नितीन बनसोडे,लातूर,ता.26 जून: शिक्षणाचा लातूर पॅटर्न प्रचंड लोकप्रिय झाला होता. पालक आणि विद्यार्थी आकर्षित व्हावा, या साठीची जाहिरातबाजी, स्पर्धेत यशस्वी होण्यासाठीची स्पर्धा मग थेट सुपारी देण्यापर्यंत जाऊन पोहोचली. स्टेप बाय स्टेप क्लासचे संचालक अविनाश चव्हाण यांच्या हत्येनं ही काळी बाजू समोर आलीय.
गेल्या वर्षी जिमच्या उद्घाटनासाठी अभिनेत्री सनी लिओनीला लातूरात आणल्यानं अविनाश चव्हाण चर्चेत आले होते. क्लासमधल्या गुणवंत विद्यार्थ्याना तब्बल एक कोटी रुपयांची पारितोषिकं वितरित केल्यानंतर तर अनेकांचे डोळे विस्फारले होते.
इतर क्लासचालकांच्या डोळ्यात चव्हाणांची ही प्रगती खुपू लागली. यातूनच कुमार मॅथस क्लासेस चालवणा-या चंदनकुमार शर्मा यानं चव्हाणांच्या हत्येची २० लाखांची सुपारी दिल्याचं उघड झाल्याची माहिती पोलीसांनी दिली आहे.
या प्रकरणी पोलिसांनी मुख्य आरोपी चंदनकुमार शर्मा, महेशचंद्र गोगडे, शरद घुमे, करण गहिरवाल आणि अक्षय शेंडगे अशा पाच आरोपीना अटक केलीय. शिक्षणाचा लातूर पॅटर्न देशभरात गाजल्यानं विद्यार्थ्यांचा मोठा ओढा पररज्यातूनही इथं येतो.
याचाच फायदा घेऊन खासगी क्लास चालक विद्यार्थ्यांकडून हजारो रुपये फी वसूल करून कोट्यवधींची माया कमावतात. या सर्व गळेकापू स्पर्धेची परिणीती हत्येमध्ये झालीय. लातूर शहरात क्लास हाच एकमेव 'उद्योग' धुमधडाक्यात सुरू आहे. इतर प्रांतांतून लातुरात बस्तान बसवणाऱ्या शिकवणी वर्गाचं प्रस्थही वाढतंय.
त्यातूनच स्थानिक विरूद्ध परप्रांतिय अशी तेढही वाढतेय. याचीच परिणीती मग एखाद्याची थेट सुपारी देऊन हत्या होण्यापर्यंत होते. शिक्षण क्षेत्रात घुसलेल्या या गुन्हेगारीकरणाबद्दल नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा