मुंबई, २५ जून :‘गुवाहाटीच्या ध्यान शिबिरात जे लोक पळवून, मारून बसवले आहेत, त्यांचा संबंध योगाशी नसून भोगाशी आहे. अशाच भोग्यांना हाताशी धरून भाजप स्वतःला महाशक्ती म्हणून मिरवत आहे. महाशक्तीच्या सहकार्याने गुवाहाटीमधील बाबा ‘योगराज’ हे ठाकरे सरकार घालविण्यासाठी ध्यानसाधना करीत आहेत’असं म्हणत शिवसेनेनं (shivsena) पुन्हा एकदा एकनाथ शिंदे (eknath shinde) यांच्या बंडावर टीका केली आहे. शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे शिवसेनेच्या आमदारांना घेऊन गुवाहाटीमध्ये मुक्कामी आहे. त्यांच्या या बंडामुळे महाविकास आघाडी सरकार अडचणीत सापडले आहे. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या दैनिक सामनामधून (saamana editorial) एकनाथ शिंदे यांच्या बंडावर टीका करण्यात आली आहे. सुरतच्या ‘मेरिडिअन’ हॉटेलमध्ये अर्धवट राहिलेले ‘चिंतन’ कार्य अखेर ईशान्येकडील गुवाहाटी शहरात मार्गी लागले. गुवाहाटीस्थित ‘रॅडिसन ब्लू’ योग शिबिरात महाराष्ट्रातील चाळिसेक आमदारांचे सखोल चिंतन शिबीर सुरू आहे. त्या शिबिरात असा ठराव संमत झाला की, ‘‘भारतीय जनता पक्ष एक महाशक्ती आहे. ही महाशक्ती आपल्या पाठीशी असल्याने आपल्याला चिंता नाही.’’ शिवसेनेचे पळवून नेलेले चाळिसेक आमदार गुवाहाटीमध्ये असून त्यांची चोख व्यवस्था भारतीय जनता पक्षाने केल्याने या महाशक्तीचा काही जणांना नव्याने साक्षात्कार झालेला दिसतो. योग शिबिराच्या प्रमुखांनी त्यांची भूमिका अधिक सुस्पष्ट करताना जाहीर केले की, ‘‘भाजप या महाशक्तीने पाकिस्तानला धडा शिकवला आहे. त्या महाशक्तीचा आपल्याला पाठिंबा आहे.’’ आसामातून अनेक दिव्य विचार सध्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचत आहेत. हिंदुत्वापासून स्वाभिमानापर्यंत नव्याने साक्षात्कार होत आहेत. बरं, या महाशक्तीने पाकिस्तानला धडा शिकविला म्हणजे काय केले? योग शिबिरातील मंडळींना पाकिस्तानबाबत जे ज्ञान मिळत आहे, त्यावर काय बोलावे? पाकिस्तानची जिरवली किंवा पाकिस्तानला धडा शिकवल्याचे कोणते नवे पुरावे गुवाहाटीच्या योग शिबिरात समोर आणले? कश्मीरात पाकिस्तानची घुसखोरी कायम आहेच, पण मोठय़ा प्रमाणात हिंदू पंडितांचे हत्याकांड सुरू आहे. हिंदूंनी पलायन केले व जाताना भारतीय जनता पक्षाला शाप दिले. स्वतःस हिंदुत्ववादी म्हणवून घेणारे सरकार दिल्लीत असताना कश्मीरमधून हिंदूंना पलायन करावे लागते, हीच काय तुमची महाशक्ती? असा सणसणीत टोला सेनेनं शिंदेंना लगावला. पण एका अर्थाने भाजप म्हणजे खरोखरच महाशक्ती आहे हे मानावेच लागेल. योग शिबिरात सामील झालेल्या किमान सात-आठ जणांवरचे ‘ईडी-पीडी’ बालंट त्यांनी चुटकीसरशी दूर केले. त्यामुळे हे सात-आठ शिबिरार्थी महाशक्तीचे एकदम चरणदास झाले. भारतीय जनता पक्षाचा उल्लेख महाशक्ती असा केला ते खरेच आहे. काही जणांची ‘ईडी-पीडी’ त्यांनी दूर केली. तसेच काही जणांना ‘ईडी’ची पीडा होईल असे सांगून गुवाहाटीच्या योग शिबिरात जबरदस्तीने भरती केले. त्यामुळे तेथे नक्की कोणत्या प्रकारचे योग सुरू आहेत त्याची कल्पना यावी’ असा टोलाही सेनेनं शिंदेंना लगावला. भाजपने पाकिस्तानला धडा शिकविला असे गुवाहाटीच्या योग शिबीरप्रमुखांना वाटत असेल तर मग हाच धडा त्यांच्या नव्या महाशक्तीने लडाखमध्ये घुसून आपली हजारो वर्ग किलोमीटर जमीन बळकावणाऱया चीनला का शिकवू नये? महाशक्तीला ते सहज शक्य आहे. महाशक्ती रशिया-युक्रेन युद्धात मध्यस्थीचा आव आणते, पण आपल्याच देशात ज्या असंख्य प्रश्नांचा धुमाकूळ सुरू आहे, त्याबाबत सोयिस्कर मौन बाळगते. ‘अग्निवीर’ भरती प्रकरणात अनेक राज्यांत तरुणांनी तीक्र आंदोलने केली. त्यात महाशक्तीला मध्यस्थी करता आली नाही’ अशी टीकाही सेनेनं केली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.