मुंबई 25 जून : राज्यातील राजकीय परिस्थिती आणि बंडखोर आमदारांबाबत बोलण्यासाठी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी महाराष्ट्रातील शिवसेना नगरसेवकांशी दृक्श्राव्य माध्यमातून संवाद साधला. मुख्यमंत्री म्हणाले, सध्या दाखवलं असं जात आहे, की शिवसेना राहिलीच नाही. मात्र, मी तुमच्या साथीने सभा घेणार आहे, शिवसेना मर्दांची सेना आहे, असंही ठाकरे यावेळी बोलताना म्हणाले. पुढे मुख्यमंत्री म्हणाले, शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त बोलताना मी म्हटलं होतं, दगा देणारे मला नकोत. काँग्रेस राष्ट्रवादी पाठीत खंजीर खुपसतील असं सगळे म्हणत होते, पण आज पवारसाहेब आणि सोनियाजी पाठीशी आहेत, मात्र जवळचे सोडून गेलेत. इथे उपस्थितांची पात्रता असताना त्या लोकांना आपण जागा दिली, निवडून आणलं, पण ते गेले आणि तुम्ही कायम सोबत आहात. बाबा ‘योगराज’ म्हणत शिवसेनेनं एकनाथ शिंदेंना सुनावलं, भाजपवरही साधला निशाणा यावेळी मुख्यमंत्र्यांनी एकनाथ शिंदे यांच्यावरही निशाणा साधला. उद्धव ठाकरे म्हणाले, हे तिर्थस्थळ करत आहेत, मी ऐकलं कामाख्याला गेले आणि प्रार्थना केली. शिवसेनेविषयी एवढंच प्रेम आहे, तर मग गेलात कशाला? असा सवालही मुख्यमंत्र्यांनी उपस्थित केला. ते पुढे म्हणाले, मला मुख्यमंत्रीपदाचा मोह नाही. बाळासाहेबांनी सांगितलं म्हणून मी वेडा वाकडा वागणार नाही . तुम्हाला जर मी पक्ष चालवायला नालायक वाटत असेल, तर शिवसेना प्रमुखांनी तुम्हाला केलेलं आवाहन तुम्ही विसरा. शिवसेना चालवायला मी तुम्हाला योग्य वाटत नसेल तर मला सांगा, मी आत्ता शिवसेना पक्षप्रमुख पद मोकळं करायला तयार आहे. कोणीही या आणि शिवसेना पुढे न्या, असंही ते म्हणाले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी भाजपवर टीका केली. शिवसेना हा विचार आहे आणि तो संपवायचा भाजप प्रयत्न करत आहे, असा आरोप त्यांनी केला. देशाच्या राजकारणात भाजपचं हिंदुत्वद अस्पृश्य होतं, तेव्हा शिवसेने त्यांना सोबत घेतलं आणि शिवसेनेचा हात धरून ते पुढे आले. तेव्हा हिंदुत्वाच्या मुद्द्यावर भाजपला हाक दिली आणि आज आपण फळं भोगतोय, असंही ते म्हणाले. ‘तुम्ही तुमची इज्जत घालवली तेवढी पुरे, निघा आता’ आसाम पूर परिस्थितीवरून काँग्रेसने शिंदेंना फटकारलं उद्धव ठाकरे म्हणाले, जी पदं भोगलीत, शिवसेनेने जे तुम्हाला स्वातंत्र्य दिलं. ते सर्व तुम्हाला भाजपमध्ये जाऊन जर भेटत असेल तर जा. तिकडे जाऊन मुख्यमंत्री होत असाल तर बिनधास्त जा. तिथे जाऊन उपमुख्यमंत्री व्हायचं असेल तर मला आधीच सांगायचं मी केलं असतं इथे. यात उद्धव ठाकरेंचा हात असल्याच्या आरोपांवरही दिली प्रतिक्रिया - मी या सगळ्यामागे आहे असं सांगितलं जात आहे. मी एवढा षंढ नाही, मी मागून वार करणारा नाही. मी हे सगळं कशाला करेन. उद्धव ठाकरे एकटे राहिले पाहिजेत असा भाजपचा डाव आहे. करा मला एकटं, तुम्ही निवडून आलेल्याना घेऊन जाऊ शकता, फोडू शकता पण ज्यांनी निवडून दिलं त्या शिवसैनिकांना फोडू शकत नाही, असंही ठाकरे म्हणाले. रक्ताचं पाणी करून शिवसेना पुन्हा वाढवू, असंही मुख्यमंत्री म्हणाले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.