या 80 वर्षीय आजोबांच्या शरीराची लवचिकता भल्याभल्यांना आश्चर्यचकीत करतेय.
मोहित शर्मा, प्रतिनिधी करौली, 7 जुलै : बऱ्याचजणांच्या दिवसाची सुरुवात व्यायामाने होते. तर, बऱ्याचजणांना व्यायाम केल्याशिवाय दिवस संपला असं वाटतच नाही. तर, काहीजण असेही असतात जे व्यायामाचा कंटाळा करतात. परंतु सुदृढ आरोग्यासाठी आपल्या अवयवांची हालचाल होणं, शरीरात लवचिकता असणं अत्यंत महत्त्वाचं असतं. राजस्थानात सध्या 80 वर्षीय आजोबांच्या शरीराची लवचिकता भल्याभल्यांना आश्चर्यचकीत करतेय. शंकर दास असं या आजोबांचं नाव असून ते चक्क एका बोटाच्या आधारावर त्यांच्या पूर्ण शरीराचा तोल सांभाळतात. राजस्थानात मदन मोहनजी मंदिर आहे. या मंदिराबाहेर शंकर दास यांच्या थक्क करणाऱ्या कसरती पाहायला मिळतात. मंदिराबाहेरच चटई अंथरून ते योगासने करत असतात. एका आसनात ते एका बोटावर शरीराचा तोल सांभाळतात. अशी एकूण 14 आसनं ते करतात. विशेष म्हणजे मंदिरात येणारे भाविक त्यांचंही दर्शन घेतात आणि त्यांना भिक्षाही देतात.
मिळालेल्या माहितीनुसार, शंकर दास हे मूळ मध्यप्रदेशचे रहिवासी आहेत. तेथील सबलगडच्या गुरू आश्रमात ते राहतात. दर महिन्याला न चुकता एकदा ते मदन मोहनजी मंदिरात दर्शन घेण्यासाठी येतात. प्राणप्रतिष्ठापनेसाठी अयोध्येतील राम मंदिर सज्ज; पहिल्यांदाच PHOTOS आले समोर देवाच्या दर्शनानंतर मंदिराबाहेर चटई अंथरून ते आसनं करतात. तास-तासभर चालणाऱ्या या कसरती पाहण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी होते. परंतु यावेळी शंकर दास एकही शब्द बोलत नाहीत. मौनव्रत घेऊन ते योगासनं करतात. ‘मी स्वच्छ मनाने देवाची पूजा करतो, माझं लवचिक शरीर म्हणजे देवानेच मला दिलेली देणगी आहे’, असं ते मानतात. दरम्यान, शंकर दास हे स्वभावाने अत्यंत साधे-सरळ आहेत, असं तेथील लोक सांगतात.