शरद पवार-अजित पवार भेटीवर देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया
प्रणाली कापसे, प्रतिनिधी मुंबई, 16 जुलै : महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आजचा दिवस पुन्हा एकदा महत्त्वाचा ठरला आहे, कारण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेल्या फुटीनंतर अजित पवार त्यांच्यासोबत असलेल्या आमदार, मंत्री आणि नेत्यांना घेऊन शरद पवारांच्या भेटीला गेले होते. अचानकपणे अजित पवार गट शरद पवारांना भेटायला गेल्यामुळे राज्याच्या राजकारणामध्ये पुन्हा एकदा चर्चांना उधाण आलं. वाय.बी.चव्हाण सेंटरवर अजित पवार गट आणि शरद पवार यांच्यामध्ये चर्चा झाली. अजित पवार यांच्यासोबत प्रफुल पटेल, सुनिल तटकरे, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, आदिती तटकरे, धनंजय मुंडे हे नेते उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांमध्ये झालेल्या बैठकीबद्दल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘ही भेट झाल्याची मला कल्पना नाही, पण भेट घेतली तर त्यात काही वावगं आहे, असं मला वाटत नाही. वर्षानुवर्ष शरद पवार साहेब त्यांचे नेते आहेत. नवीन काही राजकीय समीकरण होईल, असं मला वाटत नाही,’ असं विधान देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. अजित पवार गट भेटल्यानंतर काय होती शरद पवारांची रिएक्शन? बैठकीची Inside Story का घेतली शरद पवारांची भेट? ‘शरद पवार यांचा आशिर्वाद घेण्यासाठी आम्ही सर्वजण आलो आहोत. सर्वांनी नमस्कार करून आशिर्वाद मागितला. शरद पवारांना विनंती केली की राष्ट्रवादी एकसंघ राहू शकतो, असा प्रयत्न करावा. शरद पवारांकडून कुठलंही उत्तर दिलं गेलं नाही. शरद पवारांना न कळवता आम्ही भेटायला आलो आहोत,’ असं प्रफुल पटेल यांनी सांगितलं. दुसरीकडे जयंत पाटील यांनी मात्र अजित पवार गटाकडून दिलगिरी व्यक्त करण्यासाठी ही भेट घेण्यात आल्याचा दावा केला आहे. अचानकपणे भेट घेण्यामागे काय उद्देश आहे, हे माहिती नाही, असंही जयंत पाटील म्हणाले.