मुंबई 24 जून : राज्यात सध्या मोठा राजकीय भूकंप आला आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह शिवसेनेचे 37 आमदारांनी सध्या बंड केलं आहे. याशिवाय शिवसेना समर्थक अपक्ष आमदारही एकनाथ शिंदे गटात सामील झाले आहेत. त्यामुळे ठाकरे सरकार धोक्यात आहे. अशात आता एकनाथ शिंदे गटाला शिवसेना मोठा धक्का देण्याच्या तयारीत आहे. एकनाथ शिंदे गटाचे 34 आमदार अपात्र ठरणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 12 आमदारांवर विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ कारवाई करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. विधिमंडळ कायद्यांतर्गत झिरवळ कारवाई करणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. सुनील प्रभू यांनी काढलेल्या व्हीपनंतर बैठकीला उपस्थित नसल्याने या 34 आमदार कारवाई करण्याची विनंती सुनील प्रभू यांनी केली होती. कोण आहेत हे आमदार - एकनाथ शिंदे, तानाजी सावंत, बालाजी किन्नीकर, अनिल बाबर, भारत गोगावले, प्रकाश सुर्वे, महेश शिंदे, अब्दुल सत्तार, यामिनी जाधव, संदीपन भुबरे, संजय शिरसाठ, लता सोनवणे. शिवसेनेने 46 पानांची याचिका विधानसभा अध्यक्षांना दिली आहे. ज्यात एकनाथ शिंदे यांनी लिहिलेल्या पत्राचा आधार घेऊन त्यातील नमूद 34 आमदारांवर कारवाई करण्याची ही विनंती केली आहे. संविधानाच्या अनुछेद 10 नुसार ही कारवाई करण्याची मागणी केली गेली. सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न होत असल्याने तात्काळ बैठकीला हजर राहावे असा पक्षाने व्हीप काढला असतानाही बैठकीला गैरहजर राहणाऱ्या 34 जणांवर कारवाई करण्याची याचिका सेनेने गुरुवारी दिली आहे. याबाबत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनीही ट्विट करून माहिती दिली आहे. शिंदे गटानी पहिलं जे पत्र पाठवलं होतं त्यात प्रचंड चुका होत्या आणि त्यात 34 आमदारांचाच उल्लेख होता. मूळ पार्टीने बारा आमदारांच्या डिसकॉलिफिकेशनसाठी अर्ज दिलेला आहे. त्यानंतर एकनाथ शिंदेंनी ३७ आमदारांबाबतचा दुसरा अर्ज दिल्यामुळे नंतरचा सदर अर्ज हा बाद ठरतो. यासाठी राजेंद्रसिंह राणा केस वाचा असं अतुल लोंढे यांनी लिहिलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.