पुणे, 27 फेब्रुवारी: कोरोनाची महाराष्ट्रातील आकडेवारी (Coronavirus Cases in Maharashtra) काहीशी भीतीदायक आहे. कोरोनाचे आकडे पुन्हा एकदा वाढू लागले आहेत. अशा परिस्थितीत राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये कमी अधिक प्रमाणात निर्बंध लादण्यात आले आहे. एकेकाळी कोरोनाचा हॉटस्पॉट ठरलेल्या पुण्यातही परिस्थिती काही वेगळी नाही आहे. पुन्हा एकदा पुण्यात कोरोनाच्या वाढत्या संख्येमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. दरम्यान संशोधन संस्थांच्या अहवालानुसार, गेल्यावर्षी सप्टेंबरच्या तुलनेत आताची रुग्णसंख्या निम्मी म्हणजे 50 टक्के राहील असा अंदाज आहे. 2020 मध्ये सप्टेंबर अखेरीस पुण्यात रुग्णसंख्या सर्वाधिक होती. भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्था (आयसर) आणि टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) च्या अभ्यासात ही बाब समोर आली आहे. महाराष्ट्र टाइम्सने याबाबत वृत्त दिले आहे. या मीडिया अहवालानुसार या संस्था त्यांचा अहवाल आठ दिवसात सादर करणार आहेत. सखोल अभ्यासाअंती पुण्यातील निर्बंधाबाबत निर्णय घेण्यात येणार आहे. कोणत्या प्रकारचे निर्बंध आणायचे याबाबत आठ दिवसांनी निर्णय घेतला जाईल, अशी माहिती या मीडिया अहवालात विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्या हवाल्याने देण्यात आली आहे. (हे वाचा- सलग तिसऱ्या दिवशी कोरोना रुग्णांची संख्या चिंताजनक, अनेक जिल्ह्यांमध्ये Lockdown ) आयसर आणि टीसीएस या दोन्ही संस्था पुण्यात कोरोनाची रुग्णसंख्या कमी करण्यासाठी कोणत्या उपाययोजना करता येईल, याबाबत अभ्यास करणार असल्याची माहिती राव यांनी दिली. याबाबत पालकमंत्री अजित पवार यांच्याशी देखील चर्चा केली जाणार आहे. त्यांनंतर निर्बंधाबाबत निर्णय घेतला जाणार आहे. काय असू शकतील निर्बंध? राव यांनी दिलेल्या माहितीनुसार शाळा आणि महाविद्यालये महिनाभरासाठी बंद राहू शकतात, शिवाय लग्नसमारंभांवर देखील दोन महिन्यांसाठी कडक निर्बंध येण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे बार बंद ठेवणे, हॉटेल-रेस्टॉरंटमधून फक्त पार्सल सेवा सुरू ठेवणे इ. निर्बंध पुणेकरांवर लादले जाऊ शकतात अशी माहिती यावेळी राव यांनी दिली. (हे वाचा- 1 मार्चपासून तुम्हालाही मिळणार CORONA VACCINE; लसीकरणासाठी अशी करा नोंदणी ) सध्या पुण्यात शाळा-महाविद्यालये 28 फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आता आणखी पुढे शाळा-कॉलेज बंद ठेवायचे की नाही याबाबत आज निर्णय घेतला जाईल. जिल्हाधिकारी आणि पुणे तसंच पिंपरी चिंचवड पालिका आयुक्तांची याबाबत बैठक होणार आहे, अशी माहिती राव यांनी दिली. पालकमंत्री पवार यांनी यासंदर्भात आदेश दिल्याचं ते म्हणाले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.