मुंबई, 12 ऑक्टोबर: मुंबई आणि बॉलिवूडचं जसं नातं आहे तसंच नातं मुंबई आणि क्रिकेटचं देखील आहे. बॉलिवूडमध्ये ‘खान’ नामावळीचं वर्चस्व आहे. पण क्रिकेटमध्ये तेंडुलकर, गावस्कर, वाडेकर, मांजरेकर, आगरकर वगैरे मंडळी. मुंबई क्रिकेटच्या क्षितीजावरही एका खानाचं दीर्घकाळ वर्चस्व होतं. त्यानं भारताला वर्ल्ड कपही जिंकून दिला. झहीर खान हे नाव सर्वांनाच माहित असेल. पण झहीरनंतर ‘खान’ या नावाची मुंबई क्रिकेटमध्ये पुन्हा चर्चा होतेय. त्यातलं एक नाव आहे सरफराज खान. ज्यानं डोमेस्टिक क्रिकेटमध्ये आणि आयपीएलमध्ये आपली एक वेगळी छाप पाडली आहे. पण आपण आज बोलणार आहोत ते ज्युनियर खानविषयी. अर्थात सरफराजचा भाऊ मुशीर खानविषयी. 17 वर्षांचा मुशीर सध्या मुंबईच्या अंडर नाईन्टिन संघाचा कॅप्टन आहे. मुशीर खान, गाजवतोय क्रिकेटचं मैदान मुशीर खानकडे यंदा मुंबई क्रिकेट असोसिएशननं अंडर-19 संघाची धुरा सोपवली आहे. मुशीरनं पहिल्या दोन सामन्यात विनू मंकड क्रिकेट स्पर्धेत आपल्या अष्टपैलू खेळानं मुंबईला दोन्ही सामन्यात जिंकून दिलं आहे. त्यामुळे ज्युनियर क्रिकेटमध्ये सध्या मुशीरची चांगलीच चर्चा आहे. मुंबई-महाराष्ट्र या पहिल्याच सामन्यात मुशीरनं सलामीला उतरत 72 धावांचं योगदान दिलं. त्यानंतर त्यानं 2 विकेट्सही घेतल्या. मुंबईनं महाराष्ट्राविरुद्धचा तो सामना खिशात घातला. त्यानंतर पावसामुळे मुंबईचे पुढचे दोन्ही सामने रद्द झाले. पण मुंबईनं छत्तीसगडविरुद्धच्या सामन्यात पुन्हा कमाल केली. याही विजयात मुंबईच्या विजयाचा शिल्पकार ठरला तो मुशीर खान. मुंबईच्या कॅप्टननं छत्तीसगडविरुद्ध 97 धावांची खेळी केली. आणि बॉलिंगमध्ये 3 विकेट्सही घेतल्या. त्यामुळे मुंबई विनू मंकड ट्रॉफीमध्ये भक्कम स्थितीत पोहोचली आहे.
लहान वयातच मुशीरची चमक मुशीर खाननं भाऊ सरफराजच्या पावलावर पाऊल ठेऊन लहान वयातच क्रिकेटचे धडे गिरवण्यास सुरुवात केली होती. मुंबईच्या शालेय क्रिकेटमध्येही त्यानं आपली छाप पाडली होती. त्यानंतर मुंबई अंडर-14 आणि अंडर-16 संघाचंही त्यानं प्रतिनिधित्व केलं. आणि आता अंडर नाईन्टिन संघाचं कर्णधारपदही मुशीरकडे देण्यात आलं. हेही वाचा - Mushtaq Ali T20: सचिनचा लेक अर्जुन तेंडुलकरनं केला गोव्याकडून डेब्यू, पहिल्याच सामन्यात पाहा अर्जुनची कामगिरी मुशीरनं काढली होती युवराजची विकेट 2014 साली एका प्रेक्षणीय सामन्यात मुशीरनं युवराज सिंगला बॉलिंग केली होती. त्यावेळी युवीनं मुद्दामहून त्याच्या बॉलिंगवर विकेट दिली होती. त्यावेळी मुशीर अवघ्या 9 वर्षांचा होता.
In 2014, I took this kid to bowl to @YUVSTRONG12 in a friendly match. Yuvi sportingly gifted him his wicket. The kid (Musheer) is a strong lad now and is captain of Mumbai (under-19). His elder brother is a run machine called Sarfaraz Khan. They have done dad Naushad Khan proud. pic.twitter.com/V6DsR0vSka
— Vijay Lokapally 🇮🇳 (@vijaylokapally) October 12, 2022
दरम्यान मुशीर आणि त्याचा भाऊ सरफराजच्या यशात क्रिकेट प्रशिक्षक असलेले वडील नौशाद खान यांचाही मोठा वाटा आहे.
सरफराज सध्या डोमेस्टिक क्रिकेटमध्ये खोऱ्यानं धावा काढतोय. त्यानं रणजी ट्रॉफीमध्ये मुंबईकडून यंदा सर्वाधिक धावा केल्या होत्या. त्यानंतर दुलीप ट्रॉफी आणि इराणी ट्रॉफीतही सरफराजनं शतकं ठोकून भारतीय कसोटी संघाची दारं ठोठावली आहेत. सरफराजप्रमाणेच आता मुशीरही ज्युनियर क्रिकेटमध्ये आपली छाप पाडतोय.

)







