मुंबई, 28 जुलै : राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोरोनाच्या परिस्थितीत कामाचा धडका लावला आहे. पुणे, बारामतीवर अजितदादा चांगलेच लक्ष ठेवून आहे. तर आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी अजिदादांच्या कामाचे कौतुक करत महत्त्वाची सूचना केली आहे.
कोरोनाच्या परिस्थितीत शरद पवार हे राज्यभरात दौरे करत आहे. आज मुंबईत त्यांनी न्यूज 18 लोकमतशी बोलत असताना शरद पवारांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कामाचे कौतुक केले आहे. तसंच दोन्ही नेत्यांबद्दल आपली भावना व्यक्त करत महत्त्वाची सूचना केली आहे.
'अजित पवार यांच्याकडे राज्याचे अर्थ खाते अर्थात फायनान्स आणि प्लॅनिंग जबाबदारी आहे. अजितदादा सध्या फिल्डवर जोरदार काम करत आहे. पण त्यांची फिल्डपेक्षा मंत्रालयात अधिक गरज आहे. अनिल देशमुख, राजेश टोपे, राजेंद्र शिंगणे यांना फिल्डवर काम करण्याची जबाबदारी दिली आहे, असंही सांगून पवारांनी अजितदादांना एकाप्रकारे मंत्रालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहे.
अजित पवार, जयंत पाटील यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षची जबाबदारी आहे', असंही पवारांनी स्पष्ट केले आहे.
तर गेल्या काही दिवसांपासून भाजप नेते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे 'मातोश्री'वर बसून काम करत आहे. ते मंत्रालयात येत नाही, अशी टीका करत आहे. त्यांच्या टीकेचा धागा पकडून शरद पवारांनी उद्धव ठाकरे यांच्या कारभाराबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.
'मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे काम चांगले आहे. त्यांनी एका ठिकाणी बसून परिस्थिती सांभाळावी यात कोणताही वाद नाही. पण थोडं फिरलंही पाहिजे' असं सांगत शरद पवारांनी आपली नाराजी बोलून दाखवली आहे.
तसंच, राज्यातील धोरणात्मक निर्णय हे मुख्यमंत्री घेत असतात. प्रशासन घेत नाही. विशेषतः सर्व सहकाऱ्यांना मुख्यमंत्री विश्वासात घेऊन काम करत आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या सरकारला चिंता नाही. ते सहकाऱ्यांना सोबत घेऊन काम करत आहे', असं कौतुकही पवारांनी केले.
त्याचबरोबर 'महाविकास आघाडी सरकारचा रिमोट कंट्रोल माझ्या हातात नाही. आम्ही सगळ्यांनी एकत्र येऊन सरकार स्थापन केले आहे. मागील सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या एकांगी कारभारामुळे संधी जाणवली होती. या परिस्थितीत आम्ही सर्व चाचपडून पाहिलं आणि याचे नेतृत्व शिवसेनेकडे जावं यासाठी एकमत झाले होते', असंही पवारांनी सांगितलं.
'आज काँग्रेस तसंच राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये अस्वस्थता आहे. आता तीन पक्षांचे आघाडी सरकार आले तर कुठल्याही आघाडीच्या सरकारमध्ये अशी नाराजी आणि अस्वस्था असणारच आहे. राज्य चालवताना काही इच्छा असतात, त्या आघाडी सरकारमध्ये सर्व इच्छा पूर्ण होतात असे नाही म्हणून काही जण अस्वस्थ असतात' असं सांगत पवारांनी काही मंत्री अस्वस्थ असल्याची कबुली दिली आहे.