महाविकासआघाडीतला धुरळा, सत्तेसाठी जमले 'सोयरे सकळ' !

महाविकासआघाडीतला धुरळा, सत्तेसाठी जमले 'सोयरे सकळ' !

राज्यातल्या महाविकास आघाडी सरकारमध्ये सोयऱ्यांचा गोतावळा पाहायला मिळत आहे.

  • Share this:

मुंबई, 30 डिसेंबर : राज्यातल्या महाविकास आघाडी सरकारमध्ये सोयऱ्यांचा गोतावळा पाहायला मिळत आहे. सत्तेतील सोयरे सकळ, या उक्तीची सार्थ प्रचिती मंत्रिमंडळाच्या विस्तारात पाहायला मिळाली.

महाविकास आघाडी सरकारच्या पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात तरूण चेहऱ्यांना प्राधान्य देण्यात आलंय. मात्र, जवळपास सर्वच तरूण चेहरे राजकीय घराण्यांशी संबंधित आहेत. तीन पक्षांनी एकत्र येऊन राज्यात सत्ता स्थापन केली. मात्र, या सत्तेत सामान्य आमदारांना मंत्रिपद देण्याऐवजी सत्तेतील सोयरे सकळ, खूश राहतील याचीच काळजी घेण्यात आलीय.

पहिल्यांदाचा निवडून आल्यानंतर  विधानसभेत पाऊल ठेवणाऱ्या आदित्य ठाकरेंना शिवसेनेनं थेट कॅबिनेटमंत्री केले. मुख्यमंत्री असलेले उद्धव ठाकरे आणि मुलगा आदित्य ठाकरे ही ठाकरेशाही सत्तेत चांगलीच रमली. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी घराणेशाहीवर नेहमीच टीका केली. मात्र, प्रिन्स सूटमधल्या आदित्य ठाकरेंनी शिवसेनेतल्या घराणेशाहीवर शिक्कामोर्तब केलं.

माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे चिरंजीव लातूर मतदारसंघातून सलग तिसऱ्यांदा निवडून आले. 2014 साली आघाडी सरकारमध्ये अमित देशमुखांनी राज्यमंत्रिपदाची धुरा सांभाळली होती. आणि तिसऱ्यावेळी थेट कॅबिनेटमंत्री पदापर्यंत अमित देशमुख पोहोचले.

दोन वेळा मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी सांभाळणारे अशोक चव्हाण हे माजी मुख्यमंत्री आणि माजी केंद्रीय गृहमंत्री शंकरराव चव्हाण यांचे पुत्र. लहानपणापासून सत्तेचे खेळ आणि कायम सत्तेच्या विविध पदांवर असणारे अशोक चव्हाण सकळ सत्तेचे कायमचेच सोयरे आहेत, असं म्हटलं तरी अतिशयोक्ती होणार नाही. मात्र, याच अशोक चव्हाणांना आदर्श प्रकरणात मुख्यमंत्रिपद गमवावं लागलं होतं.

गोपीनाथ मुंडेंचे पुतणे आणि बीड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष पंडितराव अण्णा मुंडे यांचे पुत्र धनंजय मुंडे. गोपीनाथ मुंडेंच्या मुशीत तयार झालेल्या धनंजय यांनी भाजयुमोमध्ये मोठी जबाबदारी त्यांनी सांभाळली. नंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करून विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते झाले. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडेंचा पाडाव करून  आता धनंजय मुंडेंनी कॅबिनेट मंत्रीपदावर झेप घेतली.

जालना जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत बडे नेते अंकुशराव टोपे यांचे पुत्र राजेश टोपे आघाडी सरकारमध्येही मंत्री होते. अंकुशराव टोपे आमदार आणि खासदार म्हणून निवडून आले होते.

नगर जिल्ह्यातले बडे नेते यशवंतराव गडाख यांचे पुत्र शंकरराव गडाख थेट कॅबिनेटमंत्री झाले. गडाख, काळे, कोल्हे आणि विखे कुटुंबाचं नगर जिल्ह्यात मोठं प्रस्थ आहे. नगर जिल्ह्यातला सत्तेच्या सोयऱ्यांचा गोतावळा गडाख कुटुंबानंही सांभाळलेला आहे.

काँग्रेसचे दिवंगत नेते आणि माजी मंत्री पतंगराव कदम यांचे पुत्र असलेले विश्वजीत कदम यांनी राज्य काँग्रेसमध्ये अनेक जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. भारती विद्यापीठाचे सचिव असलेले विश्वजीत कदम राज्यातल्या बड्या राजकीय कुटुंबातून येतात. वादग्रस्त ठेकदार अविनाश भोसलेंचे विश्वजीत कदम जावई आहेत.

मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष आणि माजी खासदार एकनाथ गायकवाड यांच्या कन्या वर्षा गायकवाड यांची कॅबिनेटमंत्रिपदी वर्णी लागली.  धारावी मतदारसंघातून सातत्यानं निवडून येणाऱ्या वर्षा गायकवाडांना काँग्रेसनं संधी दिलीय. मात्र मुंबईतून प्रतिनिधित्त्व देताना काँग्रेसनं घराणेशाहीच कायम ठेवलीय.

खासदार आणि माजी मंत्री सुनील तटकरे यांची कन्या आदिती तटकरे पहिल्यांदाच निवडून येऊन थेट राज्यमंत्री झाल्या. रायगड जिल्ह्यातलं बडं प्रस्थ असलेल्या तटकरे कुटुंबानंही घराणेशाहीलाच प्राधान्य दिल्याचं दिसून येतं.

माजी खासदार प्रसाद तनपुरे यांचा मुलगा असलेल्या प्राजक्तनं पहिलीच निवडणूक जिंकली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकीटावर जिंकलेल्या प्रसादला थेट राज्यमंत्री करण्यात आलं.

सर्वच पक्षाचे नेते त्यांच्यासाठी कार्यकर्ते महत्त्वाचे असल्याचं सांगतात. मात्र, मंत्रिपद देण्याची जेव्हा वेळ येते. त्यावेळी कार्यकर्ते नव्हे तर मुलगा, मुलगी, पुतण्या आणि नातेवाईकांना प्राधान्य दिलं जातं. रस्त्यावर लढण्यासाठी कार्यकर्ते नेत्यांना हवे असतात. मात्र, मंत्रिपदासाठी सकळ पक्ष सगेसोयऱ्यांनाच पसंती देतात.

Published by: sachin Salve
First published: December 30, 2019, 11:28 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading