मुंबई 27 फेब्रुवारी : राज्यातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या (Covid Rising Cases) चिंतेत भर घालणारी आहे. झपाट्यानं वाढणाऱ्या कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेता अनेक जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊनची (Lockdown) घोषणाही केली गेली आहे. मात्र, असं असतानाही शुक्रवारी सलग तिसऱ्या दिवशी कोरोनाचे आठ हजार रुग्ण आढळून आले आहेत. तर, शुक्रवारच्या 24 तासांमध्ये 48 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आरोग्य विभागाच्या एका अधिकाऱ्यानं सांगितलं, की आतापर्यंतच्या एकूण कोरोना रुग्णांची संख्या 21,38,154 झाली आहे. तर, आतापर्यंत 52,041रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाबाधितांच्या एकूण संख्येतील जवळपास 40 टक्के रुग्ण हे मुंबई, पुणे, नागपूर आणि अमरावती या जिल्ह्यांमधील आहेत. राज्यात आतापर्यंत 20,17,303 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत तर सध्या 67,608रुग्णांवर उपचार सुरू आहेत. अनेक जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊन - अशात अशी माहिती समोर आली आहे, की अकोला जिल्ह्यातील लॉकडाऊन 7 दिवस वाढवून 8 मार्चपर्यंत करण्यात आलं आहे. याशिवाय नागपूरमध्येहील 7 मार्चपर्यंत जिल्ह्यातील सगळ्या शाळा, कॉलेज, कोचिंग बंद राहातील, तसंच प्रमुख बाजारही या काळात शनिवारी आणि रविवारी बंद राहातील. या काळात सार्वजनिक तसंच राजकीय कार्यक्रमांनाही परवानगी नसणार. अमरावतीमध्येही 22 फेब्रुवारीपासून एका आठवड्याचा लॉकडाऊन जाहीर करण्यात आलेला आहे. याशिवाय पुण्यातही रात्री 11 ते सकाळी 6 यावेळेत संचारबंदी करण्यात आली आहे. या काळात अत्यावश्यक काम असल्यास लोक बाहेर पडू शकतात. जिल्ह्यातील शाळा 28 फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विजय वडेट्टीवार म्हणाले, की राज्यातील रुग्ण सलग वाढतच राहिल्यास 12 तासांचा नाईट कर्फ्यू लावण्यात येईल. 1 मार्चपासून बदलणार कोरोना लसीकरणाचे नियम - याच दरम्यान कोरोनाचा वाढता प्रसार पाहाता सरकारनं लसीकरणाच्या नियमांमध्ये बदल केला आहे. मंत्रालयानं म्हटलं, की एक मार्चपासून देशव्यापी लसीकरणाला मोठ्या स्तरावर सुरुवात होत आहे, यात 60 वर्षापेक्षा अधिक वय असणारे नागरिक तसंच आधीपासून अन्य आजारांनी ग्रस्त असणाऱ्या 45 वर्षापेक्षा अधिक वय असणाऱ्या नागरिकांना आधी लस दिली जाणार आहे. लसीकरणाची मोहिम लवकरात लवकर राबवून कोरोनाची साखळी तोडण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.