग रुममध्ये होता. त्यानं या मालिकेतल्या पहिल्याच सामन्यात भारताकडून वन डे पदार्पणही केलं. दरम्यान कालच्या सामन्यानंतर त्यानं लगेच मोहाली गाठलं आणि आज तो सामना खेळण्यासाठी मैदानातही उतरला. इतकच नव्हे तर त्यानं शतकही ठोकलं. त्यामुळे ऋतुराजच्या कामगिरीचं सध्या कौतुक होत आहे. ऋतुराजसह टीम इंडियाच्या ताफ्यात असणारा राहुल त्रिपाठीही दिल्लीतून मोहालीत पोहोचला होता. त्यानंही या सामन्यात 19 धावांची खेळी केली.
STEP
Ruturaj 112(65) Subranshu 65(53)#SyedMushtaqAliTrophy #WhistlePodu — Chennai Super Kings (@ChennaiIPL) October 12, 2022
सीएसकेकडून कौतुक
दरम्यान चेन्नई सुपर किंग्सनं ट्विट करत ऋतुराजच्या खेळीचं कौतुक केलं आहे. ऋतुराजनं आयपीएलमध्ये गेल्या 3 मोसमात चेन्नई सुपर किंग्सकडून 36 सामने खेळले आहेत. या 36 सामन्यात त्यानं 130 च्या स्ट्राईक रेटनं 1207 धावा केल्या आहेत. आयपीएलमध्येही ऋतुराजच्या खात्यावर एका शतकाची नोंद आहे. 2021 मध्ये सीएसकेच्या आयपीएल विजयात ऋतुराजचा मोठा वाटा होता. त्यानं त्या मोसमात सर्वाधिक धावा करण्याचा मानही मिळवला होता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket, Cricket news, MS Dhoni, Sports, T20 cricket