

आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाइन वर्कर्सनंतर आता 1 मार्चपासून सर्वसामान्य नागरिकांचंही कोरोना लसीकरण सुरू होणार आहे. 60 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या म्हणजे ज्येष्ठ नागरिक आणि 45 पेक्षा जास्त वयाच्या ज्यांना इतर आजार आहेत, अशा व्यक्तींचा या लसीकरणात समावेश आहे.


सरकारी आणि खासगी केंद्रांवर ही लस दिली जाईल. यासाठी 10,000 सरकारी आणि 20,000 खासगी केंद्रे आहेत. सरकारी केंद्रांवर मोफत तर खासगी केंद्रावर शुल्क घेऊन लस दिली जाईल.


सरसकट कोरोना लस दिली जाणार नाही तर यासाठी नोंदणी करणं गरजेचं आहे. तुम्ही स्वतःदेखील एक मार्चपासून ऑनलाइन नोंदणी करू शकता. Co-Win अॅप 1 मार्चपासून सर्वसामान्यांसाठी उपलब्ध होईल. तोपर्यंत ऑफलाइन नोंदणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.


को-विन (Co-Win), आरोग्य सेतू (Aarogya Setu) अॅप या मोबाइल अॅपच्या माध्यमातून किंवा cowin.gov.in या संकेतस्थळावरून तुम्हाला ऑनलाइन नोंदणी करता येईल.


ऑनलाइन नोंदणी करताना सर्वात आधी तुमचा मोबाइल क्रमांक टाका. यानंतर तुम्हाला अकाऊंट तयार करण्यासाठी ओटीपी मिळेल. यानंतर तुमचं नाव, वय, लिंग आणि आवश्यक ओळखपत्रं अपलोड करा.


जर तुम्ही ज्येष्ठ नागरिक नसाल पण तुमचं वय 45 पेक्षा जास्त असेल आणि तुम्हाला इतर आजार असेल तर तुम्हाला असलेल्या आजाराचं सर्टिफिकेट तुम्हाला द्यावं लागेल.


तुम्हाला मोबाइल अॅप किंवा ऑनलाइन रजिस्ट्रेशन करणं शक्य नसेल तर तुम्ही जवळच्या सेवा केंद्रांवर जाऊन तिथं आपली नोंदणी करू शकता किंवा 1507 या क्रमांकावर कॉल करून नोंदणी करा.