शिंदेंनी बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांना वंदन करुन घेतली शपथ एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आज शिवसेनाप्रमुख हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) आणि धर्मवीर आनंद दिघे (Aanand Dighe) यांना वंदन करुन महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. एकनाथ शिंदे हे राज्याचे 20 वे मुख्यमंत्री ठरले आहेत. मुंबईतील राजभवनात दरबार हॉलमध्ये हा शपथविधी कार्यक्रम अतिशय साध्या पद्धतीने पार पडला. एकनाथ शिंदे यंच्यासह देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. या शपथविधीच्या कार्यक्रमाला भाजपचे काही नेते, पत्रकार उपस्थित होते. "हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे साहेब, मी एकनाथ संभाजी शिंदे ईश्वरसाक्षी शपथ घेतो की, कायद्याद्वारे स्थापित झालं आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा आणि निष्ठा राखीन. मी भारताची सार्वभौमत्व आणि एकात्मता राखीन. मी महाराष्ट्राच्या राज्याचा मुख्यमंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक आणि शुद्ध बुद्धीने पार पाडेन. संविधान आणि कायद्यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना निर्भयपणे, तसेच कोणत्याही विषयी ममत्व भाव किंवा आकष न बाळगता न्यायाची वागणूक देईन", अशी शपथ एकनाथ शिंदे यांनी घेतली. पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीत एकनाथ शिंदेंच्या अधिकाऱ्यांना महत्त्वाच्या सूचना एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात नव्या सरकारची पहिली मंत्रिमंडळ बैठक पार पडली. या बैठकीत एकनाथ शिंदे यांनी अधिकाऱ्यांना महत्त्वाची सूचना केली. लोकांनी आपल्यावर विश्वास दाखवला आहे. आपल्या कामातून शासन प्रशासन गतीमान आहे, हा संदेश देऊया, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केले. मंत्रालयात मंत्रिमंडळ बैठकीनंतर सचिव तसेच वरिष्ठ अधिकारी यांच्याशी संवाद साधताना ते बोलत होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बैठकीस उपस्थित होते. मंत्रिमंडळ बैठकीत २ व ३ जुलै रोजी विधिमंडळाचे विशेष अधिवेशन घेण्याचा निर्णय घेण्यात आला. अधिवेशनात पहिल्याच दिवशी विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे. (राज्यपालांचे नव्या सरकारला बहुमत सिद्ध करण्याचे आदेश) "आपण नवीन सुरुवात करत आहोत. आपल्यासोबत अनुभवी असे उपमुख्यमंत्री आहेत. त्यामुळे कारभार करण्यास अडचण येणार नाही. राज्यातील विकास कामे, विविध प्रकल्प यांना गती द्यावी लागेल. विविध समाज घटकांना न्याय देण्यासाठी लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांनी हातात हात घालून काम करावे लागते. शासन आणि प्रशासन ही एका रथाची दोन चाके आहेत. लोकांनी आपल्यावर विश्वास दाखवला आहे. तो आपल्याला सार्थ ठरवायाचा आहे. आपल्या कामातून गतीमान शासन प्रशासन आहे. असा संदेश आपण कामांच्या माध्यमातून देऊया. मेट्रोचे प्रकल्प, हिंदूहृदसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग तसेच जलसंपदा विभागांचे महत्त्वाचे प्रकल्प कालबद्ध पद्धतीने पूर्ण करावयाचे आहेत. त्यासाठी प्रशासनाचे सहकार्य मिळेलच, हा विश्वास आहे", असं एकनाथ शिंदे म्हणाले.महाराष्ट्र राज्याचे नवनियुक्त मुख्यमंत्री @mieknathshinde जी व उपमुख्यमंत्री @Dev_Fadnavis जी यांना भावी वाटचालीस शुभेच्छा. आपल्या हातून महाराष्ट्रामध्ये चांगले काम होवो, ही सदिच्छा!
— Office of Uddhav Thackeray (@OfficeofUT) June 30, 2022
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Eknath Shinde, Shivsena, Uddhav thackeray