टीम इंडिया
अॅडलेड, 08 नोव्हेंबर: गुरुवारी भारत आणि इंग्लंड संघात टी20 वर्ल्ड कप मध्ये सेमी फायनलचा मुकाबला रंगणार आहे. टीम इंडिया आता टी20 वर्ल्ड कप ट्रॉफीपासून अवघे 2 पावलं दूर आहे. त्यामुळे रोहित शर्मा अँड कंपनी इंग्लंडला हरवून दुसऱ्यांदा टी20 वर्ल्ड कप जिंकण्याचा निर्धारानं मैदानात उतरेल. रोहितला या वर्ल्ड कपमध्ये भारतीय गोलंदाजांनी चांगलीच साथ दिली आहे. त्यात टीम इंडियाचा एक गोलंदाज चांगलाच फॉर्मात आहे. यंदाच्या सीझनमध्ये त्यानं भारताकडून सर्वाधिक विकेट घेतल्या आहेत. तोच बॉलर भारताला फायनलमध्ये घेऊन जाण्यासाठी सज्ज झाला आहे. त्या बॉलरचं नाव आहे अर्शदीप सिंग. वर्ल्ड कपमध्ये अर्शदीप पाजी फॉर्मात अर्शदीप सिंगनं सुपर 12 फेरीत आतापर्यंत 5 मॅचमध्ये 10 विकेट घेतल्या आहेत. सध्या वर्ल्ड कपमधल्या सर्वात यशस्वी गोलंदाजांपैकी तो एक आहे. त्यामुळे सेमी फायनलमध्ये अर्शदीपच्या कामगिरीवर सर्वांची नजर राहील. या स्पर्धेत अर्शदीपचा स्ट्राईक रेट भन्नाट आहे. त्यानं दर 11 बॉलमागे 1 विकेट घेतली आहे. आतापर्यंत अर्शदीपनं वर्ल्ड कपमध्ये 18 ओव्हर टाकल्या आहेत. त्यात त्यानं 7.83 च्या इकॉनॉमीनं 141 रन दिले आहेत. भारताकडून अर्शदीपनंतर हार्दिक पंड्या सर्वात जास्त विकेट घेणारा दुसरा बॉलर आहे.
पहिल्याच बॉलवर विकेट अर्शदीप सिंगनं जूनमध्ये भारतीय संघात पदार्पण केलं होतं. त्यानंतर आशिया कप स्पर्धेतही त्यानं भारतीय संघात जागा मिळवली आणि आपल्या दमदार गोलंदाजीच्या जोरावर अर्शदीप टीम इंडियाच्या वर्ल्ड कप स्क्वाडमध्ये पण सामील झाला. याच अर्शदीपनं मेलबर्नमध्ये आपल्या पहिल्याच टी20 वर्ल्ड कप सामन्यात पहिल्याच बॉलवर विकेट घेतली तीही पाकिस्तानचा कॅप्टन बाबर आझमची. पाकिस्तानविरुद्धच्या त्या महामुकाबल्यात अर्शदीपनं 3 विकेट्स घेऊन मोलाची कामगिरी बजावली होती. हेही वाचा - T20 World Cup: टीम इंडियासाठी ‘अनलकी अंपायर’ सेमी फायनलला मैदानात उतरणार का नाही? पाहा मोठी अपडेट सेमी फायनलमध्ये इंग्लंडचं आव्हान अॅडलेडच्या मैदानात होणाऱ्या सेमी फायनलमध्ये भारतासमोर आव्हान आहे ते जोस बटलरच्या इंग्लंडचं. गेल्या 9 वर्षात आयसीसीच्या कोणत्याही स्पर्धेत हे दोन्ही संघ आमनेसामने येण्याची ही पहिलीच वेळ आहे. 2013 साली भारतानं चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये इंग्लंडला हरवलं होतं. आता पुन्हा एकदा रोहितची टीम इंडिया इंग्लंडला हरवण्यासाठी सज्ज आहे. त्यात डावखुरा अर्शदीप कशी कामगिरी करतो हे पाहावं लागेल.