Home /News /national /

राहुल गांधींनी चिनी शिष्टमंडळाला भेटण्यासाठी प्रोटोकॉल तोडला; आप-खलिस्तानी लिंक्सची चौकशी करणार: अमित शहा

राहुल गांधींनी चिनी शिष्टमंडळाला भेटण्यासाठी प्रोटोकॉल तोडला; आप-खलिस्तानी लिंक्सची चौकशी करणार: अमित शहा

पंजाब, उत्तर प्रदेश निवडणूक (Assembly Election 2022), त्यानिमित्ताने सुरू असलेला प्रचार, काँग्रेसचा अजेंडा, हिजाब प्रकरणा या सगळ्यावर गृहमंत्री अमित शाहा यांनी Network18 ला दिलेल्या मुलाखतीत भाष्य केलं.

नवी दिल्ली, 21 फेब्रुवारी:  'राहुल गांधींना (Rahul Gandhi) या देशाचा इतिहास माहीत नाही. 1962 मध्ये काय आणि कोणामुळे घडलं हे त्यांना माहीत नाही. नरेंद्र मोदी (Narendra Modi Government) सरकारने चीनच्या (China) प्रत्येक आव्हानाला जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे,' असं केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शहा (Amit Shah) यांनी नेटवर्क 18 ला दिलेल्या विशेष मुलाखतीत स्पष्ट केलं.  Uttar Pradesh Election 2022 निमित्ताने काँग्रेस, राजकारण, प्रचारादरम्यानची वक्तव्य या सगळ्याबद्दल शहा यांनी टिप्पणी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या काश्मीरबाबतच्या धोरणांमुळे पाकिस्तान आणि चीनला अधिक जवळ आणलं आहे, असं विधान काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी 3 फेब्रुवारी रोजी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरच्या धन्यवाद प्रस्तावावरच्या चर्चेदरम्यान लोकसभेत (Loksabha) केलं होतं. त्याविषयी नेटवर्क 18 चे ग्रुप एडिटर-इन-चीफ राहुल जोशी यांनी शहा यांना विचारलं असता त्यांनी हे उत्तर दिलं. 'नरेंद्र मोदी सरकारने देशाच्या सीमा आणि सार्वभौमत्वाचं रक्षण केलं आहे. कोणत्याही राष्ट्रीय नेत्यानं शेजारी देशांबद्दल अशी विधानं करणं योग्य आहे, असं मला वाटत नाही. मला त्यांना विचारायचं आहे, की तुम्ही संसदेत (Parliament) असं बोलत आहात, मात्र तुम्ही स्वत:च चिनी प्रतिनिधी मंडळाला भेटण्यासाठी सर्व प्रोटोकॉल (Protocol) तोडले आहेत. तुम्ही त्यांच्याशी कशी काय चर्चा करता? अशा विधानांवरून देशात गंभीर राजकारण्यांची कमतरता असल्याचं स्पष्ट होत आहे,' असंही शहा म्हणाले. काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी-वड्रा (Priyanka Gandhi Wadra) यांच्या 'लडकी हूँ; लड सकती हूँ' या मोहिमेबद्दल आणि उत्तर प्रदेशातल्या महिला आरक्षणाच्या आश्वासनाबाबत विचारलं असता, अमित शहा यांनी गेल्या वर्षी पश्चिम बंगालच्या निवडणुकीतल्या काँग्रेसच्या कामगिरीची आठवण करून दिली. 'पश्चिम बंगाल निवडणुकीत त्यांनी शून्य जागा जिंकल्या... यातून त्यांचं भविष्य दिसत आहे,' अशी टिप्पणी त्यांनी केली. पंजाबचे मुख्यमंत्री चरणजित सिंग चन्नी (Punjab CM Charanjit Singh Channi) यांनी निवडणूक प्रचारादरम्यान प्रियांका गांधी यांच्या उपस्थितीत 'भैयांना पंजाबमध्ये प्रवेश करू देणार नाही' असं वक्तव्य केलं, त्याचा शहा यांनी निषेध केला. 'ही काँग्रेस पक्षाची शैली आहे. ते वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी विधानं करतात. हे विधान समाजासाठी योग्य आहे असं मला वाटत नाही. भारत एक राष्ट्र आहे. ज्याला गुजरात, उत्तर प्रदेश किंवा पंजाबमध्ये आपला उदरनिर्वाह चालवायचा असेल तो ते करू शकतो. मतांसाठीच्या अशा प्रकारच्या विधानांचं किंवा राजकारणाचं मी समर्थन करत नाही. या वक्तव्याला प्रियांका गांधी अनुमोदन देत होत्या. दोन दिवसांनी त्या उत्तर प्रदेशमध्ये पक्ष उत्तर प्रदेशच्या अभिमानासाठी लढत आहे असं त्या म्हणाल्या. अवघ्या दोन दिवसांत असा विरोधाभास मी कधीच पाहिला नाही,' असंही शहा म्हणाले. केंद्र सरकारनं बंदी घातलेला फुटीरतावादी गट शीख फॉर जस्टिस (SFJ) आणि अरविंद केजरीवाल (Arvind Kejariwal) यांच्या नेतृत्वाखालची आम आदमी पार्टी अर्थात आप (AAP) यांच्यातल्या कथित संबंधांच्या आरोपांबाबत बोलताना अमित शहा म्हणाले, की दहशतवादी आणि राजकीय पक्षांमधले संबंध यांबाबत डोळेझाक केली जाणार नाही. पंजाबचे मुख्यमंत्री चन्नी यांनी अमित शहा यांना एक पत्र लिहून शीख फॉर जस्टिस (SFJ) हा गट आपच्या संपर्कात असल्याचा दावा केला होता. 2017मधल्या पंजाबच्या निवडणुकीत या संघटनेने 'आप'ला पाठिंबा दिला होता आणि सध्याच्या निवडणुकांमध्येही ते करत असल्याचंही चन्नी यांनी म्हटलं होतं. या मुद्द्यावर भाष्य करताना, 'भारत सरकारनं हे प्रकरण अतिशय गांभीर्याने घेतलं असून, आपण स्वतः या प्रकरणाचा पाठपुरावा करत असल्याचं चन्नी यांना पत्राद्वारे कळवलं असल्याचं शहा यांनी स्पष्ट केलं. 'कोणत्याही पक्षाचा फुटीरतावादी गटाशी संबंध आणि निवडणुकांमध्ये राजकीय फायद्यासाठी त्याचा वापर हा गंभीर मुद्दा आहे. कोणतंही सरकार त्याकडे दुर्लक्ष करणार नाही. एखाद्या मुख्यमंत्र्यांनी पत्र लिहिलं तर ते गांभीर्यानं घेणं आवश्यक आहे. त्यामुळं आम्हीही याबाबत कसून चौकशी करू,' असं शहा यांनी या वेळी नमूद केलं.
First published:

Tags: Amit Shah, Assembly Election, BJP, Congress, Elections, India, Rahul gandhi, Uttar pradesh

पुढील बातम्या