मुंबई, 03 जानेवारी : अभिनेत्री उर्मिला मातोंडकर आणि कंगना रणौत यांच्यातला वाद सर्वांनाच माहिती आहे. कंगना रणौतने उर्मिलाच्या नव्या आलिशान ऑफिसवरून डिवचल्यानंतर आता उर्मिलाने कंगनाला थेट आव्हान दिलं आहे. “वेळ आणि जागा तुम्ही सांगा, सगळी फ्लॅट आणि ऑफिसची डॉक्युमेंट्स घेऊन हजर होते. पण त्याआधी जर Y प्लस सिक्युरिटी ज्यासाठी तुम्हाला दिली आहे याचा विचार करून NCB ला ड्रग्जचे व्यवहार करणाऱ्यांची नावं द्या”, असं उर्मिला यांनी म्हटलं आहे. उर्मिला मातोंडकर यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर काही दिवसातच मुंबईत एक आलिशान कार्यालय उभं केलं. त्यासाठी त्यांनी 3 कोटी रुपये खर्चून ऑफिस विकत घेतलं. ही बातमी ट्वीट करत अभिनेत्री कंगनाने उर्मिलाला लक्ष्य केलं. अत्यंत खोचक भाषेत उर्मिलावर ट्विटर वार करताना कंगनाने लिहिलं, “मी एवढ्या मेहनतीने घर बांधलं तेही काँग्रेसने तोडलं. खरंच लोक म्हणतात तसं भाजपला साथ देऊन तर माझ्या हाती काय लागलं… तर 20-25 कोर्ट केसेस. तुमच्याप्रमाणे मी समजदार नाही ना, नाहीतर मी पण काँग्रेसचा हात पकडला असता. किती मूर्ख आहे मी…” या ट्वीटनंतर काही वेळातच उर्मिला यांनी हा VIDEO ट्वीट केला आहे. काय आहे उर्मिला मातोंडकर यांच्या व्हिडीओमध्ये? उर्मिला मातोंडकर म्हणाल्या, “कंगना, तुमची माझ्याबद्दलची जी मतं आहेत ती मलाही माहिती आहेत आणि साऱ्या देशालाही. तुम्ही फक्त वेळ आणि जागा सांग मी 2011 मध्ये अंधेरीमध्ये जो फ्लॅट घेतला होता त्याचे मी पेपर्स घेऊन येते त्यानंतर तो फ्लॅट विकल्याचेही पेपर्स घेऊन येते. मी केलेला हा सर्व व्यवहार राजकारणात येण्याआधी केला होता. याचे सगळे पुरावे माझ्याकडे आहेत. तुम्ही फक्त एक काम करा तुमच्याकडे NCB ला देण्यासाठी जी लिस्ट आहे ती द्या. कारण तुमच्याकडे अशा कोणत्या लोकांची नावं आहेत याची माहिती मलाच काय पण साऱ्या देशाला जाणून घेण्याची उत्सुकता आहे.”
कंगना रणौत आणि उर्मिला मातोंडकर यांचा एकमेकींशी पंगा काही नवा नाही. विशेषतः उर्मिलानी शिवसेनेचा हात धरल्यानंतर तर दोघींच्यात अनेक वेळा ट्विटर युद्ध झडलं होतं.
कंगना काही दिवसांपूर्वी मुंबईत परतली आणि मराठमोळ्या वेशात प्रभादेवीच्या सिद्धिविनायकाच्या दर्शनाला गेली. त्या वेळी तिने एक Tweet केलं होतं. “माझ्या लाडक्या मुंबईसाठी उभे राहिल्यामुळे मला किती शत्रूंचा सामना करावा लागला. मी आज मुंबा देवी आणि श्री सिद्धिविनायकाच्या दर्शनाला गेले आणि त्यांचा आशीर्वाद घेतला. मला खूप प्रेम मिळालं. आता मला सुरक्षित वाटतं आहे.” या Tweet ची खिल्ली उडवत उर्मिलानी - “माझ्या लाडक्या मुंबईसाठी उभं राहिल्याबद्दल धन्यवाद. बाईंच्या डोक्यावर अपघात झाला आहे का हो भाऊ”, असं खोचक ट्वीट केलं होतं.