कोल्हापूर, 18 जून: कोल्हापूर (Kolhapur District)जिल्ह्यात पावसाचा जोर (Heavy rainfall) कायम आहे. पंचगंगा नदीची पाणी पातळी 33 फुटांवर गेली आहे. तसंच कोल्हापूर जिल्ह्यातील 59 बंधारे पाण्याखाली गेले असून अनेक रस्ते वाहतुकीसाठी बंद झालेत. राधानगरी धरणातून 1100 क्यूसेक पाण्याचा विसर्ग होत आहे. तसंच चंदगड- गडहिंग्लज राज्य महामार्गावर भडगावजवळ पाणी साचलं आहे. गेल्या 12 तासात तीन फुटांनी पाण्याची पातळी वाढली आहे. नदीकाठच्या गावांना जिल्हा प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या आठवड्यात धुमाकूळ घालणाऱ्या पावसानं पाच- सहा दिवस विश्रांती घेतली होती. मंगळवारी संध्याकाळ नंतर हळूहळू पावसाची रिपरिप सुरू झाली. बुधवारी पहाटेपासूनच पावसाच्या जोरदार सरी कोसळू लागल्या. त्यानंतर रिमझिम पाऊस सुरू होता. पण धरणक्षेत्रात मुसळधार पाऊस झाला. गगनबावडा राधानगरी आणि आजरा तालुक्यात अतिवृष्टी झाली आहे.
राधानगरी ,तुळशी ,कासारी, कुंभी, पाटगाव, दूधगंगा या धरणक्षेत्रात रात्रभर अतिवृष्टी झाली. जिल्ह्यात अनेक ठिकाणी पाणीच पाणी झाले आहे. पंचगंगा नदीची काल संध्याकाळी चार वाजता पाणीपातळी 14 फूट होती. पावसाचा जोर कायम असल्यामुळे आपत्ती व्यवस्थापन सज्ज झाले आहे.
संभाव्य महापुराचा धोका टाळण्यासाठी प्रशासकीय पातळीवर पूर्ण तयारी करण्यात आली आहे. पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून काठावरील मंदिरे पाण्याखाली गेली आहेत.