पुण्यात उद्या काय चालू अन् काय बंद?
पुणे, 12 डिसेंबर : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त विधानं केली होती. यानंतर अनेक संघटना आणि राजकीय पक्षांनी याविरोधात आक्रमक भूमिका घेतली. याच पार्श्वभूमीवर उद्या मंगळवारी पुणे बंदची हाक देण्यात आली आहे. या बंदला काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनेही पाठिंबा दर्शविला आहे. सर्वधर्मीय शिवप्रेमी पुणेकर समितीच्या वतीने या बंदचे आयोजन करण्यात आले आहे. उद्या मंगळवार दि 13 डिसेंबर 2022 रोजी पुणे बंद आयोजित करण्यात आला आहे. त्यामुळे तुम्ही पुण्यात येणार असाल किंवा घराबाहेर पडणार असाल तर काय बंद राहणार तर काय चालू या गोष्टी माहीत असणे आवश्यक आहे. Pune Bandh : आज पुणे बंद; घरातून बाहेर पडण्याआधी बघा शहरातील वाहतूक मार्गातील बदल काय बंद राहणार काय चालू? पेट्रोल, डिझेल आणि सीएनजी जीवनावश्यक वस्तूंच्या श्रेणीत येत असल्याने पुणे जिल्ह्यातील इंधन पंप उद्याही सुरू राहणार आहेत. पेट्रोल पंप मालकांनी पोलिसांना पत्र लिहून संरक्षणाची मागणी केली आहे. अहवालानुसार, किराणा, बेकरी आणि दुग्धजन्य पदार्थांची दुकाने यासारख्या अत्यावश्यक सेवा उद्या सकाळी 10 वाजेपर्यंत सुरू राहतील आणि नंतर दुपारी 3 वाजेपर्यंत बंद पाळतील. बंद दरम्यान वैद्यकीय दुकाने सुरू राहणार आहेत. तर पुणे बंदला पाठिंबा देण्यासाठी उद्या दुपारी 3 वाजेपर्यंत दुकाने, बाजारपेठा बंद राहणार आहेत. पुणे पोलिसांचा अलर्ट राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजींबद्दल केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ विविध संघटनांनी पुकारलेल्या मंगळवारच्या पुणे बंदसाठी शहर पोलिसांनी सतर्कतेचा इशारा दिला आहे. कोश्यारीच्या वक्तव्याविरोधात उद्याच्या पुणे बंदमध्ये अपमानास्पद घोषणांवर बंदी घालण्यात आली आहे. संपूर्ण शहरात सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली असून पुणे पोलिसांनी सुमारे 100 वरिष्ठ अधिकारी, 1000 हून अधिक पोलीस कर्मचारी आणि साध्या वेशातील अनेक हवालदार तैनात केले आहेत. वाचा - पुण्यात उद्या दिसणार शिवप्रेमींची एकजूट! पाठिंब्यासाठी दुकाने, बाजारपेठा बंद, काँग्रेस-राष्ट्रवादीचाही सहभाग या आंदोलनाला फेडरेशन ऑफ ट्रेड असोसिएशन ऑफ पुणेने आपला पाठिंबा जाहीर केला आहे. एफएटीपीचे अध्यक्ष फतेहचंद रांका यांनी दिलेल्या निवेदनानुसार, विरोधी पक्षांनी व्यापाऱ्यांच्या संघटनेला बंदला पाठिंबा देण्याचे आवाहन केले. व्यापाऱ्यांच्या संघटनेने ‘बंद’च्या आवाहनाला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतल्याने पुण्यातील दुकाने मंगळवारी बंद राहणार आहेत.
राजकीय नेते उपस्थित राहणार राज्यपालांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ मूक मोर्चाही काढण्यात येणार आहे. छत्रपती संभाजी महाराज पुतळा येथून लाल महाल या दरम्यान हा मोर्चा निघणार आहे. डेक्कन जिमखाना, टिळक चौक, लक्ष्मी रस्त्याने बेलबाग मार्गे लाल महाल येथे मोर्चाची सांगता होणार आहे. मोर्चाची सांगता झाल्यानंतर जाहीर सभाही होणार आहे. खासदार, उदयनराजे भोसले, छत्रपती संभाजी राजे, विरोधी पक्षनेते अजित पवार, शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे या जाहीर सभेला संबोधित करणार आहेत. शहर आणि जिल्ह्यातील गणेशोत्सव मंडळे, विविध सामाजिक संघटना, संस्था, रिक्षा संघटना, व्यापारी संघटना मोर्चात सहभागी होणार आहेत.