मुंबई, 10 जून : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री (CM uddhav thackeray) उद्धव ठाकरे यांनी Unlock 1.0 चा पहिला टप्पा सुरू झाल्यानंतर पुन्हा एकदा उपनगरीय लोकल वाहतूक सुरू करण्याची मागणी केली आहे. केंद्र सरकारच्या रेल्वे मंत्रालयाकडे उद्धव ठाकरेंनी दुसऱ्यांदा ही मागणी केली आहे. अत्यावश्यक सेवांसाठी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी रेल्वे सेवा सुरू करावी असं मुख्यमंत्र्यांचं म्हणणं आहे.
मुंबई, पुणे आणि राज्यभरात या आठवड्यापासून निर्बंध शिथिल झाले आहेत. त्यामुळे सर्व दुकानं आणि खासगी ऑफिसेस त्या त्या ठिकाणच्या नियमांनुसार उघडण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे आता रस्ता वाहतुकीवर ताण आलेला स्पष्ट दिसतो आहे. मुंबईत पूर्व आणि पश्चिम द्रुतगती मार्गांवर वाहतूक कोंडी बघायला मिळाली. पहिल्या लॉकडाऊननंतरच मुख्यमंत्री ठाकरे यांनी अत्यावश्यक सेवेतल्या कर्मचाऱ्यांसाठी मुंबई लोकल सुरू झाली पाहिजे, अशी मागणी केली होती. पण त्या वेळी फक्त अडकलेल्या मजुरांसाठी श्रमिक ट्रेन सुरू करण्याचा निर्णय झाला.
वाचा - ...तर पावसाळ्यात 5 पट जास्त होणार कोरोनाचा प्रसार! IIT चा भीती वाढवणारा रिसर्च
कल्याण, डोंबिवली, विरार वगैरे उपनगरांमधून बस, एसटीने मुंबईत जाणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढल्याचं दिसून आलं. बस डेपोंमध्ये आणि एसटी स्टँडवर लांबच लांब रांगा लागलेल्या होत्या. रेल्वे वाहतूक बंद असल्याने सर्व ताण फक्त रस्ते वाहतुकीवर येत आहे.
काय आहे अडचण?
22 मार्चपासून मुंबई लोकल सेवा बंद आहे. रेल्वे कर्मचारी आणि इतर काही मोजक्या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी काही ठराविक मार्गांवर लोकल धावते आहे. रेल्वे सेवा सुरू झाली की गर्दीवर नियंत्रण राखणं अशक्य होईल. रेल्वेतून कोरोना विषाणूचा संसर्ग वेगाने पसरू शकेल. त्यामुळे उपनगरीय रेल्वे सेवा सुरू करण्यात आलेली नाही. एकदा मुंबई लोकल सुरू झाली की, ती अत्यावश्यक सेवेसाठी असणारा माणूस वापरतोय की सामान्य हा भेद कसा करणार, निर्बंध कसे ठरवणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
अन्य बातम्या
दिलासादायक! 'या' शहरात विकसित होतेय कोरोनाविरोधात हर्ड इम्युनिटी
पावसाळी अधिवेशन पुढे ढकलले, मुख्यमंत्र्यांनी नवी तारीख केली जाहीर