कोल्हापूर, 05 जून: भाजप खासदार संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chhatrapati) यांनी शिवराज्याभिषेक दिन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर नवं ट्वीट केलं आहे. या ट्वीटमध्ये त्यांनी शिवकालीन ‘होन’ फोटो शेअर केले आहे. दोन दिवसांपूर्वी फेसबूक लाईव्हच्या माध्यमातून त्यांनी शिवप्रेमींशी संवाद साधला होता. शिवराज्याभिषेक दिनासाठी (Shivrajyabhishek Din) कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी न करण्याचं आवाहन संभाजीराजेंनी यावेळी केलं. संभाजीराजेंनी ट्वीटमध्ये होनचे फोटो शेअर करत लिहिलं की, यंदाचा शिवराज्याभिषेक सोहळा अत्यंत दुर्मिळ व अमूल्य अशा ऐतिहासिक शिवकालीन ‘होन’ च्या साक्षीने साजरा होणार…
तसंच संभाजीराजेंनी आणखी एक ट्वीट केलं. त्यात ते म्हणतात की, स्वराज्याचे सार्वभौमत्व व संपन्नतेचे प्रतीक असणारा ‘होन’ हे केवळ चलन नसून आपली अस्मिता आहे; राष्ट्राचा अमूल्य ऐतिहासिक ठेवा आहे. रायगडच्या पवित्र भूमीत मिळालेल्या या ऐतिहासिक ‘होन’च्या साक्षीनेच यंदाचा राज्याभिषेक सोहळा साजरा होणार : छत्रपती संभाजीराजे
संभाजीराजे FB LIVE वेळी काय म्हणाले… संभाजीराजे छत्रपती यांनी प्रामुख्यानं शिवप्रेमींनी 6 जूनला रायगडावर शिवप्रेमींची गर्दी होऊ नये म्हणून त्यांनी घरीच शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्याची विनंती केली. 2007 पासून आपण सगळ्यांनीच शिवराज्यभिषेक सोहळ्याला उत्सवाचं स्वरुप दिलं आहे. शिवरायांचा राज्याभिषेक सोहळा राष्ट्रीय उत्सव व्हावा ही माझी मनापासून इच्छा आहे. पण गेल्यावर्षी कोरोनाची पहिली लाट होती म्हणून उत्सव झाला नाही, पण आपण परंपरा पाळली. गेल्यावर्षी लोकांना मी घरीच राहाण्याची विनंती केली तर लोकांनीही गेल्यावर्षी ऐकलं त्यांचे मी आभार मानतो असं संभाजीराजे छत्रपती म्हणाले. यंदाची परिस्थितीही तशीच आहे. त्यामुळं ‘शिवराय मनामनांत - शिवराज्यभिषेक दिन घराघरांत’ या भावनेतून घरीच हा सोहळा साजरा करण्याचं आवाहन शिवप्रेमींना संभाजीराजेंनी केलं आहे. जीवावर खेळण्याची वेळ नाही.. मराठा आरक्षणाबाबतच्या पत्रकार परिषदेत मी सरकारला रायगडावरून भूमिका मांडेल असा इशारा दिला. त्यामुळं हजारो शिवभक्तांना याठिकाणी आपण आंदोलन सुरू करणार असं वाटलं. त्यामुळं त्यांना रायगडला येण्याची इच्छा असल्यानं शिवभक्तांनी रायगडाकडे कूच करण्याची मोहीम सुरू केली, शिवभक्तींनी रायगडला जायचं ठरवलं. पण मीही शिवभक्त आहे आणि सोबतच शिवराय आणि शाहू महाराजांचा रक्ताचा आणि विचारांचा वारसदार आहे. सगळे रायगडावर आले आणि कोरोनाचं संकट यामुळं वाढलं तर आपण उत्तर कसं देणार. त्यामुळं माझी सगळ्यांना हात जोडू विनंती आहे सध्या घरीच राहा. जीवावर खेळण्याची सध्याची वेळ नाही, आपल्या कुटुंबाचा विचार करा अशी विनंती संभाजीराजे यांनी केली. भूमिकेविषयी शंका नको.. मी सर्वांना घरीच शिवजयंती साजरी करा सांगत असलो तरी मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मुद्द्यावरून ठाम असल्याचं संभाजीराजे म्हणाले. 28 मे रोजी सरकारकडं आपण ज्या पाच मागण्या केल्या त्या अद्याप सरकारनं पूर्ण केलेल्या नाहीत. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी फोन केले पण मागण्या मान्य केल्या नाही. सरकारकडे अजूनही पाच तारखेपर्यंत वेळ आहे. पण या मागण्या मान्य केल्या नाही तर रायगडावरून आंदोलनाची भूमिका मांडणार असल्याचा पुनरुच्चार संभाजीराजे यांनी केला. मराठा समाजाला गृहित धरू नका, आमची भूमिका ठाम आणि कायम आहे. रायगडावरून लाखो बांधवांचा आवाज मांडणारच असंही संभाजीराजे म्हणाले.