मुंबई, 13 ऑक्टोबर: रोहित शर्माच्या नेतृत्वात भारतीय संघ गेल्याच आठवड्यात ऑस्ट्रेलियात दाखल झाला. मिशन टी20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडियानं आपली मोर्चेबांधणीही सुरु केली आहे. दोन सराव सामनेही टीम इंडियानं खेळले. पुढच्या आठवड्यात ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडविरुद्ध भारतीय संघ अखेरची मॅच प्रॅक्टिस करणार आहे. पण त्याआधी भारतीय संघासमोर एक मोठी अडचण उभी राहिली आहे. वर्ल्ड कपसाठी बीसीसीआयनं दोन खेळाडूंना नेट बॉलर म्हणून पाठवण्याचा निर्णय घेतला होता. पण टीम इंडिया ऑस्ट्रेलियात पोहोचली तरी हे दोन खेळाडू मात्र अजूनही भारतातच अडकून आहेत. व्हिसा प्रक्रियेला उशीर आयपीएल स्टार उमरान मलिक आणि मध्य प्रदेशचा युवा खेळाडू कुलदीप सेन हे नेट बॉलर म्हणून ऑस्ट्रेलियाला जाणार होते. भारतीय संघाला मदत व्हावी म्हणून या दोघांनाही नेट बॉलर म्हणून पाठवण्याचा निर्णय बीसीसीआयनं घेतला होता. पण अद्याप ऑस्ट्रेलियन व्हिसा न मिळाल्यानं दोघेही अजून भारतातच अडकले आहे. त्यामुळे व्हिसा मिळेपर्यंत दोघांनाही आपापल्या डोमेस्टिक टीमकडून सध्या सुरु असलेल्या सय्यद मुश्ताक अली टी20 साठी खेळण्याची परवानगी देण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार दोघांच्या व्हिसासाठी बीसीसीआयनं वेळेत सगळी प्रक्रिया पूर्ण केली होती. पण ऑस्ट्रेलियन प्रशासनाकडून विलंब झाल्यांनं दोघेही बॉलर भारतातच अडकले.
हेही वाचा - Womens Asia Cup: टीम इंडियाची वुमन्स ब्रिगेड फायनलमध्ये, पाहा कधी आणि कुणाविरुद्ध होणार मेगा फायनल? काय आहे नेमकं कारण? उमरान आणि कुलदीप सेनच्या व्हिसा प्रक्रियेबाबत आता ऑस्ट्रेलियनं हाय कमिशननं स्पष्टीकरण दिलं आहे. हाय कमिशनच्या एका प्रवक्त्यानं म्हटलंय की खेळाडूंच्या व्हिसाची व्यवस्था केलेली होती, त्यासाठी नकार दिलेला नाही.’ उमरान आणि कुलदीपला व्हिसा न मिळण्याचं प्रमुख कारण हे आहे की दोघेही भारताच्या 15 सदस्यीय संघाचे सदस्य नाहीत. स्टँड बाय खेळाडूंमध्येही त्यांचं नाव नाही. आयसीसीच्या नियमानुसार टीममधील खेळाडू आणि स्टँड बाय खेळाडूंना तातडीनं व्हिसा उपलब्ध करुन देण्याची सोय आहे. पण अन्य खेळाडूंना हा नियम लागू होत नाही. याच कारणामुळे उमरान आणि कुलदीपला लवकर व्हिसा मिळाला नाही.