मुंबई, 29 सप्टेंबर: वर्ल्ड कप मोहिमेसाठी ऑस्ट्रेलियाला रवाना होण्यापूर्वी भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. जसप्रीत बुमराची पाठीची दुखापत आणखी बळावल्यानं भारतीय संघव्यवस्थापन आणि निवड समितीसमोर मोठी अडचण निर्माण झाली आहे. वर्ल्ड कपसाठी बुमरा हा टीम इंडियाचा हुकमी एक्का मानला जात होता. पण आधी आशिया कप आणि आता वर्ल्ड कपलाही त्याला मुकावं लागणार आहे. परिणामी भारतीय निवड समितीला वर्ल्ड कपसाठी बुमराऐवजी नव्या बॉलरचा अंतिम 15 जणांमध्ये समावेश करावा लागणार आहे. शमी, चहर स्टँड बाय मध्ये टीम इंडियानं वर्ल्ड कपसाठी संघनिवड करताना चार खेळाडूंना स्टँड बायमध्ये ठेवलं होतं. मोहम्मद शमी, दीपक चहर, रवी बिश्नोई आणि श्रेयस अय्यर या चौघांचा स्टँड बाय खेळाडूंमध्ये समावेश आहे. त्यापैकी बुमराची जागा घेतील असे दोन वेगवान गोलंदाज म्हणजे शमी आणि दीपक चहर. पण कोरोना झाल्यामुळे मोहम्मद शमीला ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी20 मालिकेला मुकावं लागलं आहे. त्यामुळे दीपक चहरला तिरुअनंतपूरमच्या टी20त संधी मिळाली. त्यात त्यानं दोन विकेट्सही काढल्या. त्यामुळे दीपक चहरचा अंतिम 15 मध्ये समावेश होण्याची शमीपेक्षा जास्त शक्यता आहे. हेही वाचा - T20 World Cup Breaking: टीम इंडियाला सर्वात मोठा धक्का, वर्ल्ड कपमधून रोहितचा हुकमी एक्का ‘आऊट’ सिराजचंही नाव चर्चेत पण बुमराच्या जागी आता आणखी एका नावाची चर्चा होतेय ती म्हणजे मोहम्मद सिराजची. गेल्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात सिराजनं दमदार कामगिरी बजावली होती. त्यामुळे ऑस्ट्रेलियातल्या खेळपट्ट्यांचा विचार करता मोहम्मद सिराजला देखील ऑस्ट्रेलियाचं तिकीट मिळेल याची शक्यता नाकारता येत नाही. शिवाय सिराज सध्या इंग्लंडमध्ये काऊंटी क्रिकेट खेळत आहे.
बुमराची दुखापत मोठी? दरम्यान दुखापतीनंतर बुमराला बंगळुरुतल्या नॅशनल क्रिकेट अकॅडमीत पाठवण्यात आलं आहे. तिथे बीसीसीआयची मेडिकल टीम त्याच्या दुखापतीवर लक्ष ठेऊन आहे. या दुखापतीचं स्वरुप काय आहे याची अधिकृत माहिती समोर आलेली नाही. पण मिळालेल्या माहितीनुसार बुमराला या दुखापतीतून सावरण्यासाठी तब्बल सहा महिने विश्रांती घ्यावी लागणार असल्याची शक्यता आहे.